पुढील शतकाचे चितन करणारा धर्मात्मा – डॉ वेरिस्मो कुतिन्हो

गोमांतकाच्या लढ्यात लढलेले आणि मुंबईत राहून गोमंतक मुक्तीसाठी परिश्रम केलेले डॉ वेरिस्मो कुतिन्हो यांचे निधन हे चटका लावणारे होते. मुंबईत आपला स्वतंत्र परिवार केलेला हा लढवय्या केवळ प्राध्यापक नव्हता तर तो बुद्धिजीवी योद्धा होता. मुंबईतील त्यांच्या मुक्कामातील प्रत्येक क्षण हा त्यांनी गोमांतक मुक्तीच्या लढ्यासाठी वापरला होता. बिशप विल्यम्स यांच्या बोलण्यातून त्यांच्या विषयी बर्‍याच आठवणी येत. त्यांचे अभ्यासाचे क्षेत्र आणि कामाचे क्षेत्र हे निराळे असूनही त्यांनी भारतीय संस्कृतीचा व्यासंग वाढविला आणि त्याचे राष्ट्रभक्तीत आणि स्वतःच्या योद्धापणात रूपांतर केले. त्याही पेक्षा त्यांनी स्वतःवर हिदू वैदिक पद्धतीनुसार अंत्यविधीचा आग्रह धरला होता, हे स्पृहणीयच मानावे लागेल.
    त्यांच्या भारतीय पद्धतीनुसार त्यांच्या अंत्यविधीच्या आग्रहाने नुकत्याच अमेरिकेत प्रकाशित झालेल्या ‘न्यूज वीक ’ या मासिकाच्या एक अहवालाची आठवण झाली. दोन वर्षापूर्वी ऑगस्टमध्येच काढलेल्या एका अंकाच्या मुखपृष्ठावरच ‘आपण सारे हिदू झालो आहोत काय ?’ असा मथळा दिला होता, त्या दृष्टीने एक छायाचित्रही दिले होते व आत यावर तीन चार निरनिराळे विषय मांडले होते. न्यूज वीक हे जगातील पहिल्या दोन साप्ताहिकात मोडणारे साप्ताहिक आहे. व जगात त्याची विक्रीतही आघाडी आहे. त्या मासिकाच्या संपादिका लिसा मिलर यांनीच तो लेख लिहीला असल्याने त्याला अभ्यासाची व जनमताचा वेध घेण्याची जबरदस्त बैठक होती. त्या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर जरी ‘आपण सारे खरेच हिदू झालो आहोत का’ असे जरी कांहीसे प्रश्नार्थक वाक्य मांडले असले तरी आता ‘होय ! वस्तुस्थितीही तशीच आहे’ असे म्हटले आहे. त्यांनी दिलेली कारणे जी आहेत ती डॉ कुतिन्हो यांच्या जीवनशैलीत चपखल बसणारी आहेत. डॉ कुतिन्हो यांचा अंत्यविधी त्यांच्या इच्छेमुळे मर्डिकट्टा कुंकळ्ळी येथील हिदूस्मशान भूमीत झाले. पण त्यापूर्वी आवर लेडी ऑफ हेल्थ चर्चमध्ये त्यावर प्रार्थनाही म्हटली गेली. न्यूज वीकच्या संपादिका लिसा मिलर यांनी हाच मुद्दा त्या विशेषांकात मांडला होता की, जगात भारत ही एकमेव अशी भूमिका आणि हिदू धर्म हा असा धर्म आहे की, तो अन्यत्रही परमेश्वराची मुक्ती आहे हे मानतो. ‘जरी जगातील युरोप व अमेरिका येथे जन्म झालेल्यांवर फार मोठ्या प्रमाणवर फक्त आमच्याच धर्मात ‘उद्धार’शक्य आहे असाच आयुष्यभर संस्कार असला तरी पुढील पिढी हे मानायला तयार नाही. त्यांना असे वाटते की, ख्रिश्चन किवा मुस्लिमपद्धतीत जसा उद्धार असू शकतो तसा अन्य चितनातही तो असू शकतो. हा विषय केवळ मानण्याने थांबत नाही तर युरोप व अमेरिका येथील साठ टक्क्यापेक्षाही अधिक लोकांना या ना त्या पद्धतीने तसे मत व्यक्त केले आहे. डॉ कुतिन्हो यांनी जसे ‘आपला अंत्यविधी हा हिदू पद्धतीने करावा’ असे लिहूनच ठेवले होते. त्याच प्रमाणे अमेरिकेतील साठ टक्क्यापेक्षा अधिक लोकांनी आपला अंत्यविधी हा दहन पद्धतीने व्हावा, असे म्हटले आहे. त्यात हिदू पद्धतीने व्हावा असे म्हटले नसले तरी परमत सहिष्णुता हे चितनच भारतीय व हिंदुत्वाच्या भूमिकेत बसणारे आहे.
    डॉ कुतिन्हो यांचा तर भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास होता आणि तो त्यांच्या समाजाला परिवाराला आणि मित्रांना मान्य होता. पण अडतीन वर्षापूर्वी बिशप विल्यम्स यांनी  अशीच परधर्मसहिष्णुता व्यक्त केली होती तर त्यांना त्यांच्या दफनभूमीत पुरणेही नाकारले होते. अर्थात फार पूर्वीपासून ‘साल्व्हेशन इज आल्सो पॉसिबल ऑउटसाईड द चर्च’ हा चर्चेचा मुद्दा झाला आहे. पण अडतीस वर्षापूर्वी डॉ विल्यम यांच्यावर जी वेळ आली तरी काळच बदलल्याने डॉ कुतिन्हो यांच्यावर आली नाही. अडतीस वर्षापूर्वीचा तो काळ आणि प्रसंग आठवला की, आजही अंगावर रोमांच उभे राहतात. डॉ विल्यम्स यांना चर्चने दफनाची परवानगी नाकारल्यावर मसुराश्रमाचे ब्रह्मचारी विश्वनाथजी यांनी त्यांचा अंत्यविधी मुंबईतील अधिकाधिक ऋत्विज एकत्र बोलावून घडवून आणला. अनेकांना हे माहीत असेल की, अंत्यविधी करणारांची संख्या मर्यादित असते आणि अन्य विधी करणारे ऋत्विज ते करत नाहीत आणि ते येतात ते आपापले विधी करून निघून जातात पण डॉ विल्यम्स यांच्या अंत्यविधीच्या वेळी मुंबईतील शंभराहून अधिक व्यासंगी ऋत्विज हे अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत म्हणजे एक तासपर्यंत ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील एका मंत्राचे पठण करीत होते. अर्थात वेदात हे मंत्र त्याच अर्थाचे आहेत. या लोकांत आणि परलोकांतही आपण ‘एकत्र चाला व चालूया या एकत्र बोला व बोलूया मने एकत्र असूद्यात. कर्तव्ये एका सामर्थ्याने पूर्ण करूया. ध्येये एक असूद्यात ,हृदये समान असूद्यात  कामेही समान असूद्यात आणि त्यांचा मार्गही एकत्र आक्रमूया. अशा अर्थाची तो वेदमंत्र ऐकल्यावर ‘वेदमंत्र ’ असामान्य आशयाचे का, या प्रश्नाचे आपोआप उत्तर मिळते. त्यावेळी वेदपाठशाळेतील कुमार ऋत्विजापासून ते वृद्ध ऋत्विजापर्यंतचे सारे जण दोन्ही बाजूला उभे राहून एकेका गटाने एक पद असे म्हटत वेदपठण केले. डॉ विल्यम यांच्या अंत्यविधीच्या वेळी सुरु असलेला तो एका तासापेक्षाही अधिक काळाचा वैदिक मंत्रघोष आज अडतीस वर्षानंतरही कानात घुमतो आहे. बिशप विल्यम यांची राष्ट्रवादाच्या उभारणीतील कामगिरी येवढी असानान्य होती की, त्यावेळी त्याना श्रद्धांजली अर्पण करता आली यातच धन्यता वाटली. गोमांतकाचे डॉ कुतिन्हो यांनाही त्यांच मंत्राने श्रद्धांजली अर्पण करावी, असे वाटते

ते मंत्र असे आहेत.
सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानतान देवा भागंयथापूर्वै संजनानाम् उपासते

समानिव आकुतिः समानाहृदयानिवः समानवस्तु वो मनो यथा वस्तुसहासति।

ओम् शांति शांतिः शांतिः

– मोरेश्वर जोशी, पुणे
मोबाईल ९८८१७१७८५५.

Leave a Comment