पांडुरंगाचे दर्शन घेऊन गजाननाची पालखी संतनगरी शेगावात विसावली

बुलडाणा – संतश्री गजानन महाराजांची संतनगरी शेगाव येथून पायदळ वारी पालखी पंढरपुरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन शुक्रवारी सकाळी ११ वाजता संतनगरी शेगावात परत आली. पायदळ वारीची पंचेचाळीस वर्षाची अखंड परंपरा कायम राखली. परतीच्या मार्गात असतांना १४ वारकरी कंटेनरच्या अपघाताने पांडुरंगवासी झाले. वारकर्‍यांच्या निधनाचे दुःख अंतःकरणात साठवले; परंतु त्या दुःखाचे भांडवल न करता अंतःकरणात पांडुरंगाचा आणि श्री गजाननाचा भक्तीभाव जागवत पालखी शेगाव नगरीत विसावली.
शेगाव संस्थानचे विश्वस्त तथा कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्यासह सर्वश्री श्रीकांतदादा पाटील, रमेशचंद्र डांगरा, शरद शिदे, त्रिकाळ गुरुजी, नारायण पाटील, पंकज शितुत आणि टाकबाबू आदी प्रमुखांनी शेगाव नगरीच्या वेशीवर पालखीचे भावपूर्ण स्वागत केले आणि दर्शन घेतले. पालखीत सहभागी झालेल्या सर्व वारकर्‍यांना भेटवस्तू देऊन आणि श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केला. बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव आणि शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर (मेहकर) हे दोन नेते खामगाव येथून शेगावपर्यंत या पायदळ वारीत सहभागी झाले होते. अडीचशे सेवेकार्‍यांसह ५०० वारकरी या पायदळ दिडी वारीत सहभागी झाले होते. गजराज, अश्व, भगव्या पताका घेतलेले वारकरी, विणाधारी, टाळ-मृदुंगाच्या निनादात ठेका घेत या वारकर्‍यांनी शेगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते शेगाव असा पायदळ प्रवास केला. संतनगरी शेगावच्या पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. अनेक भक्तांनी पालखीवर पृष्पवृष्टी केली. पालखीच्या मार्गात सडा-समार्जन करुन आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या.

Leave a Comment