महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे एन्कौंटर केल्याची पवना परिसरात भावना

पुणे,दि. १०- पवनेच्या पाण्याचा हक्क मागणार्‍या शेतकर्‍यांचा शासनाने एन्कौंटर केल्याची भावना आज या परिसरात आहे. कालच्या आंदोलनात तीन शेतकरी ठार व शंभराहून अधिक जखमी झाले आहेत. शेतकर्‍यांचे हे आंदोलन गेली पाच वर्षे सुरु आहे आणि प्रत्येक वेळेला शासनाने ते दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे पण यावेळी शासनाने एका बाजूला गोळीबार करून अत्याचाराची परिसीमा केली तरीही यावेळी पोलीसांचा गोळीबार आणि पोलीसांचेच मोटारीवर हल्ले हे प्रकार वृत्तवाहिन्यांनी दाखवल्याने जनतेत अधिक प्रक्षोभ जाणवत आहे. त्याचा परिणाम असा की काल सायंकाळी आक्र्रमक असणारे शासन आज बचावात्मक पवित्र्यात होते. शासनाने त्वरीत बंद नळाचे काम थांबवले आहे.
कालच्या आंदोलनात बळी पडलेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याच्या मुद्द्यावर आज येथील वातावरण गरम होते. जेथे हे हत्त्यासत्र घडले तेथेच अंत्यविधी करण्याचा आंदोलकांचा निर्धार होता पण त्यातून अजून गंभीर प्रसंग उद्भवण्याची शक्यता लक्षात घेअून हे अंत्यविधी आपापल्या गावी करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला.दरम्यान आज पुणे भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीसमोर भाजपा कार्यकर्त्यांनी कालच्या गोळीबाराचा निषेध करण्यासाठी उग्र निदर्शने केली.पवना धरण पाईपलाईन योजनेला विरोध करण्यासाठी काल मावळ बंद आंदोलनात उसळलेल्या हिंसाचारानंतर जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी बंदिस्त जलवाहिनी काम थांबविण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य शासनाने याबाबत पुढील निर्णय घेतल्यानंतरच हे काम पुढे सुरू ठेवायचे वा बंद करायचे याचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले .पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलनात काल राष्ट्रवादी व्यतिरिक्त अनेक राजकीय पक्ष व शेतकरी सामील झाले होते. त्यातूनच मावळ बंद पुकारण्यात आला मात्र या बंदला हिसक वळण लागले. त्याचे तीव्र पडसाद विधीमंडळात आणि  संसदेतही उमटले
     पवनेवरील हे धरण साडेदहा टीएमसी येवढे म्हणजे पुण्यावर असलेल्या पानशेत धरणायेवढे आहे व त्यावर छोटी वीजनिर्मिती यंत्रणाही आहे. तेथील आठशे पासष्ट शेतकर्‍यांना सिचन क्षेत्रात प्रत्येकी एक एकर जमीन देण्याचे आश्वासन देअूनही न पाळल्याने तेथील शेतकरीही नाराज आहेत. तसेच धरणाच्या खालील बाजूस शेती असणार्‍यांना बंद नळाच्या योजनेने पाणी मिळणे बंद होणार आहे. त्याच्या बांधकामाला आज स्थगिती दिली आहे.

Leave a Comment