आदर्श सोसायटी संदर्भात सीबीआयचा पुण्यातील खडकी भागात छापा

पुणे दि.१०- मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीत पुण्याच्या खडकी येथील सुरती मोहल्ला नावाच्या चाळीत राहणार्‍या बेरेाजगार विशाल केदारी याच्या नावाचाही फ्लॅट असल्याची कागदपत्रे सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या हाती लागली असून केदारीच्या घरावर त्यासंदर्भात सोमवारी टाकण्यात आलेल्या छाप्यात अनेक दुवे सीबीआयच्या हाती लागले असल्याचे समजते.
  याविषयीची सविस्तर माहिती अशी की आदर्श घोटाळ्यात ज्यांच्या सदनिका आहेत त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेताना पुण्यातील विशाल केदारी याच्या नांवावरही एक फ्लॅट असल्याचे सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला आढळले. मात्र या पथकाचा असा संशय आहे की हा फ्लॅट प्रत्यक्षात तत्कालीन डिफेन्स इस्टेट अधिकारी एस.आर. नायर यांनी खरेदी केलेला असावा. सीबीआय भ्रष्टाचारविरेाधी पथकाच्या पुणे विभागाच्या सुपरिटेंडेंट विद्या कुलकर्णी यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. केदारी किरकोळ कामे करून कसाबसा उदरनिर्वाह चालवितो मात्र नायर तेव्हा पुण्यात खडकी कन्टोन्मेंट बोडाचे चीफ एक्स्झिक्युटिव्ह होते व केदारी त्यांच्या घरी त्याकाळात भाजी पोहोचविण्याचे काम करत होता व नायर यांनीच बेनामी फ्लॅट खरेदी केला असावा असा अंदाज आहे.
  सीबीआय भ्रष्टाचारविरोधी पथकाने केदारीची चौकशी केली तेव्हा त्याने आपण जाहिरात वाचून राखीव कोट्यातून हा फ्लॅट बुक केल्याचे सांगितले आहे.२००५ सालातच हा फलॅट त्याने बुक केला असून आपण गरीब असलो तरी आपला फ्लॅट असावा असे स्वप्न होते व त्याचवेळी ही जाहिरात आली असे त्याचे म्हणणे आहे. जवळचे नातेवाईक आणि परिचित यांच्याकडून ७१ लाख रूपये आपण गोळा केले असेही त्याचे म्हणणे असून ही खरेदी कायदेशीर असल्याचा त्याचा दावा आहे. फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी आवश्यक असलेली आयकर विवरण पत्र, जात दाखला, आयकर दाखला, अधिवास दाखला अशी सर्व कागदपत्रेही दिली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. भाजी विक्री हेच उत्पन्नाचे सांधन असल्याचे सांगून तो म्हणतो की माझे दुकान नाही. केदारी याने आपल्या परिचितात भाजपच्या खडकी कन्टोन्मेंटमधील संगीता गवळी व त्यांचे पती मुकेश यांचीही नांवे घेतली आहेत.संगीता गवळी यांना लहानपणापासून ओळखतो असे सांगून तो म्हणतो की निवडणूकीच्या काळात मी त्यांची अनेक बारीकसारीक कामे केली आहेत. मात्र आपण रिपब्लीकन पार्टी प्रकाश आंबेडकर गटाचे असल्याचेही तो सांगतो.
   संगीता गवळी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या केदारीला ओळखतात. निवडणूकीच्या काळात बॅनर लावणे, पोस्टर लावण्यासारखी कामे तो करायचाच पण घरातली कामेही करायचा असे सांगून त्या म्हणाल्या की मात्र आदर्श घोटाळा प्रकरणात त्याच्या घरावर सीबीआयचा छापा पडला याचे आम्हाला फारच आश्वर्च वाटले.
  केदारीला सीबीआयने सोमवारी ताब्यात घेतले होते मात्र सायंकाळीच त्याची सुटका करण्यात आल्याचेही समजते.

Leave a Comment