जगन मोहनची वाट

आंध्र प्रदेशातील काँग्रेसचे बंडखोर आणि आता स्वतः स्थापन केलेल्या वायएसआर काँग्रेसचे खासदार जगन मोहन रेड्डी यांच्या मालमत्तेची सीबीआयकडून चौकशी सुरू असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे सीबीआयच्या सूत्रांनी सूचित केले आहे. ही कारवाई आंध्र प्रदेश उच्य न्यायालयाच्या आदेशावरून सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात न्यायालयाने हा आदेश दिला आणि सीबीआयने जी प्राथमिक चौकशी केली आहे तिच्यानुसार तरी जगनमोहन रेड्डी यांनी अवैध मार्गांनी भरपूर पैसा कमावला आहे. त्यांचे वडील २००४ ते २००९ या काळात आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून पैसा कमावला. ते याच काळात शून्यातून अब्जोपती झाले. आता तरी सीबीआयने केलेल्या चौकशीत जगन मोहन यांची मालमत्ता किमान ४३ हजार कोटी  रुपयांची असावी असा सीबीआयचा कयास आहे. ही सारी मालमत्ता काही घाम गाळून किवा काम करून मिळवलेली नाही तर ती वडलांच्या अधिकाराचा वापर करून मिळवलेली आहे असे सिद्ध करणारे काही पुरावे मिळाले आहेत
    ही सपत्ती कमावण्यास ज्यांनी मदत केली त्यांना जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या वडलांना सांगून अनेक सरकारी लाभ मिळवून दिले आहेत. या प्रकरणात अधिक चौकशी करताना त्यांना अटकही करावी लागेल आणि ए.राजा, कनिमोझी, सुरेश कलमाडी यांच्या प्रमाणेच जामीन मिळाला नाही तर बरेच दिवस तुरुंगात रहावे लागेल. सीबीआयला त्यांच्या विरोधात जे पुरावे मिळाले आहेत. त्यांचे तपशील मिळवताना काही अडचणी येऊ शकतात. ते पुरावे पुरवणार्‍यांवर जगन मोहन दबाव आणू शकतात आणि पुराव्यांत ढवळाढवळही करू शकतात म्हणून त्यांना जामिनावर सोडू नये अशी मागणी सीबीआयने केली आणि ती न्यायालयाने मान्य केली तर जगन मोहन रेड्डी हे काही महिने पर्यंत जेलची हवा खाऊ शकतात. सीबीआयचा अंदाज खरा असेल तर जनगमोहन रेड्डी यांची मालमत्ता चार लहान राज्यांच्या वार्षिक बजेटएवढी आहे. माणसाने श्रीमंत असायला काही हरकत नाही पण, ती श्रीमंती गैर मार्गांनी मिळवली असेल तर एकना एक दिवस अशी वेळ येते की, सारी संपत्ती घरात, तिजोरीत आणि बँकांत रहाते आणि ती कमावणारा हा नवकोट नारायण मात्र तुरुंगाच्या थंड फरशीची गादी करून तिथे तुरुंगातले कदान्न खात पडतो.
    अशीच वेळ अनेकांवर आलेली आहे आणि अनेकांवर येण्याची शक्यता आहे. आता जगनमोहन वर ही वेळ आली आहे. तशी गैर मार्गाने पैसा कमावणार्‍या प्रत्येकावर ती येतेच असे काही नाही पण जगनमोहन यांनी पैसा कमावण्याचा फारच अतिरेक केला होता. त्यांच्यावर आता भारतीय दंड विधान संहिता, मनी लाँडरिंग, हवाला मनी अशा अनेक कलमांखाली खटले भरले जाणार आहेत. सत्यम या हैदराबादच्या आयटी कंपनीतला भ्रष्टाचार शोधून काढण्यासाठी  सीबीआयने अनेक तज्ञांचा समावेश असलेले शोध पथक तयार केले होते तसे आता जगनमोहन साठी तयार केले जाणार आहे.  या पथकात सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, आयकर खाते आणि अन्य काही खात्यांचे अधिकारी असतील आणि जगन मोहन यांनी आपली काही संपत्ती परदेशी बँकांतही ठेवली आहे की काय याचाही हे पथक तपास करणार आहे. जगन मोहन रेड्डीच्या कंपन्यांत काही कारण नसताना करोडो रुपयांची गुंतवणूक करणार्‍या सुमारे २५ कंपन्यांशी सीबीआय ने संफ साधला आहे. या बाबत सीबीआयला पूर्ण मुभा देण्यात आली आहे.
    ही सारी कारवाई तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि लोकसभेतले नेते येरन्नायडू यांनी दाखल केलेल्या अर्जावरून सुरू झाली आहे. त्यांचे वकील डी. श्रीनिवास यांनी या सदर्भात  जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसमध्ये बंड केले आहे आणि त्यांच्या या बंडामुळे आंध्र प्रदेशातले काँग्रेसचे सरकारच नव्हे तर पक्षच  धोक्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते सूडाच्या भावनेने ही सारी कारवाई असतील असे वरकरणी वाटू शकते पण प्रत्यक्षात तसा प्रकार नाही. जगन मोहन यांनी स्वतःच्या हातून ही सारी कारवाई स्वतःच्या अंगावर ओढून घेतली आहे. त्यांनी नुकतीच लोकसभेची पोट निवडणूक लढवली. तिच्या  निमित्ताने आपल्या मालमत्तेची घोषणा करताना त्यांनी ती संशयाला जागा राहील अशा पद्धतीने केली. मुळात १९९९ साली कफल्लक असलेल्या जगन मोहन रेड्डी यांनी २००९ सालची लोकसभा निवडणूक लढवताना आपली मालमत्ता ७७ कोटी रुपये इतकी जाहीर केली होती. पण २०११ च्या मे मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत त्यांनी ती ३६५ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले. त्यांची मालमत्ता केवळ दोनच वर्षात पाच पटीने कशी वाढली ? ते कोणता असा व्यवसाय करीत असतात ? असे प्रश्न उपस्थित झाले. हे सारे त्यांनी आपल्या  मालमत्तेच्या विवरणातूनच दाखवून दिले
    आता आंध्र प्रदेशाच्या मंत्रिमंडळात वस्त्रोद्योग मंत्री असलेले काँग्रेसचे नेते पी. शंकरराव हे जगन मोहन यांच्या विरोधात पोट निवडणुकीत उभे होते. त्यांनीही या मालमत्तेचे गूढ उकलले जावे अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. त्याच्या मते जगन मोहन रेड्डी याची मालमत्ता २००४ साली १९ लाख रुपये होती. त्याच वडील मुख्यमंत्री होताच ती फुगायला लागली आणि ती आता किमान ४३ हजार कोटी रुपये आहे. म्हणून दोन वर्षात त्याने भरलेल्या आयकराच्या आकड्यातही अनेक विसंगती आहेत. कनिमोझी हिने वडलांच्या प्रभावाचा वापर करून २ जी स्पेक्ट्रमचा फायदा घेत आपल्या कलैग्नार टीव्हीसाठी करोडो रुपये मिळवले तसेच  जगन मोहन याने साक्षी या आपल्या टीव्ही वाहिनी साठी करोडो रुपयांची संशयास्पद गुंतवणूक आकृष्ट केली. 

Leave a Comment