राज ठाकरे हिंदीत बोलले

राज ठाकरे यांचा आठ दिवसांचा गुजरात दौरा सुरू झाला आहे. दौर्‍यावर अनेक कोनांतून चर्चाही होते आहे.राज ठाकरे गुजरातेत जाऊन तिथल्या लोकांशी कोणत्या भाषेत बोलतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. दौरा सुरू होताच असे लक्षात आले की तिथे ते  चक्क हिदीत बोलत आहेत. हिदीत म्हणजे त्याच भाषेत जिच्यात बोलणार्‍या भैय्यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी राज्यात मोठे आंदोलन सुरू केले आहे. हिदी तर यूपी आणि बिहारची भाषा आहे. मनसे आमदारांनी त्याच भाषेत विधानसभेत शपथ घेणार्‍या अबु आझमीच्या शब्दशः कानाखाली आवाज काढण्याचे मोठे साहसी कृत्य केले होते. अर्थात त्याबद्दल त्यांच्या ११ आमदारांचे सदस्यत्व रद्द झाले. मग राज ठाकरे यांनी मराठीचा अभिमान सोडून दिला. राज ठाकरे ज्या ठोसपणाने बोलतात त्यावरून ते या बाबतीत अभिमानी भूमिका घेतील असे वाटले होते. आमदारपद गले तरी बेहत्तर पण मराठीच्या बाबतीत तडजोड  करणार नाही असे ते म्हतील असे वाटले होते पण त्यांनी मराठीच्या बाबतीत तडजोड केली आणि आपल्या आमदारांचे  आमदारपद परत मिळवले.

      एकंदरीत ते आता गुजरातच्या दौर्‍यावर गेले आहेत त्यामुळे तिथे ते मराठीतच बोलण्याचा आग्रह धरून आपला मराठी बाणा कायम राखतील असे वाटले होते. पण तिथे ते चक्क हिदीत बोलले आहेत. तिथेही त्यांनी मराठीचा अभिमान सोडून दिला. याचा अर्थ राज ठाकरे यनी हिदीत न बोलण्याची शपथ वगैरे घेतली आहे असा होत नाही. ते हिदीत बोलले म्हणून काही बिघडत नाही असे कोणी म्हणेल पण याबाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राज ठाकरे गुजरातेत गेले आहेत. हिदी ही गुजरातचीही भाषा नाही. मोदींचीही भाषा नाही. आणि राज ठाकरे यांचीही भाषा नाही. मग या भाषेत बोलण्याची गरजच काय ? राज ठाकरे यांनी तिथे मराठीचा किवा गुजरातीचा आग्रह धरायला हवा होता. पण हे भान त्यांना येणे शक्य नाही कारण ते खरे मराठीचे अभिमानीही नाहीत आणि खरे हिदीचेही द्वेष्टे नाहीत. त्यांचा मराठीचा अभिमानही खोटा आणि हिदीचा द्वेषही लटका आहे. हे प्रेम आणि हा द्वेष हे त्यांनी मतांसाठी आणि सत्तेसाठी पांघरलेले बुरखे आहेत. म्हणूनच ते गुजरातेत गेल्याबरोबर त्यांना मराठीचा विसर तर पडलाच पण आपण हिदीत बोलायला नको हेही त्यांच्या लक्षात आले नाही.

      मध्यंतरीच्या काळात मनसेच्या  जबरदस्त हिंदीद्वेषाच्या भराच्या काळात मनसेच्या काही समर्थकांनी हिदीच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली होती. त्यातच एका नामवंत मराठी कवीने हिदी ही भारताची राष्ट्रीय भाषा कशी नाही हे पटवून देण्यासाठी फार मोठा इतिहास उकरून काढला होता. भारतीय घटनेने हिदीला हा दर्जा कसा नाकारला होता याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. हे करून आपण राष्ट्रीय एकात्मतेत कसली भर घालतोय याचे काही भान त्यांना नव्हते. हिंदी ही काही केवळ मुंबईत ‘लोंढ्याने’ येणार्‍या युपी, बिहारच्या लोकांचीच भाषा नाही. ती भारताच्या मोठ्या भूभागावर बोलली जाणणारी भाषा आहे. ती अनेकांची भाषा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर ती राज ठाकरे यांचीही भाषा आहे आणि राज ठाकरे यांचे स्वागत करताना ती नरेन्द्र मोदी यांचीही भाषा आहे. दोन भिन्न प्रादेशिक भाषा बोलणारे दोन लोक समोरासमोर आले तर त्यांच्यातली संवादाची दरी कमी करण्यासाठी केवळ हिदीच उपयोगी पडते हे विसरू नका. हिदीचे हे सामर्थ्य   महात्मा गांधी यांना चांगलेच जाणवले होते. पण त्यासाठी त्यांनी पूर्ण देशाचा दौरा केला होता.

      काही लोकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदीला विरोध केला. तो काळ १९६० सालचा होता. आता सगळ्याच नद्यांचे पाणी अनेक पुलांखालून वाहून गले आहे. हिदीचा पराकोटीचा द्वेष करणार्‍या तामिळनाडूत आता अनेक  हिदी भाषिक स्थायिक झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या  विधानसभा निवडणुकीत तिथल्या दा्रमुक उमदेवारांनी आपला पक्ष हिदीद्वेष्टा नाही हे जाहीरपणे सांगितले. केवळ राजकारणा साठी भाषाभेदाला खतपाणी घालणारे नेते मतांची गरज पडल्यास परक्या भाषांचे गोडवेही गायला लागतात. तेव्हा त्यांचा फारसा विचार न करता आपण भाषांचा सामाजिक आशय आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे महत्त्व यांनाच महत्त्व दिले पाहिजे. भाषा लोक बोलत असतात. त्यांना लोकांच्या व्यवहारातून आकार येत असतो. भारतीय घटनेने काही राजकारण्यांना दुखवायचे नाही म्हणून हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही पण तो भारताच्या जनतेने आपल्या व्यवहारातून दिला आहे. केरळ आणि तामिळनाडूच्या  खेड्यापाड्यात हिंदी सिनेमाला गर्दी करणार्‍या त्या प्रेक्षकांनी तो दर्जा दिलेला आहे.

      राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केला हे बरे झाले कारण त्यामुळे त्यांचे पाऊल महाराष्ट्राच्या बाहेर तरी पडले. त्यामुळे त्यांची दृष्टी थोडी व्यापक व्हायला मदत होईल. महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा म्हणता म्हणता त्यांना मी भारताचा आणि भारत माझा, सारे भारतीय माझे बांधव आहेत याची प्रचिती येईल. संकुचित प्रादेशिक भावनेच्या पलीकडे भारताच्या सर्व प्रांतात एक राष्ट्रीयत्वाचा प्रवाह कसा वहात असतो याचा त्यांना साक्षात्कार तरी होईल. त्यांना आता गुजरातेत किती मराठी माणसे आहेत हेही पाहता येईल. आपण मुंबईत येणार्‍या हिदी भाषकाचा द्वेष करतो तसा गुजरातेत मराठी आणि बिहारी लोकांचा कोणी द्वेष करीत नाही हेही राज ठाकरे यांना पहायला मिळेल. त्यांनी हा दौरा आणखी वाढवला आणि भारतातल्या आणखी काही राज्यांचा दौरा केला तर आणखीच बरे होईल.त्यांनी बिहारला जाऊन यायला काही हरकत नाही तिथे नितीशकुमार यांनीही उत्तम प्रशासन दिलेले आहे. त्यांचाही अभ्यास करण्यासरखा आहे.

 

Leave a Comment