काँग्रेसचा जनसंपर्क

भारताच्या राजकारणामध्ये चमच्यांची सुद्धा एक परंपरा आहे. अर्थात ती केवळ दिल्लीच्या किवा मुंबईच्याच राजकारणात आहे असे नाही, परंतु प्रत्येक गावाच्या राजकारणात आहे. काही वेळेला असे वाटते की, राजकारणा मध्ये केवळ नेतेच असते तर फार मजा आली नसती. नुसतेच नेते आहेत पण चमचेच नाहीत तर राजकारण रंगले नसते. किबहुना चमचे नसते तर नेत्यांनाही करमले नसते. अवतीभोवती भरपूर चमचे असणे हे तर नेत्यांचे वैभव असते. या चमच्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते काही दिवस चमचम चमकतात आणि नंतर एकदम लुप्तप्राय होतात. अर्थात चमकताना ते काही इतिहास घडवून जात असतात. इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया असे अजरामर उद्गार काढणारे देवकांत बारूआ हे आता कोठे आहेत कोणालाच माहीत नाही. पण त्यांचे उद्गार मात्र अमर ठरले आहे. सध्या दिल्लीच्या राजकारणामध्ये असाच एक धुमकेतू उगवत आहे. धुमकेतू अशुभ समजला जातो, त्यामुळे या नव्या चमच्याचा उदय काँग्रेसच्या इतिहासासाठी अशुभ ठरण्याची शक्यता वाटायला लागली आहे आणि म्हणून त्याचा उदय हा चर्चेचा विषय झाला आहे.
    मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री श्री. दिग्विजयसिग यांचा राजकारणातला उदय याच धर्तीचा आहे. तो काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिग यांचा वाढता प्रभाव हा अनेकांच्या औत्सुक्याचा आणि काँग्रेसमधल्याच काही नेत्यांच्या  वैषम्याचा विषय झाला आहे. मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदावर १० वर्षे राहूनही त्यांना या राज्याच्या विकासासाठी काही करता आले नाही. परिणामी २००३ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने तिथे तीन चतुर्थांश बहुमत मिळवले. या घटनेला आता ८ वर्षे झाली आहेत. या काळात दिग्विजयसिग हे पक्षाचे सरचिटणीस राहिले आहेत. या १८ वर्षात त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही. आता तेच दिग्विजयसिग उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्याचा निर्धार करून तिथली सारी सूत्रे हलवत आहेत. त्यांचे महत्त्व एवढे का वाढले ?
    आपण काँग्रेसचे नेते किवा श्रेष्ठी म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते नेते कोण आहेत ? सोनिया गांधी, मनमोहनसिग, पी. चिदंबरम, ए. के.अँटनी, प्रणव मुखर्जी. यातले प्रणव मुखर्जी हे बंगाली आहेत ,ते तोडके मोडके हिदी बोलतात. बाकीच्या सर्व श्रेष्ठींना  हिदी बोलता येत नाही. पक्षात आता मोकळा असणारा  आणि उत्तर भारतातल्या लोकांशी संवाद साधू शकेल असा एकमेव वरिष्ठ नेता म्हणजे दिग्विजयसिग. उत्तर प्रदेशात जाऊन तिथल्या लोकांच्या भाषेत त्यांच्याशी बोलून हृदयस्थ संवाद साधण्याची कला यातल्या कोणालाही अवगत नाही त्यामुळे दिग्विजयसिग यांचा भाव वधारला आहे आणि तेही मिळालेल्या संधीचा दुरुपयोग करून आपल्या मनातले आणि कल्पनेतले राजकारण काँग्रेस पक्षाच्या माथी मारत आहेत. त्यांचे राजकारण त्यांना परिपूर्ण आणि काँग्रेससाठी हितावह वाटत असेलही पण त्यांच्या या राजकारणाला अनेक काँग्रेस नेत्यांचा कसून विरोध आहे. रा. स्व. संघावर उठसुट टीका केल्याने उत्तर प्रदेशातले मुस्लिम मतदार आपोआप काँग्रेसच्या मागे येतील असा त्यांचा विचार आहे पण तो अनेकांना मान्य नाही.
    उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठे यश मिळेल अशी दिग्विजयसिग यांनी अपेक्षा आहे पण तसे झाले नाही तर काँग्रेसची तर फजिती होणार आहेच पण राहुल गांधी यांना बिहार पाठोपाठ फटका बसून त्यांना राष्ट्रीय नेता म्हणून डोके वर काढता येणार नाही. तसे होऊ नये म्हणून काही नेते सोनिया गांधी यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत. दिग्विजयसिग यांची उत्तर प्रदेशातली धोरणे घातक आहेत हे सोनिया गांधी यांना पटवून देण्याची त्यांची इच्छा आहे पण, त्यांना सोनिया गांधी यांची भेटच मिळत नाही. सामान्य कार्यकर्त्यांना तर सोनिया गांधी भेटत नाहीतच पण काँग्रेसच्या खासदारांनाही भेटत नाहीत. उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे खासदार अस्लम शेरखान आणि अन्य १३ खासदारांनी  सनिया गांधी यांची भेट मागितली आहे पण या १४  खासदारांना दोन वर्षात त्यांच्या भेटीची वेळ मिळू शकलेली नाही. यामुळे पक्षाचे खासदार काय म्हणतात ते ऐकून घ्यावे हे सोनिया गांधी यांना कळत नाही असे नाही पण त्या या खासदारांशी बोलूच शकत नाहीत. कारण त्यांना हिदी येत नाही आणि काँग्रेसच्या खासदारांना इटालीयन भाषा येत नाही.
    राष्ट्रीय राजकारणातली ही एक मोठी संवादात निर्माण झालेली दरी आहे. सोनिया गांधी यांच्याशी कोणाला बोलायचे असेल तर काही विशिष्ट मध्यस्थ आहेत. त्यांना वंदन केल्याशिवाय सनिया गांधी यांना भेटता येत नाही आणि त्यांच्याशी थेट संवाद साधता येत नाही. अशा चांडाळ चौकडीचा वेढा आता सोनिया गांधी यांना पडला आहे. काँग्रेस हा सामान्य माणसाचा पक्ष आहे हा सामान्य माणूसच काय पण पक्षाचे खासदारही या पक्षाच्या नेत्यांना भेटू शकत नसतील तर तो पक्ष सामान्य माणसात आपुलकी कशी निर्माण करू शकणार आहे ? काँग्रेसच्या प्रत्येक पंतप्रधानांना अशा चमच्यांचा वेढा पडलेला असतो. त्यांच्या कारभारात असे चमचे, दरबारी खुषमस्करे, चांडाळ चौकडी आणि किचन कॅबिनेट अशांचाच वरचष्मा राहिलेला आहे. तो जेव्हा वाढतो तेव्हा काँग्रेस पक्ष सामान्य माणसापासून तुटतो आणि त्याचा पराभव होतो असा इतिहास आहे. मुळात हा पक्ष अल्पमतात आहे आणि केवळ आघाडी केली म्हणून त्याला सत्ता प्राप्त झाली आहे. तोही जनाधार गमावल्यास या पक्षाचे भवितव्य अधांतरी होणार आहे.

Leave a Comment