अर्थव्यवस्था सावरतेय

जपानमध्ये झालेले भूकंप आणि नंतरची त्सुनामीची आपत्ती तशी जपानसाठी सुसह्य होती पण या संकटात अणुवीज केंद्रातल्या स्फोटांची भर पडली आणि आता जपानचे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला.जपान हे औद्योगिक राष्ट्र आहे आणि त्सुनामीने त्याच्या वीजपुरवठ्यालाच धक्का बसला होता.जपानच्या एकंदरीत विजेत एक तृतियांश वीज ही अणुवीज केन्द्रातून मिळते.त्यासाठी अकरा संयंत्रे कार्यरत असतात.त्यातली पाच संयंत्रे बंद पडली. अशा स्थितीत जपानच्या उद्योगांची स्थिती कशी असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. जपानवर ही आपत्ती दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच येत होती असे म्हटले जात असले तरी ती वस्तुस्थिती नव्हती. यापेक्षा कमी तीव्रतेची पण तशी परिणाम करणारी आपत्ती १९९५ साली आली होती. कोबे येथे मोठा भूकंप होऊन उद्योगावर परिणाम झाला होता. त्या संकटाने जपानला १०० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते आणि काही आठवडे तरी या देशाचा शेअर बाजार अस्थिर होता. आताची आपत्ती त्यापेक्षा कठीण असल्यामुळे आताही बरेच नुकसान सहन करावे लागेल असे अंदाज होते पण हे सारे अंदाज खोटे ठरवीत जपानच्या अर्थव्यवस्थेची चाके संकटानंतरच्या आठवड्यातच फिरायला  लागली आहेत.
   
जपानचा जीव आहे वाहन उद्योगात. जपान हा जगातला आघाडीचा आणि पहिल्या क्रमांकाचा वाहन उत्पादक दश आहे. निस्सान, होंडा, टोयोटा या जपानी वाहन कंपन्यांचा व्याप जगभरात आहे. त्यामुळे जगातले वाहन क्षेत्र कंपायमान होईल असे म्हटले जायला लागले होते. पण तसे काही न होता जपानच्या या साऱ्या कंपन्यातले कामकाज यथावत सुरू झाले आहे. कारखान्यांची चाके फिरायला लागली आहेत. जपानी माणसाचा उद्योगीपणा आणि चिवटपणा यांचे प्रत्यंतर यायला लागले आहे. दुसऱ्या महायुद्धात तर त्याचा प्रत्यय आला होताच. हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन शहरे अणुस्फोटाने पार बेचिराख झाली होती पण त्यामुळे निराश न होता जपान उभा राहिला. केवळ १० वर्षात जगातली एक औद्योगिक शक्ती म्हणून नावारूपाला आला आणि नंतरच्या २० वर्षात तर जगातली दुसर्यार क्रमांकाची अर्थव्यवस्था असा मान मिळवून बसली. या सार्याव घटना पाहताना आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की, जपान हा देश महाराष्ट्राएवढा आहे पण, तो भारतापेक्षा तिप्पट श्रीमंत आहे.
   
ही श्रीमंती या देशाला कसलीही नैसर्गिक देणगी मिळालेली नसतानाच प्राप्त केली आहे. केवळ उद्योगी प्रवृत्ती आणि तंत्रज्ञानात मारलेली भरारी यांच्या जोरावर हे सारे साध्य केले होते. त्यामुळे या संकटाने जपान खचून जाणार नाही याची जगाला खात्री होतीच. पण नाही म्हटले तर आता या संकटाचे काही आर्थिक परिणाम जगातल्या अन्य देशांना भोगावे लागत आहेत. काण शेवटी  जपान हे एक औद्योगिक राष्ट्र आहे. अशा घटनांचा पहिला परिणाम शेअर मार्केटवर होत असतो. भूकंपाच्या दुसऱ्याच दिवशी निकीचा म्हणजे न्यूयॉर्क शेअर बाजाराचा निर्देशांक ६.३ टक्क्यांनी घसरला. तिसऱ्या दिवशी अणु ऊर्जा केंद्रातले अपघात सुरू झाले आणि ही घसरण ९ टक्के झाली. भारतातल्या शेअर बाजारावर सुद्धा असाच गंभीर परिणाम झाला आणि मुंबई शेअर मार्केटमध्ये भूकंपाच्या दिवशी निर्देशांक २७२ अंशांनी घसरला पण गेल्या आठवड्यात या निर्देशांकाने पुन्हा वरची पातळी गाठायला सुरूवात केली आहे. जपानच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजे बँक ऑफ जपानने शेअर बाजारामध्ये १८४ अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम बिनव्याजी गुंतवली होती पण तिची फार गरज पडली नाही.  तिच्या मदतीशिवायच घसरते शेअर मार्केट सावरले जात आहे.
   
जपानची ही आपत्ती केवळ नैसर्गिक संदर्भातच अनपेक्षित आहे असे नाही तर ती अनेक आर्थिक धक्क्यांच्या मालिकेत आली आहे. गेल्या काही वर्षांपासून जपानच्या अर्थव्यवस्थेला निरनिराळे धक्के बसत आलेले होतेच. १९९० नंतरच्या दशकात तर तिची वाढ खुंटलेलीच होती. अमेरिकेतल्या मंदीनेही तिला धक्का बसला होता. विशेषतः जपानचे सरकार कर्जाच्या साफळ्यात अडकले होते. सरकारला प्रचंड मोठे परकीय कर्ज झालेले होते. या संकटावर मात करण्याचे मार्ग शोधत असतानाच हे नवे संकट कोसळले. जपान हा मोठा गुंतवणूकदार देश आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये प्रस्तावित असलेल्या जपानच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांवर काही परिणाम होणे साहजिक होते पण हे परिणाम कल्पनेपेक्षा कितीतरी कमी दिसले आहेत. भारतातल्या बऱ्याच  प्रकल्पांत जपानची गुंतवणूक झालेली आहे. चारच महिन्यांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात येऊन गेले होते आणि त्यांनी भारताच्या पायाभूत सोयींमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा करार केला होता. विशेषतः रेल्वे मार्गात जपानची मोठी गुंतवणूक अपेक्षित होती. ती आता काही प्रमाणावर लांबणीवर पडेल पण अल्प काळच्या या अडचणीवर लवकरच मात केली जाईल असा विश्वास आता वाटत आहे.

Leave a Comment