विक्रमादित्य सचिन तेंडूलकर

विक्रमादित्य,मास्टर ब्लास्टर,सच्या,तेंडल्या अशा अनेक प्रेमळ टोपण नावाने ओळखला जाणारा सचिन रमेश तेंडुलकर हा आज जगातल्या क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य वाटणारे क्रिकेटमधले अनेक विक्रम त्याने लीलया मोडीत काढले. अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आणि अजूनही वयाच्या ३९व्या वर्षी तो नवनवीन विक्रम करण्यास सक्षम आहे. कसोटी क्रिकेटमधील आणि एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक शतके हे दोन डोंगराएवढे विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्याची थक्क करून टाकणारी कामगिरी पाहिल्यावर त्याला `देव’ मानणारे चाहते काही कमी नाहीत.

सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तेंडुलकर कुटुंबीयांना त्या काळातले प्रतिथयश हिंदी सिने-संगीतकार सचिन देव बर्मन यांचे संगीत फार आवडायचे. त्यामुळेच तेंडुलकरांनी त्याचे नाव सचिन ठेवले. लहानपणापासूनच सचिनला क्रिकेटचे जबरदस्त आकर्षक होते. सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने सचिनचे हे क्रिकेट वेड लहानपणीच ओळखले होते. दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत शिकत असताना सुप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून तो क्रिकेटचे धडे गिरवायला लागला.

अजित तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर या दोघांचा सचिनच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्या महानतेची चुणूक तो शाळेत असतानाच बघायला मिळाली. हॅरिस शिल्डच्या स्पर्धेत आपला मित्र विनोद कांबळीबरोबर त्याने ६६४ धावांची अफाट भागीदारी केली. तेथूनच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या भागीदारीनंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

१९८८/८९ साली त्याने पहिल्यांदा प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुंबई संघाकडून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या वेळी त्याचे वय होते अवघे १५ वर्षे आणि २३२ दिवस. गुजरातविरुद्धच्या या सामन्यात त्याने नाबाद शतक झळकावले. रणजी चषक, दुलीप चषक आणि इराणी चषक या तीनही स्पर्धांच्या पहिल्या सामन्यांत शतक झळकवणारा तो आजपर्यंतचा एकमेव खेळाडू आहे.

त्याच वर्षी भारताच्या पाकिस्तान दौर्‍यासाठी त्याची निवड झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला त्याचा प्रवेश थोडासा निराशाजनक राहिला. पाकिस्तानच्या दौर्‍यात त्याला शतक झळकवता आले नाही. त्यामुळे `शतक झळकवणारा जगातील सर्वांत तरुण खेळाडू’, हा विक्रम त्याला आपल्या नावावर करता आला नाही. पहिल्या कसोटी शतकासाठी त्याला १९९० सालच्या इंग्लंड दौर्‍याची वाट पाहावी लागली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला खरा सूर गवसला तो १९९१-९२च्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यामध्ये. या दौर्‍यात पर्थ येथे त्याने शतकी खेळी केली. सचिनला आपल्या एकदिवसीय सामान्यातील पहिल्या शतकासाठीही ७९ सामने वाट पाहावी लागली. श्रीलंकेतील कोलंबो येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ सप्टेंबर १९९४ साली त्याने एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक झळकवले.

त्यानंतर मात्र त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करायला सुरुवात केली. तो एक एक विक्रम लीलया मोडत गेला आणि नवीन विक्रम प्रस्थापित करत गेला.

कसोटी क्रिकेटमधील लिटिल मास्टर सुनील गावस्करच्या नावे असलेला ३४ शतकांचा विक्रम त्याने २००५ साली मोडीत काढून दिल्ली येथे श्रीलंकेविरुद्ध ३५वे शतक झळकावले. विस्डेन या खेळांसाठी वाहिलेल्या सुप्रसिद्ध नियतकालिकाने त्याला सर डॉन ब्रडमननंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित केले आहे. इतरही अनेक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. त्याची यादी भली मोठी होईल.

एकदिवसीय सामन्यातही त्याने अनेक विक्रमांची नोंद केली. सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा (१४ मार्च २०११पर्यंत १८,००८), सर्वाधिक शतके (४८), सर्वाधिक मैदानांवर खेळी (८९), ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यू झीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्ध सर्वाधिक शतके, शंभरहून अधिक बळी, १०,००० धावा करणार्‍या खेळाडूमध्ये सर्वाधिक सरासरी… असे अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत.

सचिन तेंडुलकरला नियमित गोलंदाज म्हणता येणार नाही. नियमित गोलंदाज जेव्हा अपयशी ठरायला लागतात अशा वेळी साधारणपणे सचिनसारख्या अनियमित गोलंदाजांकडे चेंडू देण्याची प्रथा आहे. अनेक न फुटणार्‍या फलंदाजांच्या जोडय़ा फोडून सचिनने याही क्षेत्रात आपली यशस्वी कामगिरी नोंदवलेली आहे. त्याने १३२ कसोटींमध्ये ३५ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळी अशी समाधानकारक कामगिरी केली आहे. १९९७-९८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने १० षटके आणि ३२ धावांत ५ बळी घेतले होते आणि ऑस्ट्रेलियाकडे पूर्णपणे झुकलेला सामना भारताकडे झुकवून दिला होता.

क्रिकेटच्या खेळातील अनेक विक्रम मोडीत असताना त्याला अनेक त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. विशेषत: शारीरिक दुखण्यांमुळे त्याला अनेकदा ग्रासले. १९९९ च्या पाकिस्तान दौर्‍यात त्याला पाठदुखीचे दुखणे जडले. २००४ साली कोपराच्या हाडाच्या (टेनिस एल्बो) दुखण्यामुळे तो बेजार झाला होता. २००६ साली त्याला दुखापतीमुळे खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. मांडय़ांच्या स्नायूतील बिघाडानेही त्याला अनेकदा त्रस्त केले आहे.

१९९९च्या क्रिकेट विश्व कपचे सामने चालू असतानाच त्याचे वडील, प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. २००६ सालच्या आसपास त्याला `बॅडपॅच’मधूनही जावे लागले. अनेक वेळा त्याला टीका सहन करावी लागली. पण या टीकेला त्याने नंतर आपल्या बॅटनेच उत्तर दिले आणि सतत १७ वर्षे खेळत वयाच्या ३९व्या वर्षीही तो तरुणांना लाजवेल असा खेळ खेळत आहे.

सचिनचा विवाह १९९५ साली डॉ. अंजली मेहता हिच्याशी झाला. त्यांना सारा नावाची मुलगी, तर अर्जुन नावाचा मुलगा अशी दोन अपत्य आहेत.

सचिनच्या सामाजिक बांधीलकीबद्दल उगाचच उलटसुलट चर्चा होत असते. पण या चर्चेकडे दुर्लक्ष करीत, कोणताही देखावा न करता तो आपली सामाजिक बांधीलकी चोख बजावत असतो.

सचिन खेळाडू म्हणून जितका महान आहे, तेवढाच माणूस म्हणूनही महान आहे. तो कमालीचा नम्र आणि शांत स्वभावाचा आहे. केवळ स्वत:च्या खेळाकडे लक्ष न देता तो तरुण खेळाडूंनाही सतत प्रेरणा देत असतो. त्यांना आपल्या अनुभवाचा फायदा करून देत असतो. युवराज सिंगसारख्या खेळाडूला त्याच्या बॅडपॅचमध्ये सचिनने खूप मानसिक आधार दिला. त्यामुळे सचिनचे केवळ संघात असणे हेदेखील तरुण खेळाडूंना मोठा आधार वाटतो.

जगभर सचिनचे करोडो चाहते आहेत. त्याला चाहत्यांकडून अपार प्रेम मिळालं. सचिनला मान-सन्मानही भरपूर प्राप्त झाले. भारत सरकारकडून १९९४ साली अर्जुन पुरस्कार, १९९७-९८ साली पद्मश्री, २००५ साली खेल रत्न पुरस्कार आणि २००८ साली पद्मविभूषण देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. राज्य सरकार तर्फे `महाराष्ट्र भूषण’ या सर्वोƒ नागरी पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आला. सचिनला `भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात यावे असे असंख्य भारतीयांना वाटते.

सध्या सचिनचे चाहते भारताच्या इंग्लंड दौर्‍याकडे डोळे लावून बसले आहेत. या दौर्‍यामध्ये सचिन कशी खेळी खेळतो आणि कोणकोणते नवीन विक्रम करतो याचीच चर्चा सर्व जण करीत आहेत.

शुभांगी मांडे

सौजन्य – महान्यूज

2 thoughts on “विक्रमादित्य सचिन तेंडूलकर”

Leave a Comment