परिपक्व प्रशासक

भारताच्या आजवर होऊन गेलेल्या राष्ट्रपतीत सर्वात श्रेष्ठ कोण हा प्रश्न खरे तर निष्फळ आहे. मात्र डॉ. अब्दुल कलाम हे या देशाच्या राष्ट्रपतींच्या मांदियाळीत उठून दिसतात  कारण ते राजकारणाची पार्श्वभूमी नसलेले  एकमेव राष्ट्रपती होते. मात्र त्यांना राष्ट्रपती करताना ज्या पी. सी. अलेक्झांडर यांना डावलण्यात आले होत तेही सर्वात उठून दिसणारे राष्ट्रपती ठरले असते. कारण तेही राजकीय पार्श्वभूमी नसलेले पण राजकारणाचा अगदी जवळून परिचय असलेले उमेदवार होते. ते आएएस अधिकारी असल्यामुळे त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव होताच पण त्यांनी आपल्या कारकीर्दीतली अनेक वर्षे परदेशातल्या काही आंतरराष्ट्रीय संघटनांवर काम केलेले होते. ते ब्रिटनमध्ये भारतो उच्चायुक्तही होते आणि त्यांनी  इंदिरा गांधी यांचे स्वीय सचिव म्हणून पाच वर्षे केन्द्रातले सरकार जवळपास चालवले होते. असा माणूस राष्ट्रपती व्हायला हवा होता. अलेक्झडर हे देशाच्या प्रमुख शिल्पकारा पैकी एक होते. ५० वर्षे देशाची सेवा केलेल्या डॉ. अलेक्झांडर यांचे काल निधन झाले.
      या देशाला जवळ जवळ मध्ययुगीन अवस्थेतून आजच्या प्रगत अवस्थेत आणण्यासाठी अनेक प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक प्रयास करावे लागले आहेत.  अशा प्रयासातील राजकीय कार्य सर्वांच्या डोळ्यासमोर असते पण, प्रशासनाच्या क्षेत्रात प्रसिद्धी आणि श्रेय यांचा विचार न करता  केले जाणारे काम देशाला पुढे नेण्यास तेवढेच उपयुक्त असते. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या ५० वर्षात प्रशासनात असे स्पृसणीय काम करणारांत डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांचे नाव ठळकपणे घेतले गले पाहिजे.    १९४८ साली आयएएस झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीची  सात वर्षे मद्रास आणि त्रावणकोर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आणि १९५५ साली ते प्रति नियुक्तीवर केन्द्रात व्यापार खात्याचे सचीव म्हणून आले आणि तिथे विविध खात्यांत  सचिव म्हणून काम करीत राहिले. ते केन्द्रात गेले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यांना या निमित्ताने नेहरूंचा जवळून पाहता आले आणि नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा तसेच कार्यक्षमतेचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की, त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव जवाहर ठेवले. अमेरिकेतल्या एका अभ्यासवृत्तीच्या निमित्ताने ते अमेरिकेत गेले आणि तिथे त्यांनी चार वर्षे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संबंधातल्या युनोच्या काही संस्थांत काम केले. नंतर त्यांनी जिनेव्हात राहून गॅट या संघटनेत काम केले.          
१९८१ साली इंदिरा गांधी  यांनी अलेक्झांडर परदेशातून आपले सचिव म्हणून काम करण्यासाठी बोलावून घेतले. तशी त्यांची ही नियुक्ती कागदोपत्री पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख अशी होती पण त्यांनी एवढेच काम न करता केन्द्र सरकारच्या अनेक खात्यात पंतप्रधानांच्या वतिने समन्वय साधण्याचे फार उत्तम काम केले. आपल्या कार्यपद्धतीने सरकारी कामाला विलक्षण वेग दिला. त्यांनी इंदिरा गांधी यांचे राजकीय सचिव म्हणूनही काम पाहिले आणि वेळ पडल्यास त्यांच्या खाजगी कामातही सचिव म्हणून चोख कामगिरी बजावली. त्यामुळे १९८१ ते १९८५ या चार वर्षातल्या भारताच्या राजकीय इतिहासाचे ते साक्षीदार होते.  इंदिरा गांधी यांच्यानतर राजीव गांधी पंतप्रधान झाले  अलेक्झांडर यांनी पुन्हा ती सूत्रे हाती घेतली पण त्यानंतरचे एक वर्ष त्यांच्या आयुष्यातले खेदजनक वर्ष ठरले.  पंतप्रधानांच्या कार्यालयातून काही गोपनीय कागदपत्रे बेपत्ता होतात आणि ती काही हितसंबंधी लोकांना विकली जातात असे आढळले. या संबंधात काही लोकांना अटकही झाली. हे लोक पैशासाठी असे करीत होते असे दिसून आले. पण या सगळ्या प्रकाराची नैतिक जबाबदारी पत्करून अलेक्झांडर यांना आपले हे पद सोडावे लागले.
    यानंतर त्यांना भारताचे ब्रिटनमधील उच्यायुक्त म्हणून नेमण्यात आले. चार वर्षे या पदावर काम केल्यानंतर त्यांना भारतात परत बोलावून त्यांच्याकडे तामिळनाडूच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना १९९३ साली महाराष्ट्रचे राज्यपाल करण्यात आले. या पदावर त्यांनी २००२ साल पर्यंत काम केले. २००२ साली देशात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लागली. तेव्हा सहमतीचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते पण संधी गेली. निराश झालेल्या अलेक्झांडर यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. नंतर ते २००८ सालपर्यंत राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांच्या अजोड कार्याची पोच पावती म्हणून त्यांना जे सर्वोच्य पद मिळायला हवे होते ते त्यांना मिळाले नाही. ते उत्तम वक्ते आणि लेखक होते. त्यांची माय इयर्स विथ इंदिरा गांधी, दी पेरील्स ऑफ डेमोक्रेसी, इंडिया इन न्यू मिलेनियम ही तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत आणि ती बरीच गाजली आहेत. त्यांच्या या पुस्तकातून त्यांनी आपले विचार प्रकट केले आहेत. भारतीय संस्कृती विषयीची त्यांची श्रद्धा तळमळ आणि परिपक्व दृष्टीकोन यांचे दर्शन या पुस्तकातून घडते.  भारताचे भवितव्य घडवण्याबाबत पडद्याच्या आड राहून काम करणार्‍या मोजक्या लोकांत त्यांचा समावेश होतो.

Leave a Comment