नेतृत्व बदलाची हूल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आता पद सांभाळून बरेच दिवस झाले पण अजून तरी सत्ताधारी पक्षात नेतृत्व बदलाची हूल उठली नव्हती. अशा बदलासाठी नेहमीच सज्ज असणारे हितसंबंधी मंडळी काय झोपी गेली की काय असे वाटायला लागले होते तोच आता मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या  कार्यपद्धती विषयी निनावी तक्रारी आणि त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण होत असल्याच्या बातम्या पेरायला सुरूवात झाली आहे. ते फार मंदगतीने काम करीत आहेत अशा वदंता पसरवल्या जात आहेत. प्रत्येक गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय ते सही करीत नाहीत, याबाबत ते कमालीचे दक्ष आहेत, असे म्हटले जात आहे. गंमतीचा भाग असा की ही सारी माहिती  कुजबुज मोहिमेच्या स्वरूपात पसरवली जात आहे आणि   कोणत्या फायलींना विलंब झाला आहे हे कोणीच उघडपणे सांगत नाही. अशा मोहिमा सुरू होतात तेव्हा त्यात तथ्य कमी असते आणि हितसंबंधांचा खेळ जास्त असतो. तेव्हा यातल्या हितसंबंधांच्या खेळाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तसे ते केले तर केवळ अफवा आणि हेतूपूर्वक केलेला अपप्रचार या शिवाय हाती काही लागत नाही.
    महाराष्ट्राच्या मंत्रालयात काही फायली प्रलंबित आहेत आणि निर्णयाविना पडून आहेत ही काही नवी गोष्ट नाही. महाराष्ट्राचेच काय पण कोणतेच शासन फायलींचा निपटारा करण्याबाबत प्रसिद्ध नाही. मग पृथ्वीराज चव्हाण यांच्याच फायलींच्या ढिगाची चर्चा का होत आहे ? कारण, ते  एखाद्या चुकीच्या  सहीमुळे आपला अशोक चव्हाण होऊ नये याबाबत दक्ष आहेत. तसे त्यांनी असलेच पाहिजे कारण त्यचे आजपर्यंतचे रेकॉर्ड तसे स्वच्छ आहे. दुसरी बाब म्हणजे सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही  सरकारी यंत्रणेत या सावधगिरीने कामाचा वेग कमी झाला आहे. एखादे बेकायदा काम आपल्या हातून आणि आपल्या सहीने झाले तर ते खपून जाईलच याची आता कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. पण ही गोष्ट किती लावून धरायची याला काही मर्यादा आहे की नाही ? माध्यमांमध्ये तर दोन्ही बाजूंनी टीका होत असते. कामाचा वेग कमी झाला तरीही माध्यमांत  मुख्यमंत्री प्रशासनाला गती देत नाहीत अशी ओरड होते. आणि वेगाने कामे केली तर एखादी चूक होते. तशी एखादी तांत्रिक चूक झाली तरीही लगेच त्या चुकीचे गांभिर्य नेमके किती याचा कसलाही विचार न करता ब्रेकिग न्यूज होते. मग मुख्यमंत्र्यांनी काम करावे तरी कसे ?
    असे प्रश्न पडत असले तरीही मुख्यमंत्र्यांच्या संबंधात या अफवा का पसरविल्या जात आहेत ही गोष्ट नीट समजावून घेतली पाहिजे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलला की त्याला फार तर दोन तीन महिने सुरळीत काम करू दिले जाते. नंतर लगेच त्याच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे  चहाड्या करणे सुरू होते.  शिष्टमंडळे दिल्लीला जायला लागतात. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धती विषयी काही चुकीची आणि काही बरोबर माहिती श्रेष्ठींच्या कानावर घालणे सुरू होते. आता बाबांचा दिल्लीतला वशिला दांडगा असल्यामुळे त्यांच्या विरोधात कागाळ्या करणारांची डाळ काही शिजणार नाही. म्हणून मुंबईतच मोहीम सुरू झाली आहे. चव्हाण मुख्यमंत्री राहणार असतील तर राज्यात काँग्रेसला पुन्हा काही निवडून येता येणार नाही असे वातावरण तयार केले जात आहे. हे सारे त्या लोकांचे खेळ आहेत जे मंत्रालयातून बेकायदा कामे करून घेण्यास सोकावलेले आहेत. त्यांची कामे आता होत नाहीत म्हणून ते चिडलेले आहेत. आपल्या लोकशाहीत कामे करणारा कार्यकर्ता हा एक निर्णायक घटक आहे. आपल्या मतदारसंघातल्या लोकांची मुंबईतली कामे तो करीत असतो. म्हणून आमदार निवासातल्या खोल्या नेहमी अभ्यागतांनी खचाखच भरलेल्या असतात. खरे तर कायद्याने अशा अनाहूत लोकना आमदार निवासात राहता येत नसते पण हा  प्रकार सर्रास चाललेला असतो. 
    तो इतका सर्रास आहे की, तो बेकायदा आहे याची कोणाला जाणीवही नाही. यातले बरेच लोक आमदाराला हाताशी धरून कामे करून घेण्यासाठी आलेले असतात. या कामातली बहुतेक कामे नियमात बसणारी नसतात. पण आमदार आपले वजन खर्चून ती करून घेत असतात. त्याचे आपल्या मतदारसंघातून निवडून येणे अशी कामे करण्यावर अवलंबून असते. त्यामुळे त्याला ती कामे करावी लागतात आणि मंत्र्यांना या आमदारांची गरज असते म्हणून ते आपले वजन वापरून ती कामे करून देत असतात. लोकशाहीत आमदाराचे हे कामच आहे असे सर्वांना वाटते. आता पृथ्वीराज चव्हाण अशी कामे करीत नाहीत. ती कामे नियमात बसणारी आहेत की नाही याची खात्री करून घेतात. त्यामुळे सारे आमदार कामे न करणारे आमदार ठरायला लागले आहेत. आमदार जी कामे करीत असतात ती कायदेशीर असतील तर त्यासाठी या आमदारांच्या  मध्यस्थीची  गरजच नसते. ती सरकारी कार्यालयातूनच झाली पाहिजेत पण आपल्या देशात लोकांनाही वाईट सवय लागली आहे. लहान सहान कामही आपले आपण कार्यालयात जाऊन करून घेण्याऐवजी ते काम घेऊन आमदाराच्या दरबारात हजेरी लावण्याची खोड त्यांना जडली आहे. यातून आमदारांनाही एरवी सहज  आणि आपोआप होणारी कामेही आपल्यामुळेच झाली असे दाखवण्याची संधी मिळते.  हाच त्यांचा जनसंफ आणि नेतृत्वाची कसोटी झाली आहे. या लोकांना आता मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती पचनी पडेनाशी झाली आहे. त्यातूनच हा असंतोष निर्माण झाला आहे. तो नीट समजावून घेतल्यास बाबांच्या बदनामीमागचे खरे कारण उमगायला लागते.

Leave a Comment