मुंबईतला ताज महाल वादात

जगातले सर्वात महाग घर म्हणजे  मुकेश अंबानीचे अँटीलियो हे घर आता अनेक प्रकारच्या वादात सापडले आहे कारण मुळात ज्या जागेवर हे २७ मजली घर उभे आहे ती जागा नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहेच पण या घराच्या खर्चिकपणा वरून निर्माण झालेला वैचारिक वादही जारी आहे. हे घर एक एकर आठ गुंठे जागेवर उभे आहे. मुंबईच्या अल्टामोंट रोडवर आहे. आज मबईत जागांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. ही जागा पूर्वी कधी तरी हजारभर रुपयांना एकर या भावात खरेदी केली असेल पण आता एका चौरस फुटाला दहा हजार रुपये लागत आहेत. अल्टामोंट रोड हा  जगातला दहाव्या क्रमांकाचा महाग रोड समजला जातो. अशा या रस्त्यावर इमारत बांधायची म्हटले की वाद होणारच कारण आता जागेला सोन्याची किमत आली आहे. ही जागा वक्फ बोर्डाची आहे. वक्फ बोर्ड ही मुस्लिमांच्या धार्मिक  कामांसाठी राखून ठेवलेल्या जागांचे नियंत्रण करीत असते. या जागा सरकारने दिलेल्या असतात आणि बोर्ड केवळ त्या जागांचे रक्षण करीत असते. पण अंबानीच्या या इमारतीसाठी वापरलेली जमीन या बोर्डाने अंबानीला विकून त्याच्याकडून भक्कम रक्कम घेतली आहे.

          या जगात पैसा पैसा करून कसेबसे जगणारे अनेक लोक आहेत. ते प्राथमिक गरजांनासी मोतद आहेत पण याच देशात आपल्या जवळचा पैसा कसा खर्च करावा या विवंचनेत असणारेही लोक आहेत. त्यांनी आपली संपत्ती कितीही उधळली तरी ती संपत नाही. ही सामाजिक विषमता आपल्या मनाला पोखरत असते पण या लोकांचे पैसे कमवणे आणि उधळून गरिबांच्या मनाला डागण्या देणे काही संपत नाही. इन्फोसिसच्या संचालक सौ. सुधा मूर्ती यनी हजारो रुपयांची कमाई असूनही केवळ दोन बेडरुमचे घर बांधले. अनेकांना आश्चर्य वाटले. लोकांनी प्रश्न विचारला, एवढ्या  श्रीमंत असूनही तीनच खोल्यांचे घर ? त्यावर त्या बोलल्या, घर हे आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी नसते, ते आपल्या सोयीसाठी असते. कोणी कितीही मोठा श्रीमंत झाला तरी त्याची झोपण्याची सोय एका खोलीत होऊ शकते. श्रीमंत झाला म्हणून काही एका वेळी दोन खोल्यांत झोपत नाही. जगातल्या अनेक श्रीमंतांना हे कळले तर किती बरे होईल ? अंबानीने बांधलेले हे घर कायद्याने तर वादग्रस्त ठरले आहेच पण ते अशा अर्थाने वैचारिक दृष्ट्याही फार वादग्रस्त ठरले आहे. रतन टाटा सहित अनेकांनी या  घराबद्दल नापसंती दर्शविली आहे.

Leave a Comment