कोंडी फुटली

    मुंबईत  एका इंग्रजी दैनिकाच्या ज्येष्ठ पत्रकाराची हत्या झाली आणि १७ दिवसांनी या गुन्हयातले  आरोपी पकडण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. हा कालावधी कमी की जास्त हे ज्याच्या त्याच्या कल्पनेवर अवलंबून आहे. पत्रकारांना हा वेळ जास्त वाटत होता कारण त्यांच्या भावना त्यात गुंतल्या होत्या. त्यांनी सातत्याने या प्रकरणाचा शोध ताबडतोब लागला पाहिजे अशी मागणी करायला सुरूवात केली होती. मुंबईच्या पोलिसांना हे आरोपी सापडत नसतील तर हा तपास सीबीआय कडे द्यावा अशी मागणी करूनही पत्रकार सरकारवर दबाव आणत होते. दरम्यानच्या काळात पोलिसांचे तपास काम सुरू होते आणि त्यांनी नेमक्या आरोपीपर्यंत पोचण्याची पराकाष्ठा सुरू होती. आता हे आरोपी सापडले असून त्यांनी आपला गुन्हा पोलिसांसमोर तरी मान्य केला आहे.एवढेच नव्हे तर गुन्हा कसा कसा घडला याचे तपशील दिले आहेत. आता प्रत्यक्षात खटला भरला जाईल तेव्हा साक्षीपुरावे होतील आणि खटल्याचे काय व्हायचे असेल ते होईल पण, आता तरी खुनातल्या आरोपींचा छडा लागला आहे. त्यामुळे आपल्याला तो विलंब वाटला होता तरीही आपल्याला आता समाधान मानले पाहिजे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार तरी ही हत्या छोटा राजन या गुन्हेगारी विश्वातल्या गडाने सत्या काल्या या मारेकर्यारला हाताशी धरून पाच लाखाची सुपारी देऊन करवली असल्याचे उघड झाले आहे. या कामासाठी सात जणांना गुंतवण्यात आले होते. सुपारीचे पाच लाख आणि शस्त्रांची मदत छोटा राजननेच दिली होती.छोटा राजन हा दाऊद इब्राहिमचा प्रतिस्पर्धी समजला जातो. गेल्या महिन्यात दाऊदच्या भावाच्या हत्येचा प्रयत्न झाला तेव्हा हे काम छोट्या राजनचेच असावे असा संशय होता. याबाबत त्याला विचारले असता त्याने या प्रकरणात सहभाग असल्याचा इन्कार केला आणि आपण ठरवतो तर नक्कीच हत्या करत असतो असे म्हटले. त्याने जे डे यांच्या बाबतीत आपले हे म्हणणे खरे करून दाखवले आहे. आता ही हत्या त्यानेच केली असल्याचे उघड झाले आहे पण ती का केली यावर अजून तरी प्रकाश पडलेला नाही. कारण ही हत्या करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवलेली होती त्यातल्या कोणालाच हे जे डे कोण आहेत हे माहीत नव्हते आणि आपण त्यांची हत्या का करीत आहोत याविषयीही ते अनभिज्ञ होते. छोटा राजनने त्यांना केवळ टार्गेट सांगितले होते. पैसे कबूल केले होते. जे डे यांचे वर्णन करून सांगितले होते आणि त्यांच्या मोटार सायकलचा नंबर दिला होता. मारेकर्यांमना केवळ तेच माहीत होते. माहीत करून घेण्याची या टोळ्यांत पद्धत नसते. अशा कटांची ती कार्यपद्धती असते. तेव्हा शुटरने केवळ गोळीबार करायचा असतो. तो का करायचा हे विचारायचे नाही. आता छोटा राजनने ही हत्या का केली यावर पोलिसांना काम करावे लागणार आहे. या तपासात  पोलिसांना जे डे यांच्या मोबाईल फोनवरील संवादांचा आणि एसएमएस चा उपयोग झाला. सध्या मोबाईल फोन हे गुन्हयांचा छडा लावण्याचे एक मोठेच प्रभावी साधन झाले आहे. जे डे यांच्या फोनवर त्यांना धमक्या देणारांची नावे होती. त्यांच्याकडून आपल्याला धमक्या येत असल्याचे त्यांनी काही संदेशांत म्हटले होते. त्यावरून माग काढत पोलीस या सात लोकांपर्यंत पोचले. आपण कोणाचा आणि का खून करीत आहोत हे माहीत नसलेल्या या आरोपींना आपण गोळ्या घातलेला माणूस हा मुंबईतल्या एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकाचा सह संपादक आहे हे दुसरे दिवशी कळले. तेव्हा त्यांना ही हत्या सहजा सहजी पचणार नाही याची जाणीव झाली आणि ते मुंबईच्या बाहेर पडले. ते सारा देशभर तीर्थयात्रांच्या ठिकाणी फिरत राहिले. पण पोलिसांना त्यांची ओळख पटल्यावर त्यांनी या लोकांना त्या त्या ठिकाणाहून पकडून आणले. पोलीस मनावर घेतल्यावर काय करतात याचेही हे एक उदाहरण ठरावे. कायद्याचे हात फार लांब असतात. मनावर घेतले तर हे हात कोणालाही कोठूनही खेचून आणू शकतात पण सत्ताधारी मंडळींनी एखाद्या आरोपीला आश्रय द्यायचा असा निर्णय घेतला तर मात्र असे आरोपी अगदी गृह मंत्र्याच्या गळ्यात गळा घालून फिरले तरीही पोलीस काही करत नाहीत. आता या प्रकरणात  एका पत्रकाराची हत्या झाली होती आणि सरकारला पत्रकारांचा दबाव पेलवत नव्हता. सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मग पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि आरोपी सापडले. युतीच्या काळात मुंबईतले अनेक गँगस्टर पोलिसांनी टिपून मारले आणि शहरात शांतता निर्माण केली. जे डे यांची हत्या झाल्यापासून या शहराच्या शांततेला चूड लावणारे हे गुंड पुन्हा सक्रिय झाले आहेत की काय अशी शंका यायला लागली होती. तसे घडले आहे की नाही हे आताच आणि  एकदोन प्रकारांवरून सांगता येत नाही पण हे लोक सक्रिय झाले असतील तर ती दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल. या प्रकारावर झोड उठवणार्याए पत्रकारांना असे लक्ष्य केले जात असेल तर पत्रकारांतही भीतीचे वातावरण पसरेल अशी भीती वाटत होती पण पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना संरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे.   

Leave a Comment