पवना पाईपलाईनचा प्रश्न पेटला,पुणे-मुंबई एक्सप्रेसवर रणकंदन,पोलिसांच्या गोळीबारात चार शेतकरी ठार

पवना धरणाच्या पाण्यावर प्रथम शेतकर्‍यांचा हक्क, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन आठवले गट आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ भागात शांततापूर्वक  आंदोलन सुरु असताना पोलीसांनी त्यावर प्रथम लाठीहल्ला व नंतर गोळीबार केला.पवना धरणातून जलवाहिनी टाकण्यास तळेगाव परिसरातील शेतकर्‍यांनी प्रखर विरोध तीव्र केला असून मंगळवारी सकाळी बऊर येथे हिसक बनलेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार शेतकरी आंदोलक ठार झाले. पोलिसांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कित्येक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाईपलाईन टाकू नये, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन मंगळवारी बंदचे आवाहन केले होते. सकाळपासूनच वातावरण पेटण्यास सुरुवात झाली. मारुती चौकात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. आंदोलकांनी परिवहन सेवेच्या बसेसवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर जमाव आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी बंद समर्थकांवर लाठीमार केला. जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांनी गोळीबार केला. यात तीन पुरुष व एक महिला शेतकरी ठार झाले. गोळीबारानंतर जमाव बिथरला व पोलिसांच्या वाहनासह दिसेल त्या वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. आंदोलनामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा वापरुन हा महामार्ग सुरु केला.
मावळमध्ये पूर्ण बंद असून शेतकरी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. परिस्थिती तणावाची असली तरी ती स्फोटक होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सरकारचे धोरण शेतकर्‍यांच्या विरोधातले असल्याने आगामी काळात आंदोलन सुरुच राहील, असा इशारा मावळचे आमदार संजय भेगडे यांनी दिला आहे. पवना डॅममधील पाणी पिपरी चिचवडला देण्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. यामुळे शेती धोक्यात येण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. हिसक जमाव पांगवण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याचे समर्थन पोलिसांकडून करण्यात आले. दा्रुतगती महामार्ग बंद पडल्याने काही काळ जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरुन वाहतूक सुरु करण्यात आली होती.

पोलीसांचा गोळीबार आणि अमानूष लाठीमार यांचा भाजपाचे मावळयेथील आमदार बाळासाहेब भेगडे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले, आमचे आंदोलन सनदशीर होते. पण आम्हाला शांत सभेत बसले असताना जर असा गोळीबार होत असेल तर महाराष्ट्र शासनासाठी लोकशाही नावापुरतीच आहे असे म्हणावे लागेल. पवना धरणात सध्या साडेदहा टीएमसी पाणी आहे. यातील उपयोगी साठा साडेआठ टीएमसीच आहे यातील शेतकर्‍यांचा वाटा मोठा असावा असे आम्हाला वाटते पण आम्हाला नाममात्र पाणी देण्याची योजना येथे आहे व हे आम्ही सहन करणे शक्य नाही. या भागात सत्तेवरील राजकारण्यांच्या मदतीने ‘धरणे शहरे ’म्हणजे लेक सिटीज बसविली जात आहेत पण आम्हा शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्याचा सुसूत्र प्रकार होतो आहे त्यामुळे आम्हाला आंदोलन करणे भाग पडले आहे.

Leave a Comment