एचसीएल ३ हजार तंत्रज्ञांनाची भरती करणार

मुंबई- माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी एचसीएल चालू तिमाहीत ३ हजार तंत्रज्ञांची भरती करणार आहे. यामुळे तरूण तंत्रज्ञांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील आयटीचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असून अनेक आयटी कंपन्यांच्या सॉफ्टवेअरला जगभरातून चांगली मागणी आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक आयटी कंपन्यांनी आपले मनुष्यबळ वाढविण्यास सुरूवात केली आहे. जागतिक पातळीवरील मोठी कंत्राटे मिळविण्यासाठी या कंपन्या कुशल कामगारांच्या संख्येत वाढ करणाचा प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी टीसीएसने ६० हजार कर्मचार्‍यांची भरती करण्याची घोषणा केली होती. विप्रो व इन्फोसिसनेही कर्मचारी भरतीचा धडाका सुरू केला आहे. एचसीएलने नुकत्याच संपलेल्या एप्रिल ते जून या तिमाहीत ३ हजार कर्मचार्‍यांची भरती केली तर चालू तिमाहीत कंपनी आणखी ३ हजार कर्मचार्‍यांची नेमणूक करणार असल्याचे कंपनीतफर्े सांगण्यात आले.
दरम्यान एचसीएलला नुकत्याच संपलेल्या पहिल्या तिमाहीत चांगला नफा मिळाला. नफ्यात ५१.७ टक्के वाढ झाली. गेल्या तीन महिन्यांत निर्यातीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे कंपनीला ५१० कोटी ५ लाख रूपयांचा नफा झाला होता. सॉफ्टवेअरच्या निर्यातीमध्ये मोठी वृद्धी झाल्यामुळे कंपनीच्या उत्पन्नातही २७ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी कंपनीला ३ हजार ३७२ कोटी २ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर यंदा ४ हजार २९९ कोटी ५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले.

Leave a Comment