पंतप्रधानांचे खरे मत

    नेतेमंडळी पत्रकारशी बोलताना काही पोटातले आणि काही ओठातले बोलत असतात. त्यांच्या ओठात एक असते आणि पोटात दुसरेच काही तरी असते. किबहुना ज्याच्या पोटात आणि ओठात वेगवेगळे काही असते तोच खरा नेता असतो. तो गरिबांविषयी कणव दाखवतो. ती त्याच्या ओठात असते. पोटात दुसरेच काहीतरी असते. पोटात जे असते ते सोयीचे नसते म्हणून ते बोलण्याचे टाळले जाते. पण काही वेळा ते पत्रकारांसमोर पोटातले बोलतात. काही पार्श्वभूमी विषद करताना, मन मोकळे करताना ते पत्रकारांना अशी काही माहिती देतात की जी छापणे आणि लोकांना कळणे सोयीचे नसते. तिलाच ऑफ दी रेकॉर्ड माहिती असे म्हटले जाते. ही माहिती पत्रकारांना सांगतानाच ती ऑफ दी रेकॉर्ड आहे असे बजवावे लागते म्हणजे पत्रकार ती छापत नाहीत, आपल्या मनात ठेवतात आणि प्राण गेला तरीही ती माहिती कोणालाच सांगत नाहीत. पंतप्रधान मनमोहनसिग यांचा नुकताच देशातल्या  सहा मान्यवर संपादकांशी मुक्त संवाद झाला त्यात त्यांनी काही गोष्टी केवळ पोटात ठेवायच्या असताना प्रकटपणे बोलून दाखवल्या. त्यांच्या या विधानांनी खळबळ माजली पण पंतप्रधानांनी आता गप्प न बसण्याचा निर्धार करून साधलेला हा पहिलाच संवाद याच नव्हे तर अनेक बाबतीत  वादग्रस्त ठरला. या माहितीचा खुलासा सरकारने केला पण तो करतानाही आपली या संबंधातली समज किती कमी आहे हेच दाखवून दिले. पंतप्रधानांनी जाहीर केलेली काही वक्तव्ये वादग्रस्त ठरली अशा वेळी पुढारी दोन प्रकारांनी सारवासारवी करत असतात. पहिला प्रकार म्हणजे आपण असे काही बोललोच नाही असे म्हणून काखा वर करणे. किवा आपल्याला नेमके असे म्हणायचे नव्हते,  आपल्या वक्तव्याच्या मागच्या पुढच्या प्रतिपादनाचा संदर्भ सोडून ही विधाने प्रसिद्ध करण्यात आली आहेत आणि त्यामुळे गैरसमज झाला आहे असे स्पष्टीकरण करणे. या बाबतीत असा खुलासा करण्याची संधी या प्रकरणात नव्हती कारण ज्यांच्यासमोर ही विधाने केली होती ते काही छोटे मोठे किरकोळ पत्रकार नव्हते तर ते देशातले सर्वात ज्येष्ठ संपादक होते. आपल्या विधानातला बावळपटपणा दडवण्यासाठी त्यांनी चुकीचे छापले असल्याचा खलासा करून त्यांना खोटे ठरवणेही परवडणारे नव्हते. त्यातून संबंध बिघडले असते.  सरकारच्या प्रसिद्धी विभागाची मोठी पंचाईत झाली. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी जो खुलासा करण्यात आला तो तर रोगापेक्षा औषध भारी असा निघाला.

पंतप्रधानांनी दोन विधाने केली होती. पहिले विधान चीन संबंधी होते. चीनचे लष्करी सामर्थ्य आपल्या पेक्षा जास्त असल्याने तो आपल्याला वरचढ ठरणारा आहे अशा आशयाचे ते विधान होते. या विधानाचा तर कसला खुलासाही करण्यात आला नाही. चीन आपल्यापेक्षा बलाढ्य असला तरी तसे उघडपणे म्हणण्याची गरज काय ? तसे म्हणण्याने आपल्या देशवासीयांच्या मनातला न्यूनगंड वाढतो. खरे तर देशाच्या नेत्यांनी आपली कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्याची तयारी आहे असे सांगून देशवासीयांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे. सत्यं ब्रुयात  प्रियं ब्रुयात, न ब्रुयात सत्यं अप्रियं, हे ब्रिद त्यांनी लक्षात ठेवायला हवे. सत्य सांगा पण जे सत्य प्रिय आहे ते सांगा. जे सत्य आहे पण अप्रिय आहे आणि सांगायची गरज नाही ते सत्य सांगू नका. या प्रसंगात चीन आपल्यापेक्षा बलाढ्य आहे की दुबळा आहे हे सांगण्याची मुळात काही गरजच नव्हती. चीन आपल्या सीमा कुरतडत आहे, पाकव्याप्त काश्मिरमध्ये लष्करी तळ उभारत आहे, अरुणाचलावर आपला दावा सांगत आहे तरीही सरकार चीनच्या बाबतीत  एक चकार शब्द उच्चारत नाही. याची कारण मीमांसा करताना आपण गप्प बसणार नाही असेच म्हणायला हवे पण चीन आपली खोडी काढत आहे आणि आपण तो बलाढ्य आहे म्हणून गप्प बसत आहोत असे  आता लोकांना वाटत आहे. लोकांचे नीतीधैर्य खचत आहे. पंतप्रधान म्हणून आपण देशात कोणते वातावरण तयार केले पाहिजे हे समजण्याचा मनमोहनसिग यांचा वकूब नाही हे यावरून दिसून येत आहे. त्यांनी दुसरे विधान केले आहे ते बांगला देशाविषयी आहे. या देशातले २५ टक्के तरुण जमाते इस्लामीचे सदस्य असून ते दहशतवादी बनतात असे त्यांनी म्हटले. आता या प्रकाराने बांगला देशाचे नेते नाराज झाले आणि वाईट प्रतिक्रिया उमटली. त्यावर सरकारने, हे पंतप्रधानांचे ऑफ दी रेकॉर्ड विधान होते असा खुलासा केला. हा खुलाशाचा प्रकार इतका हास्यास्पद होता की तो ऐकून हसावे की रडावे हे कळत नाही. या खुलाशाचा अर्थ असा होतो की पंतप्रधानांना  बांगला देशातल्या तरुणांविषयी जे बोलायचे होते ते खरे होते. त्यांचे मत तसेच आहे पण ते त्यांनी बोलून दाखवायला नको होते. ते त्यांचे पोटातले होते. याचा अर्थ पंतप्रधानांचे बांगला देशातल्या तरुणांविषयी हे मत खरे आहे हेच हा खुलासा नक्की करत आहे. पंतप्रधानांनी एकाच पत्रकार परिषदेत दोन देशांना दुखावले आणि दोन वादग्रस्त विधाने केली. पंतप्रधानांनी बोलले पाहिजे असा आग्रह धरणारांनी कपाळावर हात मारून घेतला असेल.   

Leave a Comment