च्युइंग गमला चिकटलेले प्रश्न

    
केन्द्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयात भरपूर चॉकलेटे खाणारी कोणी मुले शिरली होती आणि ती मुले  जागोजाग च्युइंग गम चिकटवून निघून गेली. त्यामुळे या च्युइंग गमची फार चौकशी करण्याची गरज नाही असे संपुआघाडी सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. हा प्रकार फार काही गंभीर नाही असे सरकारचे मत आहे. अर्थ मंत्र्याच्या कार्यालयात चिकटवण्यात आलेला पदार्थ च्युइंगगम नव्हता हे सरकारसह सर्वांना माहीत आहे पण तरीही तो च्युइंगगमच होता असे मानले तरीही हा प्रकार गंभीर ठरतो आणि तो कोणी आणला आणि कोणी, का चिकटवला याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आता प्रणव मुखर्जीच हा प्रकार गंभीर नाही असे म्हणत आहेत पण तसे आहे तर त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून त्याची चौकशी करण्याची मागणी का केली ? पतप्रधानांनी काही प्रतिसाद दिला नाही तेव्हा खाजगी गुप्तहेर संस्थेकडून त्याची चौकशी  का केली ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी तर सरकारने च्युइंगगमचा विनोद बंद करून नेमके काय घडले आहे याची चौकशी करावी आणि सर्वांना विश्वासात घेऊन चौकशीचे निष्कर्ष जाहीर करावेत अशी मागणी केली आहे.
    डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर असे च्युइंग गम हेरगिरी करण्यासाठी वापरले जाते अशी माहिती दिली. ते मोक्याच्या  ठिकाणी लावले की त्यावर छोटी ध्वनिमुद्रण यंत्रे बसवता येतात आणि ते कसल्याही खणा मागे न ठेवता पटकन काढून घेता येतात असे तर स्वामी यांनी सांगितलेच पण हा सारा उद्योग  गृह मंत्री पी. चिदंबरम यांनीच केला असल्याचा थेट आरोप केला. यावर चिदंबरम यचे म्हणणे काय आहे हे अजून कळल नाही पण हा केवळ स्वामी यांचाच आरोप नाही. खुद्द प्रणव मुखर्जी यांनाही तसाच संशय असावा असे दिसत आहे. कारण प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या कार्यालयात अशी हेरगिरी करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याची पहिली माहिती गृह खात्याला दिली जात असते. ते स्वाभाविक असते पण या प्रकरणात मुखर्जी यांनी गृह मंत्र्यांना एका शब्दानेही कल्पना न देता सरळ पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. याचा अर्थ सांगायची गरज नाही. तो आपोआपच स्पष्ट होतो कारण या दोन मंत्र्यांत  गेल्या काही दिवसांपासून षडाष्टक सुरू आहे. दोघेही परस्परांना  सतत पाण्यात पहात असतात.
    प्रणव मुखर्जी हे मंत्रिमंडळातले क्रमांक  दोनचे मंत्री आहेत आणि चिदंबरम हे क्रमांक तीनचे मंत्री आहेत. क्रमांक एकचे मनमोहन सिग यांची प्रशासनावरची पकड ढिली होत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारची अप्रतिष्ठा होत आहे. सोनिया गांधी आणि मनमोहनसिग यांच्यातले अंतर वाढत आहे. अशा स्थितीत केन्द्रात कोणत्या क्षणी नेतृत्वबदल होईल याचा नेम नाही. म्हणून केन्द्र सरकारच्या वरच्या पातळीवर आगामी पंतप्रधान कोण या विषयाला धरून तर्क लढवले जायला लागले आहेत. म्हणूनच असेल कदाचित पण दिग्विजयसिग यांनी राहूल गांधी यांनी पंतप्रधान होण्याची वेळ आली असल्याची ग्वाही दिली आहे. यामागे काय हेतू आह ? कदाचित सोनिया गांधी यांनी बदल केलाच तर राहूल गांधींना पंतप्रधान करावे आणि आता या पदावर नजर ठेवून असलेल्या क्रमांक दोन आणि तीन पैकी कोणाचा या पदासाठी विचारही करू नये असे त्यांना सुचवायचे असावे. वेगळ्या शब्दात सांगायचे तर  प्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम यांचे पत्ते कापणे हा या विधानामागचा हेतू आहे. या दोघांत तशी स्पर्धा सुरूही आहे आणि त्यामुळे या दोघांतून विस्तव आडवा जात नाही. एखाद्या पदाला दोघे इच्छुक असतील तर त्यांच्यात आपापसात स्पर्धा असतेच. तशी या दोघांत आहे. चिदंबरम तर या पदाला उत्सुक आहे. किबहुना त्यांना त्यांच्या वर्तुळात भावी पंतप्रधानच समजले जात आहे. प्रणव मुखर्जी आज नव्हे तर १९८५ पासून या पदावर डोळा ठेवून आहेत. इंदिरा गांधी यांची हत्या झाली  तेव्हाच्या स्थितीत त्यांची ही महत्त्वाकांक्षा मोठ्या भडकपणाने  व्यक्त झाली होती म्हणून राजीव गांधी यांनी त्यांना दूर ठेवले होते. त्यांची महत्त्वाकांक्षा तेव्हा अवास्तव होती पण, आता ती  व्यवहार्य आहे कारण आता मनमोहनसिग हे खरे पंतप्रधान नसून प्रणव मुखर्जीच खरे पंतप्रधान आहेत इतक्या जबाबदार्या  त्यांच्यावर एकाच वेळी सोपवलेल्या असतात.
    प्रणव मुखर्जी स्वतःला कितीही योग्य समजत असले तरीही चिदंबरम यांच्या गोटातून ते अयशस्वी ठरत असल्याच्या बातम्या पसरविल्या जात असतात. एकदा तर पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांच्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीतच जुगलबंदी सुरू झाली होती. चिदंबरम यांनी अर्थमंत्र्यांच्या काही निर्णयांना उघडपणे विरोध केला होता. या जुगलबंदीला अजून एक इतिहास आहे. तो २ जी स्पेक्ट्रमचा आहे. या प्रकरणातले प्रमुख आरोपी ए. राजा यांनी मनमानी कमी किमतींना स्पेक्ट्रमचे परवाने  मंजूर केले त्या मंजुरीला अर्थ खात्याची मंजुरी होती. हे तर उघडच दिसत आहे. त्या काळात पी.चिदंबरम अर्थ मंत्री होते. म्हणजे ते कोणत्याही क्षणी २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात ओढले जाऊ शकतात. त्यांना ती भीती वाटते म्हणूनच त्यांनी  आवश्यक तो खुलासा केला असून ए. राजा यांच्या या मनमानीला अर्थखात्याचा नव्हे तर पंतप्रधान कार्यालयाचा आशिर्वाद होता असे स्पष्ट करून आपली सुटका करून घेण्याच प्रयत्न केला आहे.
    स्पेक्ट्रम प्रकरणात राडिया टेप्स ने भल्या भल्यांना उघडे पाडलेले आहे. या टेप्स आयकर खात्याने हस्तगत केल्या आहेत. हा विभाग अर्थखात्याच्या अखत्यारीत येतो. म्हणजे त्या प्रणव मुखर्जी यांच्या ताब्यात आहेत. ते अर्थ खात्याच्या अधिकार्यां ना हाताशी धरून यातल्या काही टेप्स माध्यमांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या काही टेप्स म्हणजे पी. चिदंबरम यांना अडचणीत आणणार्या  टेप्स आहेत. त्या आपल्या विरोधात जाणीवपूर्वक प्रसिद्धीला दिल्या जात आहेत असा चिदबरम यांना संशय आहे. म्हणूनच त्यांना अर्थ खात्यात निगराणी करणे आणि प्रणव मुखर्जी यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक झाले आहे. यातून हे च्युइंग गेम प्रकरण उद्भवले आहे. सध्या आपले सरकार कसे चालले आहे याचा हा नमुना आहे. देशावर पाचच लोक राज्य करीत आहेत. सोनिया गांधी, मनमोहनसिग, प्रणव मुखर्जी, पि.चिदंबरम आणि ए.के.अँथनी. या पाच जणांचे आपसात जमत नाही. केन्द्रीय पातळीवर एक दुफळी दिसत आहे. असे आजवर कधीही झालेले नव्हते.

Leave a Comment