
तिरूवनंतपूरमच्या पद्मनाभस्वामी मंदिरात अमाप पैसा सापडला. अनेक वर्षे तिथेच असलेला हा खजिना मोठ्या वादाचा विषय झाला होता. बऱ्याच मोठया कायदेशीर लढाईनंतर याखजिन्याची मोजदाद सुरू झाली पण आता हा खजिना बराच मोठा निघाल्याने वेगळा वाद सुरू झाला आहे आणि नंतर वादाची जागा विस्मयाने घेतली आहे. या विस्मयातही काही स्वर विषादाचेही उमटले आहेत. मंदिरात एवढा पैसा कशाला ? धार्मिक स्थळे ही पैसा गोळा करण्याची साधने झाली आहेत का ? असेही काही आवाज उमटत आहेत. आपल्या देशातले लोक देवाला काहीही देण्यास तयार होतात कारण देवच कर्ता धर्ता आणि सर्व काही आहे अशी त्यांची कल्पना आहे. अशा लोकांनी देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा हा खजिना आहेच पण त्यात मोठा हिस्सा राजांच्या वैयक्तिक मालकीचा आणि एक हिस्सा संस्थानच्या तिजोरीचा आहे. अद्याप तरी हा पैसा नेमका कशाचा आहे यावर निश्चित स्वरूपात काही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे हे पैसे देवाचे आहेत असा सर्वसाधारण समज निर्माण झाला आहे. भारतातली देवालये श्रीमंत आहेत असे म्हटले जाते पण हे सरसकट खरे नाही. देशातली काही ठराविक मंदिरेच श्रीमंत आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर सर्वात जास्त गर्दीचे आहे पण ते पैशाच्या बाबतीत गरीब आहे. भारतात अशी काही मंदिरे आहेत की ज्यांची डागडुजीही होत नाही. अनेक मंदिरे पडीक आहेत तर अनेक मंदिरांना साधे पुजारीही मिळत नाहीत. काही मंदिरांचे पौराणिक महत्त्व लोकांना माहीत झालेले असते. त्यामुळे तिथे लोक दर्शनासाठी आपोआपच गर्दी करतात.मुंबईतल्या सिद्धीविनायकाची ख्याती पौराणिक नाही पण ती लोकांची गरज होती आणि अशा मंदिरांचे माकर्ेटिग चांगले झाले आहे. उत्तम सजावट, देखावा केला की भक्त तिकडे आपोआप आकृष्ट होतात. तसा देखावा करत नाहीत ती मंदिरे गरीब राहतात. देहू आणि आळंदी ही काही संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने कमी महत्त्वाची स्थाने नाहीत पण त्यांची आर्थिक स्थिती बेतास बात आहे. शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर मात्र श्रीमत आहे कारण तिथे मुंबईचे लोक फार गर्दी करतात. मुंबईचे लोक आले की केवळ मंदिराचीच नव्हे तर आसपासची दुकाने, लॉजेस, वाहनांचे मालक, पुस्तकाची दुकाने, सीडी आणि ताईत, गंडे दोरे यांचे विक्रेते यांनाही बरकत येते. काही मंदिरांना नाही लाभत मुंबईचे लोक. ती मंदिरे गरीब राहतात.
पद्मनाभस्वामी मंदिरावरून आता अनेक मंदिरांच्या संपत्तीची चर्चा सुरू झाली आहे. यातली काही मंदिरे फार जुनी आहेत. ती श्रीमंत कशी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. देशातली जनता गरीब असताना मंदिरे मात्र श्रीमंत होती ही हिदू धर्मातली विसंगती आहे अशीही टीका करण्यास जागा नाही कारण या मंदिरांतली संपत्ती त्या काळातली आहे ज्या काळात भारत देश श्रीमंत होता. या देशाला त्याच काळात सोने की चिडिया म्हणत होते. तिच्याकडे आकृष्ट होऊन मुस्लिमांनी भारतावर स्वार्याळ केल्या आणि येथे राज्यही कले. या आक्रमकांनी या देशाला गरीब केले नाही. देशाला गरीब केले ते इंग्रजांनी. म्हणजे इंग्रजांचे या देशात आगमन होईपर्यंत मंदिरांतली संपत्ती हा आपल्या समृद्धीचाच एक भाग होता. आता पुन्हा मंदिरांचे वैभव वाढायला सुरूवात झाली आहे. ती कशी वाढत आहे याचे काही आकडे चक्रावून टाकणारे आहेत. महारराष्ट्रातले सर्वात श्रीमंत देवस्थान हे शिर्डीत आहे. साईबाबांच्या या मंदिराचे वर्षाचे उत्पन्न ३५० कोटी रुपयांचे आहे. मंदिराकडे ३२ कोटी रुपयांचे दागिने असून इतरत्र केलेल्या व्यापारी गुंतवणुकीची किमत ४२७ कोटी रुपये आहे. तिरुपतीचे मंदिर बाराव्या शतकातले आहे. सीझन मध्ये या मंदिरात तीन लाख भाविक येतात तर एरवी दररोज ६० हजार भाविक येतात. मंदिराची मालमत्ताही मोठी आहे.
गतवर्षी हुंडीत ६५० कोटी रुपये मिळाले. यावर्षी ही रक्कम ६७५ कोटी वर जाण्याची शक्यता आहे. या देवस्थानकडे पाच टन सोने आहे आणि ५०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. या मंदिरांची भित सोन्याच्या पत्र्याने मढवण्याचे काम जारी आहे. देवाची मूर्तीच १ टन सोन्याने मढवलेली आहे. मुंबईतले सिद्धी विनायक मंदिरही आता जगातले एक श्रीमंत मंदिर समजले जायला लागले आहे. ते महाराष्ट*ातले शिर्डी खालोखालचे श्रीमंत देवस्थान आहे. १८०१ साली स्थापन झालेल्या या मंदिराचे उत्पन्न वरचेवर वाढत चालले आहे. दर मंगळवारी या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या पाच लाखावर गेली आहे. देवाच्या काकड आरतीला पहाटे या मंदिरात पायी चालत येणे मोठे पुण्यप्रद समजले जाते. अमिताभ बच्चनने हे काम केले होते. तो पहाटे आपल्या जुहूच्या बंगल्यातून पायी चालत निघाला आणि पहाटे प्रभादेवीला पोचला. तो निघाला आणि अनेक लोक त्याला येऊन मिळाले. काफिला बढता गया. मगच अभिषेक बच्चनच्या ऐश्वर्या रॉयशी होणाऱ्या विवाहाच्या आड येणारा मंगळ शांत झाला. या मंदिराचे २०१०-११ सालचे उत्पन्न ४८ कोटी रुपये होते आणि मंदिराने १२५ कोटीच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. मे २०११ मध्ये या मंदिराच्या कमाईचा कळस झाला. या एका महिन्यात मंदिराला दोन कोटी ४७ लाखाच्या देणग्या मिळाल्या आणि ७२७ किलो सने मिळाले. त्याशिवाय देशात अमृतसरचे सुवर्ण मंदिर एक श्रीमंत देवस्थान समजले जाते. या मंदिरात केव्हाही जाणार्याय भाविकाला मोफत जेवण मिळते. मंदिरातला लंगर २४ तास सुरू असतो.वैष्णोदेवी मंदिर हे काश्मीरचे वैभव आहे. या मंदिरात गतवर्षी ४५ लाख दर्शनेच्छु आले. सिझनमध्ये या देवीसमोर दररोज ४० कोटी रुपये येतात. वार्षिक उत्पन्न ५०० कोटी रुपये आहे केरळातले गुरूवायुर मंदिर हे एक श्रीमत देवस्थान होते. त्याच्या मालकीची १३ हजार एकर जमीन होती. आता ती सरकार जमा झाली आहे. या मंदिराला दररोज २५ हजार भक्त भेट देतात येथेही हुंडीत करोडो रुपये मिळतात.