शिवचरित्र कथनाचा महामेरू उभारणारे बाबासाहेब पुरंदरे – नव्वदीत प्रवेश

भारतासारख्या महाकाय देशात उत्तरेकडून येणार्‍या हजार वर्षाच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर देणार्‍यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे एकमेवाद्वितीय स्थान आहे तेच स्थान गेली पन्नास  वर्षे महाराष्ट्राला शिवगाथा सांगणार्‍यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आहे. महाराष्ट्राला आज शिवाजी महाराज माहीत आहेत त्यात बाबासाहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेब आज नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेली साठ वर्षे बाबासाहेबांनी एकच ध्यास सांभाळला आहे तो म्हणजे महाराष्ट्रा तील सामान्य माणसाच्या जीवनात शिवाजी महाराजांचे आदर्श आले पाहिजेत. दहा हजार भाषणे आणि ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाची काही लाखाच्या अनेक आवृत्या असा पल्ला बाबासाहेबांमी गाठला याच्या मुळाशी शिवचरित्राचा भाव जागा करण्याची अतिशय उत्कट अशी उर्मी हे एकमेव कारण होय. शिवकालाच्या पूर्वी एक हजार वर्षे उत्तरेकडून येणारे आक्रमण थोपविण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही पण त्यातून यशोगाथा उभ्या राहण्याऐवजी हौतात्म्यगाथाच उभ्या राहिल्या. त्यामुळे शिवचरित्र हा केवळ सनावळ्यांचा इतिहास नसून ती युगायुगातून उभी राहणारी राष्ट्रउभारणीची संहिता आहे. आणि बाबासाहेबांचे वैशिष्ठ्य असे की, १९५०च्या काळात पोटापाण्यासाठी त्या काळी शक्य असणारे भाजी विक्री, पुस्तकविक्री, मास्तरगिरी, भडजीगिरी, प्राध्यापकगिरी हे सारे पर्याय बाजूला ठेवून त्यांनी शिवचरित्र कथन करण्याचे ब्रीद घेतले. त्यातून पोटापुरते मिळवण्याचे ध्येय बाजूला राहो पण त्यातून मिळणारी भाषणमालेची बिदाग्यांची सारी रक्कम शिवसृष्टी उभारणीसाठी राखून ठेवली त्यातून अशा स्वरुपाचे काम करणार्‍या अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि आता प्रत्यक्ष शिवसृष्टीही उभी राहात आहे. बाबासाहेबांना जबरदस्त सामर्थ्याची स्मरणशक्ती आणि असामान्य वक्तृत्व यांची देणगी असल्याने संसाराला लागणारा चांगला व्यवसाय करण्यासाठी चांगली प्राप्ती मिळणारे अनेक व्यवसाय उपलब्ध झाले असते पण तो रस्ता सोडून त्यांनी शिवशाहीरीचा बिकट रस्ता स्वीकारला आणि अनेक अग्नीदिव्यातून बाहेरपडून आज प्रचंड मोठे काम केल्याची कृतकृत्यता त्यांच्या जमेच्या खात्यावर आहे.
पु ल देशपांडे यांनी म्हटलय, ‘जगण्यासाठी माणसाला फार महत्वाची गोष्ट मिळावी लागते ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. बाबासाहेबांना हे प्रयोजन वयाच्या १६व्या, १७व्या वर्षीच गवसल. ते म्हणजे शिवचरित्र लिहिण्याच. हे प्रयोजन सापडल्यावर पुढील्या बिकट वाटांचे राजरस्ते झाले. एका मास्तरच्या बळवंत नामक मुलाला शिवनेरीच्या शिवरायानं झपाटलं. त्या झपाटलेल्या स्थितीत त्यांचा जीवनप्रवास सुरु आहे व सुरुच राहणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे. पण त्याच्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधाने करायची नाहीत अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. अंतःकरणातला कवि मोहोरबंद ¬- गडेदार भाषा लिहितो पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही. वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.हा इतिहासकार भूतकाळाइतकाची वर्तमानाशी जुळलेला आहे.’ पु.ल.देशपांडे यांनी बाबासाहेबांचे जे अचूक शब्दचित्र रंगवलय ते समर्पक आहे.
आज नव्वदाव्या वर्षी बाबांचा उत्साह अक्षरशः तरुणांना लाजवणारा आहे. अजूनही त्यांना तीन हजार पानांचे शिवचरित्र लिहायचे आहे व त्याची तयारी सुरु आहे त्यातूनच अनेक पुस्तके होणार आहेत त्याच प्रमाणे दुसर्‍या बाजूला शिवसृष्टी उभे करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. बरेचसे काम पूर्णही झाले आहे. शिवाय दररज कोठे ना कोठे कोणत्या तरी महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवचरित्राचे पैलू पुढे येतच असतात. त्यांच्या त्या प्रेरक उत्साहाला विनम्र अभिवादन. बाबासाहेबांनी ही सारी तयारी कशी केली याची ते जेंव्हा मनोरंजन हकिगत सांगतात तेंव्हा आश्चर्य वाटते.साठ वर्षापूवीं सारा विदर्भ बाबासाहेबांनी राजाभाउ देशपांडे यांच्या बरोबर पिजून काढला आहे. अजूनही राजाभाउंची आठवण निघाली की बाबासाहेब अतिशय दुःखी होतात.
    बाबासाहेबांचा कुंडलीवर विश्वास आहे की नाही पण कुंडलीत  विशोत्तरी महादशा नावाची एक चितनशैली आहे. प्रत्येकाने भक्कमपणे काम करत एकशेवीस वर्षे जगावे अशी अपेक्षा त्यात व्यक्त झालेली असते. शिवचरित्राच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी बाबासाहेबांना एक विशोत्तरी मिळावी ही सर्व गृह आणि तारे यांच्या चरणी प्रार्थना
– मोरेश्वर जोशी, पुणे

Leave a Comment