जपान : किरणोत्सर्गामुळे टोकियोमध्ये लहान मुलांना नळाचे पाणी देण्यास बंदी, अमेरिकेची काही जपानी वस्तूंवर बंदी

टोकियो २५ मार्च – टोकियोच्या काही भागात किरणोत्सर्ग आढळल्यामुळे शहर प्रशासनाने लहान मुलांना नळाचे तसेच बोअरचे पाणी पिण्यासाठी देऊ नये,असे आदेश काढले आहेत.दरम्यान अमेरिकेने जपानहून येणाऱ्या काही खाण्या-पिण्याच्या वस्तुंवर आयात करण्यास बंदी घातली आहे.टोकियोहून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या अणुभट्ट्यांत काही दिवसांपूर्वी स्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकिओच्या काही भागातील किरणोत्सर्गात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सहांपैकी एका अणुभट्टीतून काळा धूर बाहेर येत असल्याचे दिसू लागल्याने गुरुवारी या भागातील दुरुस्तीचे काम थांबविण्यात आले. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन परत बोलाविण्यात आले आहे. ११ मार्च रोजी झालेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या सुनामीत २३ हजारपेक्षा लोक ठार झाल्याची भीती जपान सरकारने व्यक्त केली आहे. टोकिओ शहरात १३ दशलक्ष लोक राहतात. या शहरातील पाणीशुध्दीकरण प्रकल्पातील रेडिओअॅक्टिव्हचे प्रमाण वाढले असून लहान मुलांसाठी हे पाणी घातक ठरु शकते, असा अहवाल वैज्ञानिकांनी दिल्यानंतर सदरचे पाणी लहान मुलांना पिण्यासाठी देऊ नये, असे आदेश शहर प्रशासनाने काढले आहेत. फुकुशिमा दाईची अणुभट्ट्यांत झालेल्या स्फोटाच्या परिणामी पाण्यातील किरणोत्सर्ग वाढल्याचे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

पाण्यातील किरणोत्सर्गाचे प्रमाण वाढलेले असले तरी अजूनही हे पाणी वापरले जाऊ शकते, असे टोकिओचे गव्हर्नर शिनात्रा इशिवारा यांनी सांगितले. मोठ्या माणसांसाठी हे पाणी वापरण्यास मुभा असली तरी एक वर्षाखालील मुलांसाठी पाणी घातक ठरु शकते, असे इशिवारा यांनी नमूद केले. जपानी खाद्यान्नाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने अनेक देशांनी सावधगिरीचा पवित्रा बाळगला असून अमेरिकेने पहिल्यांदाच काही जपानी खाद्यान्नाच्या आयातीवर बंदी घातली आहे. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने जपानवरुन आयात केल्या जाणाऱ्या दूध, भाजीपाला आणि फळांच्या आयातीवर बंदी घातली आहे. अमेरिकेपाठोपाठ दक्षिण कोरियादेखील काही जपानी खाद्यान्नाच्या आयातीवर बंदी घालू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. जपानमधील किरणोत्सर्गावर नियंत्रण आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील अनेक उपाय केले जात आहेत.

Leave a Comment