अण्णा हजारेंच्या व्यक्तीमत्त्वाची दुसरी कोमल बाजू

पुणे-स्वतंत्र भारताची स्वातंत्र्य लढाई लढणार्‍या समाजसेवक अण्णा हजारे यांची जनमानसात कणखर नेता म्हणून प्रतिमा असली तरी या व्यक्तीमत्त्वाला दुसरी कोमल बाजूही आहे याचा अनुभव मुंबईत सारेगमप लिटल चॅम्पसच्या शुटिगप्रसंगी आला. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून हा विशेष कार्यक्रम टिव्हीवरून प्रक्षेपित केला जाणार आहे.
या कार्यक्र मात अण्णांनी छोट्या गायकांसमवेत जणू आपल्या बालपणालाच पुन्हा उजाळा दिला. अण्णा सांगतात लहानपणी मी खूप हट्टी होतो आणि फकत आईशिवाय कुणाचेच ऐकत नसे. चित्रपटांचे मला वेडच होते. प्रत्येक चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचो. मदर इंडिया, नया दौर हे फार आवडलेले सिनेमे. दिलीपकुमार भयंकर आवडता. मात्र गेल्या ३५ वर्षात एकही सिनेमा पाहिला नाही. त्यामुळे सध्याच्या चित्रपटांविषयी बोलू शकत नाही.
अण्णांची दुसरी आवड आहे शेती. त्यांनी आत्तापर्यंत साडेतीन लाख झाडे लावली आहेत. गाण्याचीही खूप आवड मात्र गाता येत नाही असे सांगून ते म्हणतात, संगीतात युद्ध जिकण्याची ताकद आहे. मेरे वतन के लोगोंसारखी राष्ट्रप्रेमाची गाणी अण्णांना रडवतात. लता, आशा, रफी आणि मन्नाडे त्यांचे आवडते गायक.
या कार्यक्रमात सहभागी बालगायक सलमान याने गायलेले माँ तुझे सलाम हे गाणे ऐकताच अण्णा म्हणतात, अशी गाणी असतील तर मी १६ दिवसच काय पण वीस दिवसही उपोषण करू शकतो कारण अशी गाणीच लढायची ताकद देतात. देशात छेडल्या गेलेल्या भ्रष्टाचारविरोधात भारत आंदोलनाचा चेहरा असलेल्या अण्णांच्या व्यक्तीमत्त्वाची ही हळवी बाजू कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडा भिजवून गेली हे वेगळे सांगायला नकोच.
 

Leave a Comment