राज ठाकरे ३ ते ११ ऑगस्ट गुजराथ दौर्‍यावर

मुंबई- जगातील महासत्तांच्या गतीने प्रगतीकडे झेपावणार्र्या गुजरातच्या जनतेची प्रगती बघण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इच्छा असून त्यासाठी ३ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान राज ठाकरे गुजराथ दौर्‍यावर जात असल्याचे वृत्त आहे.गुजराथ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीनंतर आणि काँग्रेसकडून वारंवार कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकविण्याचे चाललेले प्रयत्न हाणून पाडून सलग तिसर्‍यांदा मोदींनी गुजराथची सत्ता मिळविली आहे. इतकेच नव्हे तर गुजराथी जनतेवरही नरेनभाईंनी चांगलाच प्रभाव निर्माण केला. गुजराथचा विकास त्यांनी ज्या वेगाने साधला आणि ते करत असताना जनतेच्या मनातले आपले स्थानही ज्या पद्धतीने अढळपदावर नेले त्यामागची नक्की  कौशल्य काय हे जाणून घेण्याची राज यांची इच्छा आहे. त्यासाठी ते गुजराथ दौर्‍यावर जात असून ३ ऑगस्ट रोजी म.गांधींच्या साबरमती आश्रमापासून या दौर्‍याची सुरवात होत आहे. मोदी यांनी यापूर्वीच राज ठाकरे यांना गुजराथ भेटीचे आमंत्रण दिले होते.
    साबरमती आश्रमास भेट दिल्यानंतर राज यांच्यासाठी राजधानी गांधीनगर येथे गुजराथ सरकारमधील अधिकारी एक प्रेझेंटेशन देणार आहेत असेही समजते.त्यात गुजराथच्या विकासाचा प्रवास त्यांना उलगडून सांगितला जाणार आहे. औद्योगिक विकास, सेझ, झोपडपट्टी पुनर्वसन, राज्यात राबविले गेलेले सौर, पवन आणि जल उर्जेचे प्रकल्प, जलसंधारण, जलपुनर्भरण, रस्ते विकास, पर्यटन विकास अशा राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यावर चर्चाही केली जाणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी राज मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. या भेटीनंतर त्यांचा गुजराथ दौरा सुरू होणार असून त्यात गुजराथेतील बहुतेक सर्व महत्त्वाच्या शहरांना ते भेटी देणार असून तेथे राबविण्यात आलेल्या विकास प्रकल्पांची माहिती घेणार आहेत.
  या संदर्भात मनसेतर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात गुजराथच्या धर्तीवरच महाराष्ट्रच्या विकासाच्या हेतूने राज गुजराथ दौर्‍यावर जात असल्याचे म्हणण्यात आले आहे.

Leave a Comment