मुंबई : १०० व्या ‘मिलाद मुबारक’कार्यक्रमात रविवारी २०० जोडपी होणार विवाहबध्द

मुंबई २४ मार्च – दाऊदी बोहरा समाज त्यांचे आध्यात्मिक नेते,आदरणीय डॉ.सैयदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचा १०० वा ‘मिलाद मुबारक’(वाढदिवस) जगभरात शुक्रवार दि.२५ मार्च रोजी साजरा करणार आहेत.यावर्षी मुंबईत हा पवित्र सोहळा आयोजित करण्यात आला आहे.भारत, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, बहारीन, कतार, ओमान, सौदी अरब, येमेन, इजिप्त, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, केनिया, युगांडा, तांझानिया, मादागास्कर आणि रियुनियन आदी जगाच्या विविध भागात पसरलेले दाऊदी बोहरा समाजातील नागरिक आपल्या प्रिय नेत्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सदर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

शुक्रवारी होणाऱ्या सैयदनांच्या जन्मदिन सोहळ्यासाठी पैगंबर मोहम्मद यांच्या पवित्र जन्मदिनापासून म्हणजे गेल्या ४० दिवसांपासून या समाजाचे सभासद विविध सामाजिक विकास आणि आध्यात्मिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. दाऊदी बोहरा यांच्या ७०० हून अधिक सामुदायिक केंद्रात सैयदना यांच्या ऐतिहासिक १०० व्या जन्मदिनी जगभरात अद्वितीय आणि रेकॉर्डतोड प्रकल्प आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुरहानी फाऊंडेशन (भारत) तर्फे जगभरात पक्षांना दाणे देणाऱ्या ५२ हजार जणांनी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड केला. सैयदना यांनी स्थापन केलेल्या संस्थेद्वारे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय ५०० मेडिकल कॅम्प आणि आरोग्य शिबीराचे आयोजन बुरहानी मेडिकल इदाराह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. येत्या रविवारी २०० जोडप्यांचा विवाह ‘रश्मे सैफी’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपारिक स्वरुपात होणार आहे. या सोहळ्याप्रित्यर्थ रविवारी नरिमन पॉईंट ते चौपाटीदरम्यान एक भव्य जुलूस निघणार असून यावेळी सैयदना उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment