डहाणू-विरार गाड्यांच्या फेर्‍यांत वाढ करण्याची मागणी

विरार – सध्या लोकसंख्या फार झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला नागरी मुलभूत सुविधा दिवसेंदिवस कमी पडताना दिसत आहेत. विरार-चर्चगेट हा प्रवासही जिकिरीचा होत चालला आहे. त्याचप्रमाणे डहाणू-विरार हा प्रवास जीवघेणा होत चालला आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करताना आपला जीव मुठीत धरावा लागत आहे.
डहाणू ते वैतरणा पट्टा हा शेतकरी वर्ग असलेला भाग म्हणून ओळखला जातो. मात्र काही वर्षापासून या ठिकाणच्या विविध भागांमध्ये मुंबई व आसपासच्या भागातील नागरिक रहावयास आले आहेत. यातील बरेचसे लोक तसेच स्थानिकही नोकरदार वर्गात मोडतात. हे लोक व्यवसायाच्या दृष्टीने या ठिकाणाहून उपनगरात जात – येत असतात. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गर्दीमुळे या भागातील रेल्वेगाड्या कमी पडत आहेत. त्यातच चर्चगेट-डहाणू लोकलचा प्रोजेक्टही कित्येक वर्ष धूळ खात पडला आहे. तसेच येथील दोन गाड्यांच्या अंतरामध्ये एक ते दीड तासांचा विलंब असतो. यामुळे येणार्‍या गाडीत प्रवाशांना स्वतःला कोंबून प्रवास करावा लागतो. प्रवासी वर्गाने गाड्यांच्या फेर्‍या वाढवाव्यात, अशा मागणी वारंवार केली आहे. पण रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

Leave a Comment