अनेक पदरी आर्थिक संकट

भारताच्या पूर्वेला (जपान) आणि पश्चिमेला (लीबिया) अशा दोन्ही दिशांना मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.या दोन्ही संकटांच्या गांभिर्याची आपण अजून म्हणावी तशी दखल घेतलेली नाही.या स्तंभात जपान कसा सावरत आहे याची माहिती घेतली आहे पण पश्चिमेला जमा झालेले आणि आणखी जमा होऊ पाहणारे संकटाचे ढग कसा कसा परिणाम करणार आहेत याची माहिती अजून सामान्य माणसापर्यंत पोचलेली नाही.कारण आपण दैनंदिन जीवनात हरघडी वापरतो ते इंधन तेल पश्चिमेला जमा होणाऱ्या संकटाने आपल्यासाठी कमालीचे महाग होऊ शकते. सध्या अरबस्तानातल्या आणि आफ्रिकेतल्या काही देशात प्रस्थापित सत्ताधीशांच्या विरोधात उसळून आलेली जनप्रक्षोभाची लाट या संकटाला कारणीभूत आहे.हा जनप्रक्षोभ अरबस्तानातल्या देशांत निर्माण झाला आहे असे म्हणण्यापेक्षा तो जगाला लागणाऱ्या इंधनतेलाच्या साठ्यापैकी दोन तृतियांश साठे असलेल्या देशात हा प्रक्षोभ निर्माण झाला आहे असे म्हणणे अधिक सयुक्तिक होणार आहे.   

हे एकदा लक्षात आले की आपल्यावर येऊन पाहणारे आर्थिक संकट किती गंभीर आहे याची कल्पना येईल. भारत देश हा जगातला एक मोठा इंधन तेल वापरणारा देश ठरला आहे.अमेरिका आणि चीन यांच्या खालोखाल याबाबत भारताचा क्रमांक लागतो. भारताची केवळ इंधन तेलाची गरजच जास्त आहे असे नाही तर निर्यातही मोठी आहे.भारताला लागणाऱ्या इंधन तेलाचा दोन तृतीयांश हिस्सा बाहेरून मागवला जात असतो. म्हणजे भारताकडे असणारे परकीय चलन मोठ्या प्रमाणावर याच एका गरजेवर खर्च होत असते. त्यामुळे या अरबी आणि आफ्रिकी देशात राजकीय असंतोष पसरत  चालला की तिथल्या तेल उत्खननावर परिणाम होईल आणि आपल्याला आयात करावे लागणारे इंधन तेल आणखी महाग होऊन जाईल. जगात भारताशिवाय युरोपी देश आणि अन्यही काही आशियाई देश इंधन तेलाचे ग्राहक आहेत पण भारताला त्यांच्यापेक्षा ते महाग मिळते. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था तेलांच्या भावाशी कायम घट्ट बांधलेली असते आणि त्याबरोबर ती हिंदकळते.

आपल्या तेलाच्या आयातीला काही प्रमाणात कमी करता येते पण त्यासाठी तेलांचे देशांतर्गत उत्पादन वाढवले पाहिजे. नव्या तेल विहिरी शोधल्या पाहिजेत आणि आपल्या गरजेचा हिस्सा टप्प्याटप्प्याने वाढवला पाहिजे. आयात त्याच क्रमाने कमी केली पाहिजे. तसे होत नाही. फार कसून मेहनत करून तेल विहिरी शोधल्या जात नाहीत. त्यामुळे तेलाची आयात वाढत आहे. तिच्यावर होणारा परकीय चलनाचा खर्च वाढत आहे. आता आता तर भारतातल्या  वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा स्थितीत भारतात तेलांची मागणी वाढत राहणार आहे. याची एक आर्थिक बाजू पाहिली पाहिजे. आपल्याला तेल आयात करावे लागते, पाम तेल आयात करावे लागते आणि काही प्रमाणात डाळीही आणाव्या लागतात. त्यावर आपले परकीय चलन खर्च होते आणि त्यामानाने आपण कमी निर्यात करतो. म्हणजे आपल्याला मिळणारे डॉलर हे आपल्याला खर्चाव्या लागणाऱ्या डॉलर्सपेक्षा कमी आहेत. आवक कमी आहे आणि जावक वाढलेली आहे.याला म्हणतात व्यापारी तोटा. तो तोटा कमी करण्यासाठी आपल्याला आयात कमी आणि निर्यात जास्त करावी लागणार आहे.

होत आहे ते मात्र उलटे. म्हणजे आपली आयात वाढली आहे आणि निर्यात कमी होत आहे. म्हणजे व्यापारी तोटा वाढत आहे. सध्या आपण तो सहन करू शकतो कारण सुमारे २ कोटी भारतीय परदेशांत आहेत. यातले बरेच लोक आपल्या घराकडे पैसे पाठवतात. हा पैसा डॉलर मध्ये येतो. त्यामुळे आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीत डॉलर जमा होत असतात आणि तोटा सहन होत असतो. मात्र याबाबतही आता धोक्याचा इशारा मिळाला आहे. आपल्या देशातून परदेशात गेलेले अनेक लोक तिथल्या राजकीय गोंधळामुळे मायदेशी परत येत आहेत. अशा लोकांनी मायदेश गाठला की त्यांच्यामुळे होणारी डॉलरची आयात कमी होते. म्हणजे परकीय चलनाच्या गंगाजळीत तूट यायला लागते. परिणामी आपली परदेशातून काही तरी आयात करण्याची क्षमता कमी होते. ती कमी व्हायला लागली की, आपल्या सगळ्याच आर्थिक व्यवहाराला मर्यादा यायला लागतात. तेव्हा पश्चिमेकडे जमा झालेले संकट हे केवळ तेलाच्या किमतीपुरते मर्यादित नाही, ते  आपल्या देशात येणाऱ्या डॉलर्सच्या बाबतीतही जाणवू लागते.

Leave a Comment