क्रिकेट स्पर्धेच्या वादातून खून करणाऱ्या नगरसेवकांसह चौघांना जन्मठेप

कोल्हापूर दि.२८ – क्रिकेट स्पर्धेच्या वादातून इचलकरंजीतील गजानन मालवेकर उर्फ गोट्या जाधव या तरुणाचा खून केल्याप्रकरणी इचलकरंजीतील नगरसेवक नागेश पाटील,त्याचा भाऊ गणेश,महेश सुरेश पाटील,चंद्रकांत शेवाळे या चौघांना येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.बी.पटले यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.आरोपींना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावून दंडाची रक्कम गोट्याची आई इंदुमती यांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून सांगलीचे अॅड्. जयसिग पाटील यांनी काम पाहिले.

न्यायालयाने चौघांवरील आरोप सिध्द करीत दोषी ठरविले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यावर न्या. पटले यांनी गोट्याचा खून केल्याप्रकरणी चौघांना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय राकेश शेटे याला जखमी केल्याबद्दल ६ महिने शिक्षा व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तांबेमाळ येथील चंद्रकांत भंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १० मार्च २००७ रोजी रात्री स्पर्धा सुरु असताना संग्राम चौक परिसरातील काही मुले सामना पाहण्यासाठी मैदानावर गेली होती. त्यावेळी संग्राम चौकातील काही मुले व नागेश पाटील यांच्या समर्थकांत जोरात वाद झाला. गजानन मालवेकर व त्याच्या समर्थकांनी मैदानावरील व्यासपीठाची मोडतोड केली. त्या ठिकाणी लावलेले डिजिटल फलक फाडले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्वांना पांगविले. याची नोंद पोलिसात झाली नाही. गणेश पाटील याच्या मनातील राग कायम होता.

रात्री संग्राम चौक येथील एका कट्टयावर गजानन व राकेश शेटे, संग्राम शेळके, गणेश शिदे, चंदा्रकांत शेवाळे बोलत बसले होते. मध्यरात्री उर्वरित मित्र गेल्यानंतर गजानन व राकेश कट्टयावर बोलत बसले. गजानन लघुशंकेस जात असताना दुचाकीवरुन येऊन गणेश, नागेश, महेश पाटील, चंद्रकांत शेवाळे यांनी त्याला मारहाण केली. नागेश, गणेश आणि चंद्रकांत यांनी तलवारीने वार केले. तर महेशने त्याच्या डोक्यात फरशी घातली. ही झटापट सुरु असताना जवळच असलेल्या राकेश शेटे याने मारामारी सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राकेशच्या डोक्यातही तलवारीने वार करण्यात आला. राकेश गंभीर जखमी झाला.

Leave a Comment