अण्णा हजारेंना उपोषणाची परवानगी नाकारली

पुणे – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या १६ ऑगस्टपासून जंतरमंतर समोर सुरू होणार्‍या आमरण उपोषणाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याचवेळी सरकारनेही जंतरमंतर व संसद परिसरात १६ ऑगस्टपासून १४४ कलम लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. जमावबंदीसाठी लागू करण्यात येणार्‍या या कलमामुळे अण्णांच्या आंदोलनाला सुरू होण्याअगोदरच कायद्याचा हिसका दाखविण्यात आला आहे.
  केंद्रीय मंत्रीमंडळाने पंतप्रधान, न्यायपालिका व सीबीआयला वगळून मंजूर करण्यात आलेला लोकपाल विधेयक मसूदा म्हणजे निव्वळ फसवणूक असल्याने आपण १६ ऑगस्टपासून जंतरमंतरवर आमरण उपोषणास बसणार आहोत असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या राळेगण सिद्धी गावी गुरूवारी जाहीर केले होते. त्याचबरेाबर आपल्या या आंदोलनात सारा देश सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सागितले होते आणि दिल्ली पोलिसांकडे त्यासाठीची आवश्यक परवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. भ्रष्टाचार विरोधात भारत आंदोलनातील त्यांच्या सहकारी माजी पोलिस महासंचालक किरण बेदी यांनीही या आंदेालनाच्या वेळी योगगुरू रामदेव बाबा यांच्या आंदोलनाच्यावेळी जो प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिस संरक्षण घेण्यात येईल अशीही माहिती दिली होती. मात्र याच काळात दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या २००९ सालच्या निर्देशांप्रमाणे या काळात दिल्लीत कोठेही बेमुदत बंद अथवा निदर्शने करता येणार नाहीत असे दिल्ली पोलिसांनी सांगून अण्णांच्या आंदेालनाला परवानगी नाकारली असल्याचे समजते.
   मात्र दिल्ली बाहेर अण्णांना आंदोलन करावयाचे असल्यास ते करू शकतात किवा त्यांनी आंदोलनाची तारीख बदलावी असेही अण्णांना दिल्ली पोलिसांकडून कळविण्यात आले असल्याचेही वृत्तआहे.

Leave a Comment