भारत पाकिस्तान वर्ल्ड कप उपांत्य सामन्यात किमान पाच हजार कोटींचा सट्टा

मुंबई/पुणे दि.२६ – मोहाली येथे ३० मार्च रोजी होत असलेल्या भारत पाकिस्तान वर्ल्ड कप उपांत्य सामन्यात किमान पाच हजार कोटींचा सट्टा खेळला जाईल असा अंदाज वर्तविण्यात आला असून बेटींग घेणार्यांटवर तसेच सट्टा खेळणाऱ्यांवर आत्तापासूनच पोलिसांनी नजर ठेवायला सुरवात केली आहे.
 
भारत पाकिस्तान सामना नेहमीच सट्टेबाजांना मोठी पर्वणी असते मग तो कोठेही होवेा. आता तर वर्ल्ड कप उपांत्यफेरीचा सामना असल्याने देशविदेशातील बुकी आत्ताच कामाला लागले आहेत असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून समजते. भारताने ज्याक्षणी ऑस्ट्रेलियावर विजय मिळविला त्याक्षणीच या सट्टयाची सुरवात झाली असून सुरवातीचा पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांचा भाव ९० पैसेच निघाला आहे. कारण हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने कोण जिकणार याची कांहीही कल्पना करणेच शक्य नाही असे सट्टेबाजांचे म्हणणे आहे. अर्थात सामन्याचा दिवस जसा जवळ येईल तसे सट्ट्याचे समीकरणही बदलेल असे या क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे.
 
या सट्ट्यातील बुकींना दाऊद गँगचीही दहशत वाटते आहे कारण दाऊद कराचीत असल्याने तो या सट्ट्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा अंदाज वर्तविला जात आहे. मुंबईतील कांही बुकी दाऊद गँगशी संबंधित असल्याने ते कदाचित दाऊदच्या दबावाखाली येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अंतर्गत वर्तुळातून समजलेल्या माहितीनुसार उपखंडातील हवाला ऑपरेटर्सही आता सक्रीय झाले असून दुबईतून मोठ्या प्रमाणावर यातील पैसा हवालामार्फत ट्रान्सफर केला जाईल असे समजते. दुबई हे हवाला मार्फत पैसे पाठविण्याचे सर्वात मोठे केंद्र असून पाकिस्तानातील बडे बुकी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेत असतात असेही समजते.
  
मुंबई पोलिसांनी मुंबई पुण्यासह अन्य महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांना बुकींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले असून बुकी अथवा पंटरचा माग काढण्याची सुरवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईत होणार्याक अंतिम सामन्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर मुंबई पोलिस महासंचालक जातीने लक्ष ठेवत आहेत.
  
दरम्यान केंद्रीय गुप्तवार्ता विभागाने दहशतवादी वाघा बॉर्डर पार करून मोहालीतील सामना बघण्याच्या उद्देशाने भारतात येतील असा इशारा दिला आहे. तशा सूचनाही सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या असून मोहालीतील सामन्यासाठी ५ हजार पाकिस्तान्यांना व्हीसा दिला जाणार असल्याचेही समजते.

Leave a Comment