संत तुकाराम पालखी रिंगण

पन्नाशी आणि साठी ओलांडलेले दहा हजार महिला पुरुष वारकरी हातातील विणा किवा डोक्यावरील तुळशी वृंदावन सांभाळत संत तुकाराम पालखी रिंगणातील तुफान वेगाने धावणाऱ्या घोड्याच्या वेगानेच धावत असतात तेंव्हा त्यांना ही शक्ती कोठून मिळते याचा विस्मयकारक अनुभव एक लाखाहून अधिक पिपरीचिचवडकरांनी घेतला.
गुरुवारी दुपारी येथील संत तुकाराम नगरातील हिदुस्थान अँटिबायोटिक्सच्या विशाल मैदानावर हा पहिल्या रिंगणाचा सोहोळा पार पडला. यावर्षी अष्टमी दोन आल्याने पिपरीतील मुक्काम एक दिवसाने वाढला. म्हणून एक दिवस परंपरेप्रमाणे निगडीला मुक्काम झाला व दुसरा मुक्काम संत तुकाराम नगराच्या रहिवाशांनी मागून घेतला. या प्रसंगाचे निमित्त साधून महापौर योगेश बहल यांनी महालिकेच्या वतीने संत तुकाराम पालखीच्या संयोजकांना एक मुक्काम त्यांच्या परिसरात काढण्यासाठी विनंती केली. ती मान्य झाल्यावर सारी महापालिका कामाला लागली.
पिपरी चिचवडची सारी उद्योगनगरी आणि सार्याल वसाहती अंग झटकून कामाला लागल्या. वारीमधील एक लाख लोकांची दोन जेवणे आणि पाहुणचार अशी तयारी अहमहमिकेने पुढे येअून झाली. दुपारनंतर रिगणाला आरंभ झाला. मध्यवर्ती भागात मोठा शामियाना उभा केला होता. त्यात पालखी समारंभ पूर्वक रिंगणाच्या ठिकाणी आली. पाठोपाठ सार्यार दिड्या तेथे दाखल झाल्या. पालखीच्या समोर पालखीचा निशाण घेतलेला अश्व होता. पालख्या येतानाच दोन्ही बाजूनी पिपरीकरांनी रांगोळ्या आणि रोषणाई करून स्वागताची तयारी केली होती. एक किमीपेक्षाही लांबीचे असलेले गोल रिंगण प्रदक्षिणेसाठी तयार झाले होते. सर्व बाजूंनी दिड्या आल्या आल्या. मृदंग आणि टाळ यांच्या निनादात भजन, अभंग आणि जयघोष यातून  सारा आसमंत दुमदुमत होता. चोपदारांनी इशारा केल्यावर सर्वत्र शांतता झाली आणि पांडुरंगाच्या जयघोषात निशाणाचा अश्व रिंगणात उतरला. त्यावर ध्वज घेतलेला मानकरी होता. रिंगणातून अश्व सुसाट धावू लागला. बघता बघता त्याचे रिंगण पूर्ण झाले. पाठोपाठ दीड हजाराहून अधिक वीणाधारी वारकरी रिंगण पूर्ण करण्यासाठी धावू लागले. पन्नाशी आणि साठी ओलांडलेले वारकरी येवढ्या वेगाने धावताना पाहून सारे बघणारे चकीत होताना दिसत होते. त्यांची दिडी झाल्यावर डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या दीड हजाराहुन अधिक महिला रिंगणात अुतरल्या व त्यानीही तेवढ्याचे वेगाने रिंगण पूर्ण केले.
या रिंगण सोहोळ्याबाबत बाबामहाराज सातारकर म्हणतात, या सोहोळ्याला प्रतिकात्मक अर्थ आहे. आपण आपल्या संसारात रेसच्या घोड्याप्रमाणे बभान होउन आपापल्या ध्येयसाध्यासाठी धावत असतो. पण येथे आपण संतांचे अभंग गात पालखीभोवती रिंगण करतो. मनात अभंग, कानावर अभंग, मृदुंगावर अभंग आणि टाळावर अभंग निनादत असताना हे रिंगण पूर्ण होते. अंतःकरणात अभंग निनादत असताना पूर्ण होणारे हे रिंगण जगण्याचा नवा अर्थ सांगत असते.
उद्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात प्रवेश करतील. पुण्यात भवानी पेठ, गंजपेठ,रास्तापेठ या भागात सध्या पालख्यांच्या स्वागताची लगभग सुरु आहे. पालख्यांचा मुक्काम येथे दोन दिवस असणार आहे.

Leave a Comment