पुणे दि २१ मार्च : ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर हे नाटककार म्हणून जेवढे यशस्वी आणि महान होते तेवढेच एक ‘माणूस’ म्हणून, सुहृद म्हणूनही महान होते; अशा शब्दात ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांनी कानेटकर यांच्या बद्दलचा आदर व्यक्त केला.
ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांचा ज्येष्ठ प्रकाशक आणि रंगकर्मी रामदास भटकळ यांच्या हस्ते वसंत कानेटकर स्मृती पुरस्कार देऊन सन्मान
कानेटकर यांच्या ९०व्या जयंतीचे औचित्य साधून रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फौंडेशनच्या वतीने खरे यांना ज्येष्ठ प्रकाशक आणि रंगकर्मी रामदास भटकळ यांच्या हस्ते वसंत कानेटकर स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष एड. प्रमोद आडकर, साहिल फौंडेशनचे मनीष खाडीलकर, कानेटकर यांचे पुतणे प्रा. अरुण कानेटकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
काही पुरस्कार स्वीकारताना आनंदाबरोबर अभिमानही वाटतो. कानेटकरांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना आपली तीच भावना आहे; असे खरे यांनी नमूद केले. कानेटकर यांना पिता-पुत्र संबंधांबाबत विशेष कुतूहल होते. विविध नाटकातून त्यांनी या संबंधांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला; असा कानेटकर यांच्या लेखनाचा नवा पैलू आपल्या भाषणातून दृष्टीस आणून दिला.
सर्व साहित्य प्रकारांमध्ये नाटक लिहिणे ही अवघड बाब आहे. मात्र कानेटकर यांना हे कार्य अचूक साधता आले. आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडण घडणीत कानेटकर यांचा मोठा प्रभाव आहे; असे भटकळ यांनी सांगितले.
खरे यांनी आतापर्यंत २८ नाटक लिहिली असली तरीही त्यांची यापेक्षा अधिक वेगाने आणि संख्येने त्यांची नाटक यायला हवीत अशी आपली अपेक्षा आहे. मात्र त्यांचे ‘सरगम’ हे नवे नाटक लवकरच रंगमंचावर येत आहे. हे संगीत नाटक असून त्याला अशोक पत्की यांचे संगीत आहे. ही बाब समाधान देणारी आहे; असे भटकळ यांनी सांगितले.
एड. आडकर यांनी प्रास्ताविक केले. मनीष खाडीलकर यांनी आभार मानले.