विदर्भात नॅशनल लॉ स्कूल व्हावे, यासाठी न्या.सिरपूरकर यांचे राष्ट्रपतींना साकडे

बुलडाणा दि.२८ – विदर्भातून अधिक दर्जेदार व उत्तम गुणवत्ता प्राप्त वकील तयार होण्यासाठी विदर्भात नॅशनल लॉ स्कूल सुरु करण्यात यावेत,अशी मागणी वजा अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.एस.सिरपुरकर यांनी व्यक्त केली आहे.नॅशनल लॉ स्कूल व्हावे,यासाठीचा आवश्यक तो विनंती वजा प्रस्ताव आपण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे पाठविला असल्याचे त्यांनी नमूद केला. खामगांव येथील औद्योगिक वसाहतीमधील श्रीरामभाऊ शेळके विधी महाविद्यालयात एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

न्या. सिरपूरकर यांचे विद्यालयात आगमन होताच त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत झाले. त्यानंतर त्यांच्या हस्ते ग्रंथालय, ई-लायब्ररी, मुटकोर्ट व लिगल एड क्लिनीकचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर न्या. सिरपुरकर यांच्या सुविद्य पत्नी कुरकुम सिरपुरकर, संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ पुंडकर, डॉ. सुमती पुंडकर, प्राचार्य सुभाष भडांगे उपस्थित होते. यावेळी न्या. सिरपुरकर यांना संस्थेच्यावतीने मानपत्र प्रदान करण्यात आले. कॉलेजचे मुख्य व्यवस्थापक धैर्यवर्धन पुंडकर यांनी विधी महाविद्यालयाच्या स्थापनेची आणि प्रवासाची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे स्नेही असलेले (कै.) श्रीरामभाऊ शेळके हे आपले आजोबा होते. त्यांचेच स्वप्न आपण पूर्ण करीत असल्याचे न्यायमूर्ती सिरपुरकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, कोटाचा रंग काळा असला तरी तुम्ही काळे काम करु नका. ब्लॅक मीन्स अॅबसेन्स ऑफ ऑल कलर्स. म्हणजे कोणतीही विशिष्ट दुर्भावना, मत्सरता, दुर्गुण तुमच्यात नको. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. मात्र ती आंधळी नसते. ‘यतो धर्मःस्ततो जय’ हे ब्रीद लक्षात ठेवा असेही न्या. सिरपुरकर यांनी सांगितले.

Leave a Comment