मुंबईच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांसह उच्चाधिकार्‍यांची केली कानउघाडणी

मुंबई- मुंबईतील खड्ड्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मनपा आयुक्त, एमएमआरडीएचे उच्चाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले. महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडे बोल सुनावले. नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्डे पडू लागले तर संबंधित कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याचा त्यांनी इशारा दिला.

पावसाळ्यात रस्त्यांवर पडणार्‍या खड्ड्यांमुळे होणार्‍या जनक्षोभाची गंभीर दखल घेत, याबाबत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासंबंधाने मनपा आयुक्त, एमएमआरडीएचे अधिकारी आणि आयआयटीचे इंजिनिअर्स यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. तसेच रस्त्यांवर पडणारे खड्डे त्वरित  बुजविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनेही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे मुख्यमंत्री म्हणाले. रहदारीची अडचण होणार नसेल तर दुपारी १२ ते ४ या वेळातही काम करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. कंत्राटदारांनी वापरल्या जाणार्‍या डांबर आदी वस्तूंच्या दर्जाची माहिती वेबसाईटवर टाकावी तसेच प्रत्येक साहित्याचा गुणवत्ता दर्जा प्रयोगशाळेद्वारे प्रमाणित करावा आणि त्यांची तपासणी शासकीय अभियंत्यांना केव्हाही करता यावी अशी व्यवस्था करण्याचेही आदेश त्यांनी दिले.  दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये रस्त्यांचे डिझाईन अद्ययावत पद्धतीने करण्याच्यादृष्टीने इंडियन रोड काँग्रेसची प्रमाणके काटेकारपणाने वापरण्यावर भर द्यावा आणि रस्त्याच्या दोषनिवारण कालावधीत रस्ता नादुरूस्त झाल्यास तो रस्ता संबंधित कंत्राटदाराच्या खर्चाने पुन्हा करून घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस मुंबई महानगर पालिका आयुक्त सुबोधकुमार, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना, राज्याचे नगरविकास प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव धनंजय धवड, मबई मनपाचे तज्ज्ञ एन.व्ही. मेराणी, आयआयटी मुंबईचे प्रा. के.व्ही. कृष्णाराव आदी उपस्थित होते.

Leave a Comment