दुबईत पुणे मुंबई पेक्षा स्वस्तात फ्लॅटस् उपलब्ध

आपल्याजवळील जास्तीचा पैसा प्रॉपर्टीत गुंतवू इच्छीणार्‍या पुणेकरांना खूषखबर असून पुण्यात घर घेण्याऐवजी त्याच किमतीत अलिशान फ्लॅट खरेदी ते दुबईत करू शकणार आहेत. मुंबईतील अनेक जणांनी दुबईत घरे खरेदीचा धडाका लावला असून या घराच्या गुंतवणकीतून मिळणारा परतावाही पुणे मुंबईत मिळणार्‍या परताव्यापेक्षा अधिक आकर्षक आहे असे दिसून येत आहे.

    पुणे मुंबईसारख्या शहरात दोन बेडरूम्सच्या फ्लॅटच्या किमती चाळीस लाखांच्या घरात असताना दुबईत मात्र याच किमतीत किबहुना यापेक्षा थोड्या कमी किंमतीत जास्त मोठे आणि जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा असलेले फ्लॅटस सहज उपलब्ध आहेत शिवाय व्हिसाचे नियम सोपे केल्याने ही खरेदी सहज सुलभतेने करणेही ग्राहकांना शक्य होते आहे. दुबईतील अग्रगण्य इटीए स्टार प्रॉपर्टीचे जनरल मॅनेजर मोहम्मद अली यांच्या म्हणण्यानुसार दुबईत घर घेणार्‍या मुंबईकर तसेच उपखंडातील ग्राहकांची संख्या दिवसेनदिवस वाढत चालली असून भारतीय ग्राहक बांधकामाच्या गुणवत्तेला अधिक प्राधान्य देताना दिसतात. २००८च्या जागतिक मंदीत दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्राला चागंलाच फटका बसला असून तेथील जागांचे दर एकदमच कोसळले होते. मात्र आता भारतीय ग्राहकांमुळे हे मार्केट पुन्हा सावरू लागले आहे. रिअर इस्टेटमध्ये पुन्हा बूम येऊ लागली असून दुबईत घर घेण्यासाठी ज्या विचारणा होत आहेत त्यात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या वर्षभरात अल वसमन, मेडिया सिटी या भागात घरे घेण्यासाठी तुलनेने कमी गुंतवणूक करणार्‍या ग्राहकांनी विशेष पसंती दिली असून आलिशान घरांसाठी व थोडी अधिक गुंतवणूक करू शकणार्‍यांनी पाम फुमेरिआ, दुबई मरिना व बुर्ज भागाला पसंती दिली आहे. दुबईतील आघाडीच्या विकसकांनीही ग्राहकाच्या पैशाचे पुरेपूर मूल्य देणारी घरे त्यांना उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला आहे.

   मोहम्मद यांच्या मते दुबईत केलेल्या घराच्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला वर्षाला ८ ते १२ टक्के परतावा भाडे स्वरूपात मिळतो. पुण्या मुंबईत हेच प्रमाण दोन ते चार टक्के इतके आहे. वारंवार व्यवसायाच्या निमित्ताने दुबईला जावे लागणारे व्यावसायिकही दुबईत स्वतःचे घर घेण्यास प्राधान्य देत असून महिन्यातून दोन वेळा दुबई वारी करणार्‍यांना महागड्या हॉटेलात राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहणे सहज परवडणारे असल्याचेही मोहम्मद यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment