लोकपालच्या कार्यकक्षेत पंतप्रधानही आले पाहिजेत – अण्णा

पुणे –  अण्णा हजारे यांचे नियोजित लोकपाल विधेयक प्रत्यक्षात आले तर अगदी जिल्हापातळीवरही भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा निवाडा करून भ्रष्टाचार्यांअना कडक शासन करणारी यंत्रणा असेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुणे पत्रकारसंघातील वार्तालापात बोलताना सांगितले.
ते म्हणाले, लोकपालांच्या कार्यकक्षेत पंतप्रधानही आले पाहिजेत अशी आमची ठाम भूमिका आहे. सध्या तरी आमच्या सहा मागण्यांना सरकारने मसुदापातळीवरच आक्षेप घेतल्याने संघर्ष अपरिहार्य आहे हे स्पष्ट आहे. यापुढील संघर्ष प्रखर असेल हे स्पष्ट आहे आणि सरकारही बाबा रामदेव यांच्या आंदोलनात आक्रमक भूमिका घेअून स्पष्ट झाले आहे त्यामुळे यापुढे सरकार आक्रमक राहणार हे स्पष्ट आहे. सरकारची भूमिका लाढीची असेल तर आमची भूमिका गोळी खायची आहे हे निश्चत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला आम्ही बधणार नाही, हे स्पष्ट आहे. देशातील जनताही आंदोलनाला तयार होते आहे हे हळूहळू स्पष्ट होते आहे. जनतेमध्ये हळूहळू बदल होताना दिसतो आहे. काही वर्षापूर्वी मी कोठेही भ्रष्टाचारविरोधी प्रचाराला गेलो की, जनतेतून ‘अण्णा हजारे आगे बढो – हम तुम्हारे साथ है ’ अशा घोषणा होत असत पण प्रत्यक्षात मागे वळून बघितले तर पाठीशी उभे राहण्यासाठी कोणीही नसे असे दृष्य असायचे. पण  हळुहळू परिस्थिती बदलती आहे. फार मोठ्या प्रमाणावर लोक आंदोलनात उतरत आहेत व लाठ्या खायला तरी तयार आहेत अजून गोळ्या खायला तयार आहेत का याची कसोटी लागायची आहे पण तीही लागेल, असेही त्यांनी बोलून दाखविले.
हे लोकपाल केवळ मुंबई आणि दिल्ली पातळीवर असतील तर मग सामान्य माणसाला त्याचा काय उपयोग, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आमच्या नियोजित विधेयकात लोकपालाची जिल्हापातळीवर प्रतिनिधी नियुक्तीची कल्पना आहे. सध्या शासकीय पातळीवरील कामकाजात एकही अशी घटना नसते की, ती भ्रष्टाचाराखेरीज पूर्ण होताना दिसते. त्यामुळे सामान्य माणसापर्यंत लोकपालविधेयकाचा परिणाम दिसणे आवश्यक आहे व आम्ही त्यावर ठाम आहोत.
न्याययंत्रणेसी चौकशी करण्याचे अधिकार लोकपालयंत्रणेकडे असतील पण त्यावर कारवाई करण्याचे अधिकार लोकपालाकडे असणार नाहीत लोकपाल फक्त चौकशी अहवाल मुख्य न्यायाधिशाकडे पाठवतील. लोकपाल यंत्रणेच्या खर्चासाठी महसुलातील पाव टक्का रक्कम राखीव असावी, असेही आम्ही आमच्या मसुद्यात म्हटले असल्याचे श्री हजारे यांनी सांगितले. वार्तालाप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश धोंगडे होते.

Leave a Comment