‘‘रफीसाहेब” व ‘‘लावणीचं सौभाग्य”चे मुहूर्त संपन्न

मुंबई दि.२६ – महंमद रफी साहेबांच्या गीतांची मोहिनी आजही कायम आहे.रफी साहेबांच्या आवाजाला दैवी आवाज म्हटले जाते ते याच कारणामुळे.अशा अद्भूत गायकाच्या चित्रपटगीताची एका कार्यक्रमात श्रोत्यांच्या आवडीनुसार निवड करणे तसे आव्हानच आहे.कारण महंमद रफीसाहेबांची हजारो चित्रपट गीते वारंवार ऐकावीत अशीच आहेत,अशा रसिकप्रिय रफी गीतांचा एक वेगळा कार्यक्रम ‘पंचम‘ तर्फे, ‘हिटबीट्स‘ वाद्यवृंद सादर करीत असून या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन रत्नाकार पिळणकर यांचे आहे. या कार्यक्रमाचे शीर्षक ‘रफीसाहेब‘ असे निश्चित करण्यात आले असून, ‘‘एक गायक, अनेक नायक‘‘ या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारीत आहे.

दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, शशी कपूर, जितेंद्र, जॉनी वॉकर, मेहमूद या अभिनेत्यांसाठी रफीसाहेबांनी प्रामुख्याने पार्श्वगायन केले असून त्यांच्या आवाजाद्वारे एखाद्या अभिनेत्याला मूर्तरूप देण्याची किमया केवळ रफीसाहेबच करू शकतात. कार्यक्रमात या आणि इतर काही नायकांची चित्रपट गीते रंजकरीत्या सादर करण्यात येणार असून प्रतापकुमार प्रमुख गायक असणार आहेत. संगीत संयोजक मिलिद दाभोळकर व राजू यांनी केले आहे तर प्रकाशयोजना भूषण देसाई यांचे आहे. कमलाकर आणि राजू या निर्मात्या बंधूंची ही भव्यदिव्य निर्मिती एप्रिल महिन्यात व्यावसायिक रंगभूमीवर येईल.

‘पंचम’ची आणखी एक निर्मिती आहे ‘‘लावणीचं सौभाग्य”. कृष्णधवल चित्रपटांच्या काळातील लावण्यांपासून ते आजवरच्या रंगीत व खाजगी लावण्यांचा रंगतदार प्रवास निवेदन व व्हीडिओ दृश्य संकल्पनेतून यात मांडण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व लेखन रत्नाकर पिळणकर यांचे आहे. लावणीसृष्टीतील लोकप्रिय नृत्यांगना आकांक्षा कदम ही या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असून संगीत संयोजन अभिजीत मोरे यांनी केले आहे. प्रताप, कमलाकर निर्मित हे दोन्ही भव्यदिव्य कार्यक्रम एप्रिल महिन्यांत रंगभूमीवर सादर केले जातील. दोन्ही कार्यक्रमांचा मुहूर्त नुकताच पत्रकार संजय डहाळे यांच्या श्रीफळ वाढवून करण्यात आला. ‘‘लावणीचं सौभाग्य” व  ‘‘रफीसाहेब”, ‘‘एक गायक अनेक नायक” या अनोख्या संकल्पनेचे संजय डहाळे यांनी ‘‘सुवर्ण संगीतांची जाणीव ठेऊन निर्माण केलेला कार्यक्रम” अशी दाद देऊन निर्मात्यांचे कौतुक केले.

Leave a Comment