अमेरिका संपत आहे ?

अमेरिकेचे जगातले वर्चस्व संपत आहे का?असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. ८९ साली जगाच्या राजकारणातून सोविएत संघ ही महाशक्ती लोप पावली आणि अमेरिका ही एकमेव महाशक्ती शिल्लक राहिली. आता अमेरिकाही या राजकारणातून संपणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सोविएत संघ आणि अमेरिका यांची जागा आता भारत आणि चीन घेतील असे गेल्या काही दिवसांपासून सांगितले जात आहे ते खरे ठरण्याची वेळ आली आहे का या अनुरोधाने काही तज्ञ आपली मते मांडायला लागले आहेत. गेल्या काही दिवसांत अमेरिकेपुढे उभी रहात असलेली संकटे पाहिली म्हणजे या चर्चत काही तथ्य आहे असे वरकरणी तरी वाटते कारण अमेरिकेच्या अधःपतनाच्या  अंदाजांना दुजोरा देणार्‍या काही गोष्टी समोर आल्या आहेत.

१९०८ साली अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सील या संस्थेने आपल्या सरकारला एक अहवाल सादर केला असून या अहवालात अमेरिका हा २०२५ साल पर्यंत आपले महाशक्ती हे स्थान गमावून सामान्य देश झालेला असेल असा इशारा दिला आहे. अमेरिकेचे आजचे सर्व क्षेत्रातले वर्चस्व पाहिले तर येत्या १४ वर्षात हा देश एकदम आजच्या रशियासारखा  झालेला असेल यावर विश्वास बसत नाही पण या अहवालात तसे म्हटले असून त्याचे समर्थन केले आहे.  अहवालात रशियाचे अधःपतन असेच अचानक झाले होत याचे उदाहरण देण्यात आले आहे. २०२६ साली अमेरिकेचे स्थान चीनने घेतले असेल आणि २०५० साली भारत अमेरिकेपेक्षा श्रीमंत झालेला असेल असे हा अहवाल म्हणतो आणि अमेरिका संपत आहे या सिद्धांताचे समर्थक वारंवार याच अहवालाच हवाला देत असतात. गंमतीची गोष्ट अशी की अमेरिकेचे अधःपतन  सूचित करणार्‍या या अहवालाखेरीज अन्य कोणताही अहवाल किवा अभ्यास अजून तरी उपलब्ध झालेला नाही. मात्र अमेरिकेपुढे छोटी मोठी अडचण निर्माण झाली की, आता अमेरिका संपणार असे म्हटले जाते आणि त्या म्हणण्याच्या समर्थनार्थ पुन्हा हाच एकमेव अहवाल उद्धृत केला जातो. प्रत्यक्षात अमेरिका ही एक प्रचंड मोठी आर्थिक ताकद आहे. तिच्या सरकारसमोर  दोन किंवा तीन महापद्म डॉलर्सची अडचण निर्माण झाली की या देशाची ऐतिहासिक वगैरे घसरण सुरू झाली असे म्हणता येत नाही. अमेरिका  संपत आहे असे विश्लेषण काही पहिल्यांदा सुरू झालेले नाही.

१९२९ च्या महामंदीत प्रथम अशी चर्चा सुरू झाली होती. या मंदीनंतर अध्यक्ष झालेल्या फ्रँकलीन रुझवेल्ट यांनी या महामंदीला देशातल्या काही हितसंबंधी व्यापार्‍यांनी कशी चालना दिली होती याचे योग्य विश्वेषण केले आणि नंतर  इतके  कडक  कायदे कले की नंतर २० वर्षे अमेरिकेची अर्थव्यवस्था वरचेवर मजबूत होत गेली.१९५० च्या दशकात दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचा उदय झाला आणि रशियापुढे अमेरिकेचा टिकाव लागणार नाही अशी चर्चा सुरू झाली. रशियाने साम्यवादी क्रांतीनंतर आपली स्थिती सुधारली असली तरी मुळात तत्पूर्वी तिथली सामाजिक परिस्थिती फार चांगली नव्हती. परिणामी त्या  स्थितीचे काही अंश उफाळून वर आले आणि १९८९ साली रशियाचाच रंग उडाला अमेरिका टिकून राहिली. त्यानंतरच्या दोन तीन वर्षात अमेरिकेपुढे जपानचे आव्हान आहे असे म्हटले गेले कारण जपानचे दरडोई उत्पन्न अमेरिके पेक्षा जास्त झाले होते. पण जपान या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. आता अशीच अवस्था चीनची आहे. चीन हा देश अमेरिकेला मागे टाकेल आणि अमेरिका संपून जाईल असे आता म्हटले जायला लागले आहे. चीन प्रगती करीत आहे हे खरेच आहे पण अमेरिका चीनपेक्षा वेगाने प्रगती करीत आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चीनच्या प्रगतीला अनेक मर्यादा आहेत. चीनमध्ये अजूनही सरकारी  उद्योग अस्तित्वात आहेत आणि ती चीनच्या प्रगतीतली एक मोठी अडचण आहे. चीनची काही क्षेत्रातली प्रगती अमेरिकेपेक्षा वेगवान आहे. चीनमध्ये गतवर्षी मोटार कारची  विक्री अमेरिकेपेक्षा जास्त झाली. अर्थात अशा एखाद्या निकषावर अमेरिका संपत आहे अशा निष्कर्षाप्रत यणे सयुक्तिक ठरणार आहे का ?

अमेरिकेच्या प्रगतीचे काही आकडेही यावेळी विचारात घेतले पाहिजेत. हे आकडे चीनपेक्षा अधिक पारदर्शकही असतील कारण अमेरिकेत लोकशाही आहे आणि चीनमध्ये मूलभूत हक्कांची गळचेपी आहे. २००८-२००९ या वर्षात अमेरिकेला मंदीचा तडाखा बसला असला तरीही २००० ते २०१० या दशकात अमेरिकेच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नात २१ टक्के वाढ झाली आहे. भारताच्याही उत्पन्नात अशी वाढ झाली असल्याचे दाखवले जाते पण ती वाढ सार्थ नसते. त्यातली बरीच वाढ ही रुपयाच्या घसरत्या किमतीमुळे मोठी दिसत असते.  पण अमेरिकेने १० वर्षात केलेली २१ टक्के वाढ ही सार्थ आहे कारण या काळात डॉलरची किमत आहे तशीच टिकलेली आहे. अमेरिका ही तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन, शेती अशी सर्वांगीण क्रांती केलेली महाशक्ती आहे. लष्करी  दृष्ट्याही तिची बरोबरी करणे कोणाला शक्य नाही कारण जगाच्या पाठीवर ८०० ठिकाणी अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. या बाबतीत चीन तर अमेरिकेच्या जवळपासही फिरकू शकत नाही. अमेरिका हा देश संपणे ही म्हणावी तेवढी सोपी गोष्ट नाही.      

Leave a Comment