सोन्याच्या किमतीतील चढ उतारामुळे सराफी व्यावसायिकही संभ्रमात

पुणे-सध्या बाजारात सोन्याच्या किमतीत जो चढ उतार सुरू आहे त्यामुळे केवळ ग्राहक व गुंतवणूकदारच गोंधळात पडले आहेत असे नव्हे तर पुण्याच्या सराफ बाजारातील सराफी व्यावसायिकही संभ्रमात पडले असल्याचे दिसून येत आहे. आगामी कांही आठवडेतरी हीच संभ्रमाची स्थिती कायम राहणार असून सोने खरेदी करावी का नाही याचा कोणताच निर्णय हे व्यावसायिकही घेऊ शकत नसल्याचे चित्र आहे.सोन्याचे दर कांही दिवस तरी चढेच राहतील यावर सर्व सराफी व्यावसायिकांचे एकमत असले तरी ही अस्थिरता कधी संपेल याविषयी मात्र कोणताही अंदाज वर्तविला जात नाही.
येथील पु.ना.गाडगीळ पेढीचे भागीदार सौरभ गाडगीळ यासंदर्भात बोलताना म्हणाले की सोन्याचे दर सध्या चढत असले तरी त्यामागे सट्टेबाजी नाही हे नक्की. जागतिक बाजार कोसळण्याची सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली भीती, अमेरिकेतील मंदीची चाहूल, युरोपियन अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, डॉलरची घसरण यामुळे सोन्याला गुंतवणूकदार अधिक प्राधान्य देत आहेत. मात्र हे चढे दर कायम असेच टिकतील वा उतरतील याविषयी आत्ताच कांहीही सांगणे अशक्य आहे. मात्र आगामी दोन तीन आठवडे तरी हे दर चढेच राहतील व ते कदाचित सत्तावीस हजार रूपये दहा ग्रॅमची पातळी लवकरच गाठतील असा अंदाज आहे. सोन्याचे दर कांही काळाने खाली आले तरी ते फार खाली मात्र येणार नाहीत असे सांगून ते म्हणाले की सोन्याची वाढती मागणी आणि त्यामानाने मर्यादित पुरवठा यामुळे हे दर फार उतरणार नाहीत. त्यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार यांच्याकडे पैसे असतील तर ते सोन्यात गुंतवण्यास अजिबात हरकत नाही असेही त्यांनी सांगितले.
सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी मात्र दोन तीन आठवड्यानंतर सोन्याच्या भावात करेक्शन येण्याची शक्यता वर्तविली असली तरी सोन्याचे दर १० ग्रॅमला २३ हजार रूपयांपेक्षा अधिक खाली जाण्याची अजिबात शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment