अडीच दिवस उपोषणाची अट पाळणार नाही – अण्णा हजारे

नवी दिल्ली,दि १३ ऑगस्ट- लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारे यांना दिल्ली पोलिसांनी नारायण पार्क येथे फक्त अडीच दिवस उपोषण करण्याची परवानगी दिली होती. पण अण्णांनी अशा प्रकारची कोणतीही अट पाळणार नसल्याचे सांगून दिल्ली पोलिसांसमोर पेच निर्माण केला आहे. दिल्ली पोलिसांच्या या विचित्र अटीवर अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी नापसंती दर्शविली असून अशी अट घालणे घटनेच्या विरूद्ध आहे, असे अण्णांच्या सहकार्‍यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी आम्हाला नारायण पार्क येथे उपोषण करण्यास परवानगी दिली, परंतु उपोषण तीन दिवसातच संपवाव असेही सांगितले आहे, अशी माहिती अण्णांचे सहकारी मनिष सिसोदिया यांनी दिली. दिल्ली पोलिसांची ही अट मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. उपोषण हा लोकशाहीतील निषेध व्यक्त करण्याचा अहिंसक मार्ग आहे. यासंदर्भात चर्चा सुरु असून परवानगी नाकारल्यास जंतर मंतरवर उपोषण केले जाईल, असे लोकपाल विधेयक समितीचे सदस्य प्रशांत भूषण यांनी सांगितले.

Leave a Comment