काँग्रेसची तडजोड

प.बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात युती झाली आहे.बरीच तणातणी होऊन ही युती झाली आहे.या तणातणीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि काँग्रेसला आपल्या अटींवर आघाडीत घेतले.असाच प्रकार तामिळनाडूत घडला होता आणि तामिळनाडूत प्रभावशाली असलेल्या द्रमुक पक्षाने काँग्रेसला खेळवायला सुरूवात केली होती पण तिथे काँग्रेसने एकवेळ केन्दा्रातली युती तुटली तरी हरकत नाही पण द्रमुक समोर गुडघे टेकणार नाही अशी भूमिका घेऊन द्रमुकला शरण आणले होते.तशी तिथे फार मोठी ओढाताण नव्हती पण दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने आग्रही भूमिका घेतली होती.दोघांनाही युतीची गरज असताना दोघांनीही आपल्याला युतीची काही गरज नाही असे दाखवायला सुरूवात केली होती. म्हणूनच केवळ तीन-चार जागांसाठी संघर्ष होत आहे असे चित्र निर्माण झाले होते.मात्र दोघांनाही युतीची गरज आहे हे दोघांच्याही लक्षात आल्यावर तडजोड करण्यात आली. काँग्रेसने मागितल्या तेवढ्या जागा पदरात पाडून घेतल्याचे समाधान मानले तर द्रमुकने २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात काही तरी पदरात पाडून घेतल्याचा आनंद मानला.

कोणीच जिकले नाही आणि कोणीच हरले नाही तर मग हा सारा संघर्षाचा आणि मतभेदांचा शो कशाला केला असा प्रश्न कोणालाही पडला असणारच. हा शो आणि प्रदर्शन न करता आपापसात चर्चा करून हे वाटप करता आले असते आणि युतीला अंतिम स्वरूप देता आले असते. या दोघातल्या चर्चेत दोन्ही पक्ष आपणच जिंकलो असल्याचे दाखवून देण्याचा आटापिटा करीत होते ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प. बंगालात मात्र तसा काही प्रकार घडला नाही. तिथे ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षाला अगदी गुडघे टेकायला लावले. २९४ जागांच्या या विधानसभेत तृणमूल काँग्रेस २२९ जागा लढवेल आणि ६५ जागा काँग्रेसला मिळतील असे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. या पेक्षा जास्त जागा मिळणे शक्य नाही असे काँग्रेसच्या नेत्यांना निक्षुन सांगितले. काँग्रेसच्या नेत्यांनी ९८ जागांची मागणी केली होती. यापेक्षा कमी जागा घेणार नाही असे म्हटले होते. खरे तर २००६ साली झालेल्या निवडणुकीत म्हणजे गेल्या निवडणुकीत काँग्रेसने केवळ ४८ जागा लढवल्या होत्या. पाच वर्षात काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षा एवढ्या वाढाव्यात असे काही घडलेले नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी आपला आग्रह सोडला नाही. 

तामिळनाडू आणि प. बंगाल या दोन राज्यात मोठा फरक आहे. तामिळनाडूत काँग्रेसने द्रमुकला आपली जागा दाखवली आणि आपल्या मनाजोगत्या जागा मिळवल्या  असे चित्र तरी निर्माण झाले. एका परीने हे विजयाचे चित्र वास्तव नाही. द्रमुक प्रणित आघाडीत सर्वच घटक पक्षांच्या जागा वाढलेल्या आहेत. यात कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव असा विषयच नाही. कारण गेल्या निवडणुकीत २३ जागा लढवलेली डावी आघाडी यावेळी आघाडीत नाही. ती डावी आघाडी आता जयललिताच्या आघाडीत आहे. त्यामुळे डाव्या आघाडीच्या २३ जागाद्रमुक आणि काँग्रेसने आपापसात वाटून घेतल्या आहेत. यातल्या पाच सहा जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तेव्हा काँग्रेसच्या जागा ४८ वरून ६४ झाल्या म्हणजे काँग्रेसने द्रमुकला आपली जागा दाखवली असे म्हणावे एवढा हा काही मोठा  विजय नाही पण काँग्रेसच्या नेत्यांनी तसा प्रचार सुरू केला होता आणि आता सोनिया गांधी तृणमूल काँग्रेसलाही अशीच तिची जागा दाखवतील असा प्रचार सुरू केला होता. पण प्रत्यक्षात पाहिले तर ममता बॅनर्जी यांनीच काँग्रेसला तिची जागा दाखवलेली आहे.

तामिळनाडू आणि प. बंगाल यांच्यातल्या वाटाघाटीतला आणखी एक फरक लक्षात येत आहे. तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी वाटाघाटीत शक्यतो ओढाताण करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला युतीची काही गरज नाही असे भासवायचा प्रयत्न केला होता पण तरीही दोन्ही पक्ष युती नक्की टिकली पाहिजे यावर एक डोळा ठेवून होते. पण प.बंगालात असे झाले नाही. ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष २२९ जागा लढवेल असे जाहीर केले आणि काँग्रेस नेत्यांना काय वाटेल याचा क्षणभरही विचार केला नाही. मी तुम्हाला ६० जागा सोडल्या आहेत. तेवढ्या घेऊन गप्प बसा, मुकाटपणे तेवढ्याच मान्य आहेत असे म्हणा. दोन दिवसात उत्तर आले नाही तर तुम्हाला या जागा मान्य नाहीत असे समजायला आणि त्या ६० जागांवर माझे उमेदवार उभे करायला मी तयार आहे असे त्यांनी काँग्रेसला बजावले. तशी एकतर्फी घोषणा करून त्यांनी, याल तर तुमच्यासह आणि न याल तर तुमच्यासह असे स्पष्टच केले. परिणामी काँग्रेसला ममता बॅनर्जी यांनी दिल्या तेवढ्या जागा घेऊन गप्प बसावे लागले. काँग्रेसची प. बंगालमधली जागा या पक्षाला आता कळली. ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा दाखवण्याच्या वल्गना हवेत विरल्या.

Leave a Comment