गतीमंद मुलांना आधार देण्याचा विश्वास संस्थेचा प्रयत्न

ठाणे दि.२६ – प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट असे कलागुण दडलेले असतात,मग ती व्यक्ती सर्वसामान्य असो किवा शारिरीक व मानसिकदृष्या अपंग.प्रत्येकजण कला-कौशल्य घेऊन जन्माला येत असतो.मात्र या कलेची जोपासणा करण्यासाठी गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची, योग्य आधाराची.ठाण्यातील विश्वास या गतीमंद मुलांच्या संस्थेने समाजामध्ये दुर्लक्षित केल्या जाणार्याण गतिमंद मुलांच्या सुप्तगुणांना उजाळा देण्याचा वारसा गेल्या २१ वर्षापासून विश्वासाने जपला आहे. विश्वास या संस्थेमध्ये १८ ते ४३ वयोगटातील २० ते २५ मुले प्रशिक्षण घेत आहेत.

सध्या या संस्थेतील मुले गुंतली आहेत ती गुढीपाडव्याला उभारल्या जाणार्याण प्रतिकात्मक गुढ्या तयार करण्याच्या कामामध्ये. गेल्या ९ वर्षापासून गुढीपाडव्याला गुढ्या बनविण्याचा उपक्रम या संस्थेतर्फे  राबविला जात आहे. सुमारे १५ ते २० दिवसांपासून गुढ्या बनविण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. एक ते दीड फुट उंचीच्या या गुढ्यांना मणी, टिकल्या, रंगीत कापड, रंगीत रिबन्स, कलश, बताशे, हार लावून आकर्षिकरित्या सजविण्यात येते. यावर्षी ३०० गुढ्या तयार करण्याचा ध्यास या मुलांनी आखला आहे. विशेष बाब म्हणजे गुढीपाडव्याच्या चार ते पाच दिवस आधी या मुलांनी बनविलेल्या गुढ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. यातून जो मोबदला मिळेल, तो मुलांच्या उपचारासाठी वापरला जाणार असल्याची माहिती विश्वस्त अरविंद सुळे यांनी दिली. समाजामध्ये अपंगाबद्दल विशिष्ट असा दृष्टिकोन तयार झाला असून तो बदलण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. अपंगांनादेखील सणांचा आनंद साजरा करण्याचा हक्क असून भारतीय सणाची महिती या मुलांना व्हावी, असा या संस्थेचा उद्देश असल्याचे प्रशिक्षिका नीना क्षीरसागर यांनी सांगितले.

Leave a Comment