२ जी चा पहिला बळी

२ जी स्पेक्ट्रम प्रकरणाच्या चौकशीतला प्रमुख साक्षीदार सादिक बाशा याचा अचानक मृत्यू झाला आहे.तो करोडपती बिल्डर होता आणि या प्रकरणातला प्रमुख आरोपी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा याचा निकटचा सहकारी होता.त्याने आपल्या राहत्या बंगल्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याच्या पत्नीने या आत्महत्येस दुजोरा दिला.पण काही लोकांना हा खून असावा असा संशय आहे.कारण २ जी प्रकरणात अनेकांची इज्जत अडकली आहे आणि सादिक बाशा हा राजा याचा अगदी निकटचा सहकारी असल्याने त्याला या प्रकरणातली सगळी माहिाती होती.त्याने ही माहिती उघड केली तर भल्या भल्यांचे वस्त्रहरण झाले असते आणि हे गौप्यस्फोट ऐन निवडणुकीत झाले असते तर केवळ सत्ताही गेली असती आणि चेन्नई पासून दिल्लीपर्यंत अनेकांच्या आसनाला धक्के बसले असते म्हणून त्याचा काटा काढण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे या लोकांना वाटते. अर्थात बाशा याची पत्नीच त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगत आहे.त्यामुळे काटा काढला असण्याची शक्यता कमीच आहे मात्र तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला यामागे २ जी स्पेक्ट्रम प्रकरणच आहे. त्याच्यावर काही माहिती सांगण्यासाठी सीबीआय कडून दबाव येत असणार आणि काही माहिती दडवण्यासाठी दुसर्यास बाजूने दबाव येत असणार आणि या परस्परविरोधी दबावामुळेही तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला असावा. त्याने आत्महत्या केली असली तरीही तो या प्रकरणातला पहिला बळी आहे. बाशा हा चेन्नईतल्या ग्रीन हाऊस प्रमोटर्स या कंपनीचा चेअरमन होता. तो काही वर्षांपूर्वी अगदी गरीब होता पण तो ए. राजा यांचा गाववाला असल्याने राजा यांचा राजकीय उदय व्हायला लागला तसा त्याचाही आर्थिक विकास व्हायला लागला. त्याने बिल्डर म्हणून धंदा सुरू केला आणि बघता बघता आपल्या या कंपनीची शाखा सिगापूरमध्ये सुरू केली. इतक्या कमी वर्षात त्याला एवढे करोडो रुपये कोठून मिळाले याचा उलगडा होत नव्हता पण नंतर नंतर त्याच्या कंपनीच्या संचालक मंडळावर राजा यांची पत्नी आहे हे कळल्यावर मग साऱ्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. राजा यांनी खाल्लेल्या पैशाची सारी उलाढाल बाशा याच्याकडे होती आणि त्या बदल्यात राजा यनी त्याला भरपूर पैसेवाला करून सोडले होते. या पैशातून त्यांनी म्हणजे बाशा आणि राजा या दोघांनी बांधकाम व्यवसायात पैसा गुंतवला आणि बराचसा पैसा परदेशात नेऊन सोडला. साधारणतः ज्या माणसाच्या मनाला अपराध केल्यामुळे टोचणी लागते तोच त्या पोटी आत्महत्या करीत असतो. बाशा याच्या बाबतीत फारशी माहिती मिळत नाही पण त्याला तशी टोचणी लागली असावी असे दिसते. त्याचे मध्यंतरी राजा यांच्याशी बिनसले होते असे कळते. नंतर या दोघांनी जमवून घेतले. राजा असो की सम्राट असो त्याला आपले अंतरंग माहीत असलेल्या माणसाशी फार बिनसलेले चालत नाही. कारण त्याला सारे काही माहीत असते. साधारणतः गुन्हेगारी टोळ्यांत असेच घडते. एकदा आत आलेल्या माणसाला पश्चात्ताप झाला तरीही बाहेर पडता येत नाही कारण तसे झाल्यास टोळीचे सारे व्यवहार बाहेरच्या जगाला कळण्याची भीती असते. म्हणून एखाद्या तरुणाला अशा टोळीत शिरणे सोपे असते पण पश्चात्ताप होऊन सर्वसाधारण जीवन जगावेसे वाटले तरी बाहेर पडणे अवघड असते. २ जी स्पेक्ट्रम सारखी भ्रष्टाचाराची प्रकरणे राजकारणी नेत्यांनी घडवली असली तरीही ती सारी गुन्हेगारी टोळ्यांच्या धर्तीवरच घडलेली आहेत. केवळ या लोकांनी राजकारणाचा बुरखा पांघरला असला तरीही त्यांची कार्यपद्धती आणि प्रवृत्ती ही पूर्णपणे गुन्हेगारी टोळी सारखीच आहे. म्हणून बाशा याला राजा यांनी आत ओढले पण त्याला बाहेर पडणे अशक्य झाले असावे. म्हणूनच त्याने आत्महत्या करून या टोळीच्याच नव्हे तर या जगाच्याच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा. काही का असेना जेव्हा लाखो करोडो रुपयांचा एवढा डाका घातलेला असतो तेव्हा खूप गुंतागुंतीच्या घटना घडलेल्या असतात. सीबीआयच्या तपासात या साऱ्या गुंतागुंती दिसायला लागल्या असून या प्रकरणात खाल्लेला पैसा सहा देशांत फाकवला गेला असल्याचे दिसून आले आहे. आपल्या देशात नेते, मंत्री आणि अधिकारी सरकारी पैशाचा अपहार करण्यास कसे कावळ्याप्रमाणे टपलेले असतात हे उघड उघड दिसायला लागले आहे. पैसा आणि तोही विनासायास मिळणार असे लक्षात येताच लोभीच काय पण सामान्य माणसाच्याही तोंडाला पाणी सुटत असते. अशा पैशावर डल्ला मारला तरी काहीही होत नाही, कोणीच कारवाई करीत नसते, आजकाल सर्वत्र असेच चाललेले असूनही कोणी कोणाला पकडलले नाही म्हणून आपणही शक्य तेवढा हात मारला पाहिजे असे म्हणून नेते, अधिकारी आणि बाशा सारख्या व्यावसायिकांनी मन मानेल तसा हात मारलेला आहे. काहीच होत नाही हा त्यांचा विश्वास अनाठायी असल्याचे दिसायला लागले असून आता एकेकाला खाल्लेला पैसा ओकावा लागत आहे. बाशा हा संधी साधकांतला पहिला बळी आहे.

Leave a Comment