सुयोग्य नियोजन आणि शिस्तबध्द कार्यप्रणाली ने स्ट्रेसवर मात शक्य

आजच्या गतिमान जीवनामुळे माणसामध्ये स्ट्रेस निर्माण होतो आहे. यामुळे त्याचे एकूणच संतुलन बिघडते आहे. सुयोग्य नियोजन आणि शिस्तबध्द कार्यप्रणाली आणि व्यायाम यांच्या सहकार्याने आपण स्ट्रेसवर मात करू शकतो.आजचं युग स्पर्धेचं आहे. प्रत्येकाला कमी वेळात यशस्वी व्हायचंय. त्यामुळे कमी वेळात भरपूर काम करुन यशस्वी व्हायचंय. आज सामाजिक आणि आर्थिक स्थिती बदलत आहे. आज प्रत्येकाच्या स्वत:बद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल अपेक्षा वाढत आहे. अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो स्वत:वरच ओझी लादून घेतो. या धावपळीचा स्ट्रेस येतो. या स्ट्रेसचा कमीअधिक प्रमाणात माणसाच्या मानसिक संतुलनावर परीणाम होतो. काही वेळा मानसिक त्रास जसे उगाचच चिडचिड करणे, ओरडणे, सतत चिंता करीत राहणे असे त्रास उद्भवतात.

मानसिक संतुलनावर कौन्सिलिंग खूप महत्व आहे. योग्य औषधी आणि कौन्सिलिंग यांचा समन्वय साधूनच उपचार करावे लागतात. शिवाय एकाच प्रकारचे दोन रुग्ण असले तरी त्याच्या मानसिक संतुलन बिघडण्याची पार्श्वभूमी लक्षात घेणंही तितकंच गरजेचं आहे. कौन्सिलिंग करण्यापूर्वी प्रत्येक रुग्णाची आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक या तीन गोष्टी तपासून घेणे खूप महत्वाच्या असतात.मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. पहिल्या प्रकारच्या रोगामध्ये मनाचा दुभंग झाल्यासारखी माणसं वागतात. म्हणजे जसं त्याचा वास्तवाशी काही संबंध नसणे, सतत दु:खी असणे, संशय घेणे ही लक्षणं त्या व्यक्तिंमध्ये दिसून येतात. तर दुसर्‍या प्रकारच्या लोकांमध्ये सतत एकाकी आणि उदासिन वाटणं, तीव्र स्वरुपाची चिंता वारंवार करत राहणं, काहीसं ‘मूडी’ वागणं ही लक्षणं दिसून येतात.

शाळेत जायला नकार देणं किंवा अभ्यास न करणं, झोप न लागणं, बहीणभाऊ किंवा भावाभावामध्ये भेद असणं, पैसे चोरणं, परीक्षेच्या काळात परीक्षेच्या चिंतेने आजारी असणं, आर्थिक विवंचनेमुळे अनेक मानसिक त्रास, स्मरणशक्ती कमी होणे, स्मृतीभ्रंश असे अनेक आजार निर्माण होतात. या आजारांवर वेळीच उपचार न केल्याने ते पुढे मनोरूग्ण होतात.

मानसिक संतुलन ढासळल्यानंतर आपण कोणाला नको आहोत त्यामुळेच आपल्याला मानसिक उपचार रुग्णालयात आणले आहे अशी भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते. त्यामुळे घरच्या माणसांची मदत घेऊन त्यांना थोडंस या रुग्णांबरोबर कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवल्यास आपण असे रुग्णांना वेगळ्या इस्पितळात ठेवण्याची गरज उरत नाही. पण या वेळी कुटुंबाचा खरा कसोटीचा काळ असतो. याच काळात मनोरुग्णांना योग्य कौन्सिलिंग आणि औषधे मिळाल्यास आपण रुग्णांना नॉर्मल पर्यंत आणू शकतो.

मानसिक आजार हे मानसिक ताण वाढल्याने होतात. हे ताण अव्यक्त राहिल्याने वाढत जातात. या सर्व ताणांपासून मुक्ती हवी असेल तर स्वत:च्या सवयी बदलण्याबरोबरच व्यक्त करायला शिकले पाहिजे. जे काही करतो आहोत ते का करतो आहोत हे लक्षात घेवून त्यातून आनंद मिळवायला शिकले पाहिजे. अपेक्षित उद्दीष्ट साध्य झाले नाहीतर का झाले नाही याची कारणे शोधून त्यावर उपाय करणे किंवा झालेल्या चुका पुन्हा न होवू देणे हा त्यावरील सर्वात सोपा उपाय आहे. अनेकदा ठरवून ही मनाचा निर्धार होत नाही. अशावेळी मला काय हवे आहे हे लक्षात घेवून मनाचा निर्धार पक्का करावा. ते साध्य करण्यासाठी काही कालावधी लागतो हे ध्यानात ठेवाव. शांत मनान चिंतन कराव. स्वत:ला प्रेमाने धीर देवून प्रेमाने जाग ठेवावे. होकारात्मक नजरेने सर्व पहावे याचा निश्चितच फायदा होईल, असा मला विश्वास वाटतो.

मनोविकार असलेले रुग्ण पूर्ण बरे होऊन ‘रुटीन लाईफ’ एन्जॉय करु शकतात. त्यासाठी आवश्यकता आहे कौन्सिलिंग, योग्य औषधे, मेडिटेशन यांची आणि सामाजिक आधाराची.आज प्रत्येकाला जगण्याचा हक्क आपल्या घटनेने दिला आहे. जरी तो मानसिक रुग्ण असला तरीही त्याला जगण्याचा हक्क आहे. म्हणून त्यांची हेटाळणी करु नका, त्यांना मदत करा. मनोरुग्णांना जर आपण आपुलकी, प्रेम, माया दिल्यास त्यांचा आजार बरा होण्यास नक्कीच मदत होईल.

सौजन्य महान्यूज

Leave a Comment