जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधातील कार्यकर्त्यांना मदतीचा हात

पुणे – दि.९ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे महाराष्ट्रातील जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधात केल्या जात असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना सर्व राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरून मदतीचा हात देऊ केला असल्याचे समजते.
  शिवसेनेच्या एका वरीष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीतून दिल्लीकडे जाण्यासाठी या आंदोलनकर्त्यांना रेल्वेची एक बोगीच रिझर्व्ह करून दिली असून त्यासाठी १लाख ८१ हजार रूपये खर्च केला आहे. १५० कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत असे सांगून ते म्हणाले की आमच्या पक्षाने सर्व शक्तीनिशी या प्रकल्पविरोधातील आंदोलनात उडी घेतली आहे. तेव्हा या आंदोलनात सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांना मदत देणे आमचे कर्तव्यच आहे.ही मदत राजकीय हेतूने दिली गेलेली नाही तर आम्ही त्यांच्या बरोबर आहेात हेच त्यातून आम्हाला सांगायचे आहे.
  डाव्या पक्षांनी या आंदोलनकर्त्यांच्या जेवणाची व निवासाची जबाबदारी उचलली असून दिल्लीत येणार्‍या कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था सीपीआय (एम) करणार आहे तर जेवणाची व्यवस्था सीपीआय (एमएल) व सीपीआय करणार आहेत. सीपीआय एमचे महाराष्ट्र राज्य सचिव अशोक ढवळे म्हणाले की महाराष्ट्रातून दिल्लीत या आंदोलनासाठी जाणार्‍यांच्या निवासाची व्यवस्था त्यांचा पक्ष करणार आहे व ते आमचे कर्तव्यच आहे. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनीही कार्यकर्त्यांच्या एक दिवसाच्या जेवणाची व्यवस्था करणार असून प्रत्यक्ष आंदोलनातही ते सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.
 जनहित सेवा समितीचे प्रवीण गव्हाणकर यांनी प्रथमच सर्व राजकीय पक्ष आपपले मुद्दे सोडून एखाद्या आंदोलनात सहभागी होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की या आंदोलनात दोन हजार कार्यकर्ते सहभागी होत असून कम्युनिस्ट नेते प्रकाश कारंत, सीताराम येचुरी, डी.राजा, शिवसेनेचे संजय राऊत व अनेक शास्त्रज्ञ या वेळी प्रकल्पाचे तोटे समजावून सांगण्यासाठी भाषणे करणार आहेत.

Leave a Comment