पुणे दि.२६ – पुण्यात सुरू होत असलेल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे कामकाज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत असून त्यामुळे सीबीआयतर्फे दाखल करण्यात येणाऱ्या केसचा निपटारा अधिक वेगाने करणे शक्य होणार आहे.
देशभरात सीबीआयतर्फे दाखल करण्यात आलेले सुमारे ९० हजार खटले विविध न्यायालयात सुरू आहेत.आजकाल महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने खटल्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. या प्रकरणांचा निकाल वेगाने लावला जावा यासाठी देशभरात ७१ विशेष न्यायालये स्थापण्याची घोषणा पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केली होती. त्यातील सहा विशेष न्यायालये महाराष्ट्रात स्थापली जाणार असून त्यात पुणे, नागपूर आणि अमरावतीचा समावेश आहे. पुणे विशेष न्यायालयाच्या अखत्यारीत पुण्यासोबतच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यांचाही समावेश केला गेला असून या विशेष न्यायालयात फक्त सीबीआयचे खटलेच चालणार आहेत असे पुणे सीबीआय शाखेच्या अधीक्षक विद्या कुलकर्णी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सीबीआयतर्फे दाखल करण्यात आलेल्या खटल्यांत प्रलंबित खटल्यांची संख्या हजारापेक्षा अधिक असून त्यात पुण्यातील ६४ खटल्यांचा समावेश आहे. सतीश शेट्टी खूनप्रकरण, प्रीतमंदिर बनावट दत्तक प्रकरण ही त्यातील कांही महत्त्वाची उदाहरणे असल्याचेही कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.