हिंगोली : विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती संस्थेनेच हडप केल्याची तक्रार

हिंगोली १७ मार्च – सेनगाव तालुक्यातील विद्यानिकेतन विद्यालय, कोळसा येथील विद्यार्थ्यांची शिष्यवृती संस्थेच्या लोकांनी खोट्या दस्तावेजाच्या आधारे हडप केल्याची तक्रार पालकांच्या वतीने विशेष समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी शैला रॉय यांनी या विद्यार्थ्यांना यापुढे बँकेतील खात्यातून शिष्यवृत्ती देण्याचे आदेश बजावले आहेत.

सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयातील अनुसूचीत जाती व जमाती, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील मुलींना सन् २००६-७ पासून शिष्यवृती अद्याप मिळालेली नाही. शासनाच्या वतीने विद्यार्थ्याना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या प्रामाणिक हेतूने शिष्यवृती दिली जाते. परंतू या शिष्यवृतीचा खाजगी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जातो. यामुळे विद्यार्थ्याना आर्थिक नुकसानीचा फटका बसतो. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर भरकटला जातो. असाच प्रकार सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे घडत असून पालकांनी समाजकल्याण अधिकार्यां कडे दिलेल्या तक्रारीत संस्थेने आमच्या पाल्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या घेवून शिष्यवृत्ती हडप केल्याची शंका निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी विशेष समाज कल्याण अधिकाऱ्यांनी चौकशी करून संस्थाचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पाल्यांना शिष्यवृती मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना थेट बँक खात्यातून शिष्यवर्ती देण्याचे आदेश बजावले आहेत.

Leave a Comment