बुलडाणा दि.२८ – महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेली सैलानी यात्रा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.एका सजविलेल्या उंटिणीवर बाबांचा संदल ठेवण्यात आला होता.यावेळी धूप,उदबत्त्यांचा दर्प परिसरात दरवळत होता.ढोलताशे, नगारे आणि डफड्यांच्या निनादात पिपळगांव सराई येथून बाबांचा संदल निघून सैलानी येथे रात्री १२ वाजता दर्ग्यावर चढला.
सैलानीत लाखो भाविकांच्या साक्षीने दर्ग्यावर चढला संदल, ४ ट्रक नारळांची अनोखी होळी
एका शतकापासून येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. होळीच्या पाचव्या दिवशी बाबांचा संदल निघतो. हा संदल पाहण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडते. संदलनिमित्त सात ते आठ लाख भाविक सैलानीत दाखल झाले होते. संदल दरम्यान काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सैलानी बाबांच्या यात्रेचा प्रारंभ हा होळीच्या दिवशी होतो. या दिवशी सुमारे ४ ट*क नारळे, निबू, काळा दोरा होळीत टाकली जातात. नारळांची होळी करुनच या यात्रेला प्रारंभ होत असतो. हे या यात्रेचे अनोखे वैशिष्ट्य आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या सैलानी येथे यात्रा उत्सवादरम्यान लाखो भाविकांची गर्दी असल्यामुळे गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातील १६ पोलिस अधिकारी, १३५ पोलिस शिपाई, ४५ महिला पोलिस, एक एस. आर. पी. कंपनी आणि बुलडाणा जिल्ह्यातील २५ पोलिस अधिकारी, १७५ पोलिस कर्मचारी, ५२ पोलिस कर्मचारी आणि १३० होमगार्डस् असा ५७८ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संदल चढताच दूरवरचे यात्रेकरू बस आणि खाजगी वाहनाने परतीच्या मार्गाला लागले आहेत.