खरे विश्वासू नेते

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अमेरिकेत एक शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया कोणी आणि कोठे केली याचा काही सुगावा लागू दिला जात नाही. याबाबत काँग्रेसच्या प्रवक्त्याला काही खोदून माहिती विचारली असता, त्याने ती माहिती देण्यास नकार दिला. मोठ्या नेत्यांना आपले काही खाजगी आयुष्य असते, ते त्यांना  जगू द्या, असा युक्तिवाद त्याने केला. पण काही माध्यमांनी त्या हॉस्पिटलचे नाव तर शोधून काढलेच पण त्या नावावरून त्या आजाराच्या नावाचाही अंदाज बांधला. एकंदरीत आजार, उपचार आणि दवाखाना यांचा लोकांना पत्ता लागू नये म्हणून केलेली लपवाछपवी आजाराविषयी अनाठायी कुतुहल निर्माण होण्यास कारणीभूत ठरले. मोठ्या माणसाची प्रत्येकच गोष्ट निराळी असते हे खरे पण म्हणून ही गोपनीयता मनमोहन सिग यांच्या हृदयावरच्या शस्त्रक्रियेच्या वेळी का पाळण्यात आली नाही असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. शेवटी मोठ्या माणसांची लहानसहान गोष्टही महत्त्वाची का असते ? कारण त्या लहान सहान गोष्टींचा परिणाम मोठा असतो. सोनिया गांधीही त्याला अपवाद नाहीत. ख
    त्यांना अमेरिकेच्या त्या रुग्णालयात आता चार दोन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. या चार दोन आठवड्यात भारतात जे काही घडेल त्यात सरकारची भूमिका काय असावी यावर सोनिया गांधी यांचा सल्ला घेता येणार नाही म्हणून त्यांनी आपल्या अनुपस्थितीत हे काम कोणी करावे याचा निर्णय दिला आहे.सध्या सरकारला अनेक बाजूंनी घेरले जायला लागले आहे. लोकपाल विधेयकाचा वाद तर जारीच आहे पण,आता कॉमनवेल्थ प्रकरणातला कॅगचा अहवाल सादर झाला आहे. त्यात दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित  यांना दोषी धरलेले आहे. पंतप्रधान कार्यालयावरही या अहवालात काही दूषण ठेवण्यात आले आहे. आता आता भाजपाने लोकायुक्तांचा अहवाल प्रमाण मानून कर्नाटकातले आपले मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा राजीनामा घेतला आहे तेव्हा ते आता शीला दीक्षित यांचा राजीनामा मागितल्या शिवाय राहणार नाहीत. अशा प्रसंगी काय निर्णय घ्यायचा हे कोण ठरवणार ? प्रत्येक गोष्टीत सोनिया वाक्यं प्रमाणम हा मंत्र म्हणणार्‍या काँग्रेस नेत्यांसमोर आता मोठा प्रश्न पडणार आहे.
    असे होऊ नये यासाठी  सोनिया गांधी यांनी परदेशी जाताना महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चौघांची समिती नेमली आहे. या समितीत राहुल गांधी असणार हे तर उघडच आहे पण त्यांच्याशिवाय कोण आहे याला फार महत्त्व आले आहे. कारण अशा कसोटीच्या क्षणी सोनिया गांधी कोणाला आपले खरे सच्चे सहकारी मानत असतात ते या निवडीतून स्पष्ट झाले आहे. या समितीत संरक्षण मंत्री ए. के. अँटनी, अहंमद पटेल आणि जनार्दन तिवारी ही तीन नावे आहेत. यातले अहंमद पटेल सर्वांना माहीत आहेत. ते सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव आहेत आणि ते कोणत्याही क्षणी समोर कधी येत नाहीत. ते पडद्याआडून सूत्रे हलवत असतात आणि सारे निर्णय घेण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. अगदी केन्द्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत असतानाही.या समितीत चौघे असले तरीही त्यातले कोणीही सोनिया गधी यांना थेट पर्याय म्हणून नाहीत. तरीही त्यातल्या त्यात राहुल गांधी यांना महत्त्व आहे कारण तेच शेवटी गांधी घराण्याचे वारस म्हणून कधी ना कधी पंतप्रधान पदावर दावा सांगणार आहेत आणि सगळे काँग्रेस नेते त्यांना  आग्रह करून पक्षाचा अध्यक्ष करणार आहेत. असे असले तरी  या समितीत त्यांच्याशिवाय अहंमद पटेल यांना घेण्यात आले याला फार महत्त्व आले आहे.
    ए. के. अँटनी हे स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून जाणले जातात. ते सोनिया गांधी यांच्या आतल्या वर्तुळात नेहमीच राहिलेले आहेत. सात वर्षांपासून देशाचे संरक्षण मंत्री आहेत. सोनिया गांधी यांच्या बंगल्यावर कसोटीच्या प्रसंगी होणार्‍या  वरिष्ठ स्तरावरच्या बैठकांत अँटनी यांची उपस्थिती हमखास असते. अहंमद पटेल यांना सोनिया गांधी यांचा स्वीय सचिव असे म्हटले जात असले तरीही त्यांना काँग्रेस पक्षातला सोनिया गांधी यांच्यानंतरचा शक्तिशाली नेता मानले जाते त्या   खालोखाल अँटनी यांचे स्थान आहे. या समितीत जनार्दन द्विवेदी यचे नाव मात्र अनपेक्षित आहे पण ते सध्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि या समितीत एक प्रवक्ताही असावा, जो समितीचे कामकाज जवळून पाहील आणि माध्यमांशी योग्य प्रकारे संवाद करू  शकेल. त्यांच्याशिवायचे दोन प्रवक्ते अगदीच सुमार आहेत. त्यांच्यापेक्षा द्विवेदी अधिक माहीतगार आहेत.पण त्यांनी दोनच दिवसांत सोनिया गांधी यांच्या शस्त्रक्रियेविषयी उवट सुलट विधाने करून आपण या कामाला  पात्र नाही हे सिद्ध केले.
    या समितीत कोण आहे याला राजधानीत महत्त्व आले आहेच पण त्यापेक्षा कोण नाही याला फार महत्त्व आले आहे. कारण या अशा समितीत पंतप्रधान मनमोहनसिग, प्रणव मुखर्जी, आता आता प्रत्येक गोष्टीत सरकारची वकिली करणारे  कपिल सिब्बल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिग्विजय सिग हे असायला हवे हते. निदान त्यांना सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जात असते. यातले प्रणव मुखर्जी तर सरकारच्या अनेक निर्णयांचे शिल्पकार असतात. अशा काही समजुती असल्यामुळे ते समितीत असावेत असे मानले जात होते पण या लोकांना सोनिया गांधी यांच्या अंतर्गत वर्तुळात स्थान नाही असे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनमोहनसिग यांच्या विरोधात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यांना सरकारमध्ये काही महत्त्व नाही असे बोलले जायला लागले आहे. या गोष्टींना आता चालना मिळणार आहे. त्यातल्या त्यात पक्षात कार्यरत असलेला त्यांच्या विरोधातला गट आता त्यांच्याविरुद्ध कामाला लागणार आहे.

Leave a Comment