ओळख वाद्यांची

संगीत या शब्दात प्रचंड ताकद आहे. हा शब्द उच्चारला तरी तो मनाला उल्हासित करुन जातो. असं म्हटलं जातं की, संगीताच्या जोरावर कोणालाही आपलसं करता येतं. वातावरण निर्मिती आणि वातावरणात बदल करण्याचं सामर्थ्य संगीतामध्ये अंतर्भूत आहे. इतकच नव्हे, कोठून तरी संगीताचा एक स्वर जरी कानावर पडला तरी त्याच्या तालावर पाय आपोआप थिरकू लागतात. मानवाच्या उत्क्रांतीबरोबरच संगीताचा विकास होत गेला. संगीताचा मूळ आधार ‘वाद्य’ असून या सदरातून आपण वाद्यांची ओळख करुन घेणार आहोत.

वाद्यांच्या इतिहासाची ओळख करुन घेताना मानवी इतिहासाला बगल देता येत नाही. कारण वाद्यांची निर्मिती मानवी संस्कृतीइतकीच प्राचीन आहे. एका दृष्टीने मानवी शरीर हेच सर्वात प्राचीन वाद्य मानले जाते. भारतीय शास्त्रकार त्याला ‘दैवी वीणा’ म्हणतात आणि या मानवाने तयार केलेल्या वाद्यांना ‘मानुषी’ म्हणतात. याचा परिणाम म्हणून मानवी अवयवांना असणारी नावे देखील वाद्यांच्या अंगांना दिली गेल्याचे आढळते. मानुषी या कल्पनेमुळेच शिर, उदर, दंड इत्यादी नावे वाद्याच्या अंगोपांगांना मिळाली असावीत, असे मानले जाते.

गायनाची लय व स्वर अशी दोन अंगे असतात. या अंगांच्या उत्क्रांतीबरोबरच वाद्यांचीही उत्क्रांती झाली असावी. त्यातही लयीची जाणीव अगोदरची असावी. आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या हालचाली करत असतो. चालताना किंवा पळताना आपल्या शारीरिक लयींमध्ये फरक होत असतो. हाताने टाळ्या वाजविणे, पाय दणादणा आपटणे, छाती बडविणे, उघड्या तोंडावर हात आपटून आवाज काढणे इत्यादी मानवी क्रियांमधून लयवाद्यांची कल्पना आली असावी.

मानवी आवाजातील लहान-मोठेपणा, भिन्न उंची, पशुपक्ष्यांचे आवाज यांमुळे स्वरवाद्यांची कल्पना आली असावी. प्रारंभीच्या काळात वाळलेल्या शेंगा, लाकडी काटक्या, पोकळ ओंडके यासारख्या वस्तूंचा वाद्ये म्हणून वापर झाला असावा. मानवाला असलेल्या शिकारीच्या छंदाचा उपयोग देखील वाद्यांच्या उत्क्रांतीत झाला. शिकार करुन प्राप्त होणार्‍या कातड्याचा उपयोग जमिनीवर बसण्यासाठी झाल्यानंतर जमिनीतील खड्ड्यावर कातडे टाकून किंवा पोकळ ओंडक्यांचे तोंड आच्छादून त्यावर हाताने किंवा काठीने आवाज काढणे ही क्लुप्ती सूचली असावी. पोकळ नळ्यांत फुंक मारुन आवाज निघतो, हे कळल्यानंतर स्वर वाद्यांची कल्पना आली असावी. धनुष्याच्या शोधानंतर त्यातून निघणार्‍या टणत्कारातून तंतुवाद्याविषयी मूळ जाणीव झाली.

सुरुवातीच्या वाद्यांचा वापर केवळ करमणुकीसाठी होत असावा, असे वाटत नाही. करमणुकीपेक्षाही जनावरांना किंवा शत्रूंना भिवविण्यासाठी तो होत होता. तसेच भीतीपोटी उत्पन्न झालेल्या जादूटोण्यातील विधीसाठी होत असावा. आजमितीसही आदिवासी जमातींत वाद्यांचा वापर जादूटोण्यासाठी केला जातो. कालांतराने या वाद्यांचा वापर संदेश दूरवर पोहोचवण्यासाठी किंवा युध्दप्रसंगी केला गेल्याचे काही दाखले आढळतात. जसजसा मानवाचा विकास होत गेला तसतसा तो समुहाने राहू लागला. भटकंतीचे आणि धकाधकीचे आयुष्य संपुष्टात येऊन स्थिर जीवन जगणे शक्य झाल्यावर नृत्यासाठी व करमणुकीसाठी वाद्यांचा वापर होऊ लागला. मूळच्या जादूटोण्याऐवजी धर्मविषयक कल्पना रुढ झाल्यावर संगीताचा आणि त्याचबरोबर वाद्यांचाही वापर धार्मिक विधींमध्ये होऊ लागला. नंतर-नंतर धार्मिक कार्यासाठी वापरण्याच्या वाद्यांच्या रचनेबाबतही काही बंधने आली. (उदा. चीनमधील धार्मिक वाद्यांच्या रचनांबाबत काही निर्बंध होते.)

मानवी जीवनात वाद्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. काही जमातींत जमात प्रमुखांशिवाय इतरांना वाद्ये पाहूही देत नसत. अधिकाराचे गौरव पर चिन्ह म्हणून आजही तुतारीसारखे वाद्य राजदरबारी वापरतात. राजदरबार संपुष्टात आले असले तरी अजून गाद्या आणि राजघराण्याचे वंशज अस्तित्वात असल्याने त्यांच्या राजवाड्यात विविध प्रकारची वाद्ये पाहायला मिळतात.

जसजसे मानवी कौशल्य प्रगत झाले, तसतसी वाद्यांच्या निर्मितीत व प्रकारांत वाढ झाली. संगीत पध्दतीतील भेदांमुळे, प्रगतीमुळे व साधनसामग्रीच्या वैविध्यामुळे देशोदेशींची वाद्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरली. भारत व इतर पौर्वात्य देशांतील एकधून पध्दतीमुळे वाद्य हे केवळ मानवी गायनाबरोबर साथीचे म्हणून किंवा मानवी आवाजसदृश आवाज काढण्याचे साधन म्हणूनच राहिले. लयवाद्ये मात्र वेगळी होती. त्यांचाही दर्जा नृत्याच्या साथीचे दुय्यम वाद्य हाच असे. बीन सारख्या स्वतंत्रपणे वाजविण्याच्या वाद्याकडूनही मानवी आवाजाप्रमाणे बोलण्याचीच अपेक्षा असते. ‘जे बोलते ते वाद्य’ अशीच वाद्याची भारतीय संकल्पना होती. याउलट बहुधून पध्दतीमुळे पाश्चात्य संगीतात प्रत्येक वाद्याला स्वतंत्र किंवा सांघिक वादनातील वैशिष्ट्यपूर्ण वाद्य म्हणून स्थान आहे. यामुळे प्रत्येक वाद्याच्या स्वरनिर्मितीचे वैशिष्ट्य राखण्यासाठी व वाढविण्यासाठी त्या वाद्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या. विविध स्वरांच्या आवाक्यासाठी एकाच वाद्याचे लहान मोठे प्रकारही झाले. काही प्राचीन वाद्ये आजही त्यांच्या मूळ स्वरुपात प्रचारात आहेत, तर काहींमध्ये सुधारणा होऊन बदल झाले आहेत.

संतोष तोडकर

सौजन्य- महान्यूज

Leave a Comment