लवासा लेक सिटीचे बांधकाम पुन्हा सुरू करावे – गावकरी शिष्टमंडळ

पुणे- पुण्याजवळील लवासा परिसरातील गावकर्‍यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत पर्यावरण व वनमंत्री जयंती नटराजन यांची भेट घेऊन लवासा लेक सिटीचे थांबविण्यात आलेले बांधकाम पुन्हा सुरू करावे अशा आशयाची याचिका त्यांना सादर केली असल्याचे समजते. या शिष्ट मंडळात भोईनी, मुगांव, अदमल, धामणहोळ व मोसे खोरे या गांवातील ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश होता असेही सांगण्यात येत आहे.
पुण्यापासून ६५ किमीवर असणार्‍या लवासा सिटी प्रकल्पात आसपासच्या गावातील आदिवासी नागरिकांच्या जमिनी ताब्यात घेऊन सुमारे १२.५०० एकरांवर बांधकामे करण्यात येत आहेत. मात्र ही बांधकामे करताना पर्यावरणाला नुकसान होत असून पर्यावरण विभागाची परवानगी न घेताच बर्‍याच मोठ्या भागात बांधकामे झाली असल्याची तक्रार केली जात होती. त्यावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी येथील प्रकल्पाची पाहणी करून आणि त्याचे अहवाल मागवून पुढील बांधकामांचे काम बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गतवर्षीपासून येथील उर्वरित काम ठप्प झाले आहे. नॅशनल अलायन्स ऑफ पिपल्स मुव्हमेंटच्या कार्यकर्त्या सुनीती यांनीही मुंबई उच्च न्यायालयात लवासाची बांधकामे पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून केली गेल्यासंबंधातली याचिका दाखल केली होती व त्यांचे म्हणणे मान्य करून उच्च न्यायालयानेही या बांधकामना स्थगिती दिली आहे.
दिल्लीत पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची भेट घेणार्‍या शिष्टमंडळाने मात्र ही बांधकाम थांबल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे ही बंदी उठवून पुन्हा बांधकांमांची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. लवासाचे काम सुरू झाल्यापासून येथील गांवकर्‍यांचे जीवनमान सुधारले होते ते पुन्हा खालावत असल्याचे गांवकर्‍यांचे म्हणणे आहे.
नॅशनल अलायन्स ऑफ पिपल्स मुव्हमेंटच्या सुनीती यांनी मात्र केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना लवासा भागातील गावकरी भेटले आहेत यावरच शंका घेतली असून खरेच असे घडले असेल तर येथील आदिवासींनी जमिनींबरोबरच आपला आत्मसन्मानही विकला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या भागातील नागरिकांना रोजगार मिळण्याच्या विरोधात आम्ही नाही असे सांगतानाच त्यांनी पुणे जिल्हाधिकार्‍यांनी या भागासाठी रोजगार हमी येाजना सुरू करणार असल्याचे मान्य केले असल्याचेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment