जर्मन बेकरी १५ ऑगस्टपासून पुन्हा ग्राहकांच्या सेवेत रूजू होणार

पुणे -पुण्याच्या कोरेगांव पार्क भागातील बॉम्बस्फोटात उध्वस्त झालेली जर्मन बेकरी स्वातंत्रदिनी म्हणजे१५ ऑगस्टपासून पुन्हा ग्राहकांच्या सेवेत रूजू होणार असल्याचे बेकरीचे भागीदार राजन उदाने आणि विजय शेवाळे यांनी सांगितले. या बेकरीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हावे अशी या भागीदारांची इच्छा आहे. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन असल्याने त्या दिवशी कदाचित उपमुख्यमंत्री अन्य कार्यक्रमांमुळे उपलब्ध होऊ शकणार नसतील तर हे उद्घाटन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
  विजय शेवाळे आणि राजन उदाने यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ फेब्रुवारी २०१० च्या स्फोटात ही बेकरी पूर्णपणे उध्वस्त झाली होती. ती पुन्हा उभी करण्यासाठी अजित पवार यांनी खूपच सहाय्य केले आहे व त्यामुळे त्यांच्याच हस्ते या बेकरीचे उद्घाटन व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. सध्या बेकरीचे पहिल्या मजल्याचे १६०० चौ.फूटांचे काम पूर्ण झाले असून अन्य ४४०० चौ.फूटांचे काम तीन चार महिन्यात पूर्ण होणार आहे. सध्या काम पूर्ण झालेल्या जागेत एकावेळी ८० ग्राहकांची व्यवस्था होऊ शकणार असून सुरवातीला खाद्यपदार्थ बाहेरून तयार करून आणण्यात येणार आहेत व येथे ते सर्व्ह केले जाणार आहेत असेही शेवाळे यांनी सागितले. नवीन बंधकामात वाहनतळाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment